रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत साई मंगल कार्यालयात भरवण्यात आले असून, ते आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत, नगरसेविका शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते चार मार्चला या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी या प्रदर्शनाची माहिती दिली. २००६पासून सर्वसामान्य महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे हे एकमेव प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर प्राची शिंदे, साई मंगल कार्यालयाचे मालक मंदार दळवी, हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्राची शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. जे. के. फाइल्ससमोरील साई मंगल कार्यालयात आठ मार्चपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री साडेआठ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

छंदातून व्यवसाय जोपासत असल्याचे मनोगत ‘रत्नभूमी’च्या संपादिका व उद्योजिका धनश्री पालांडे यांनी व्यक्त केले. ‘प्रत्येक स्त्री मिळवती झाली पाहिजे. महिला दिवसभर काम करत असते. निसर्गाने सर्व गृह, अर्थ, शिक्षण ही महत्त्वाची खाती महिलेलाच दिली आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
कौस्तुभ सावंत म्हणाले, ‘प्राची शिंदे यांनी सर्व उद्योगिनींना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे महिलांनी सोने केले पाहिजे. व्यवसायाला चालना मिळण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. या सर्वांचा ब्रँड तयार झाला पाहिजे. त्याकरिता मार्केटिंग महत्त्वाचे आहे. प्रदर्शनात विक्री किती होईल ते बघू नका, आपण किती ग्राहकांपर्यंत पोहोचलो, हे पाहा. ब्रँड होण्यासाठी प्रयत्न करा.’
‘रत्नागिरीला पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘रत्नाकरी’ या नावाने मत्स्य कालवण स्पर्धा घेणार आहोत. विजेत्या महिलांची रेसिपी रत्नागिरीतील हॉटेल्समध्ये उपलब्ध होईल. ही स्पर्धा लवकरच होणार असून, महिलांनी यासाठी सज्ज राहावे,’ असेही सावंत यांनी सांगितले.

प्रदर्शनात महिला उद्योगिनींसाठी प्रश्नपमंजूषा, फनी गेम्स, पाककला, पारंपरिक वेशभूषा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. महिला कायद्याबाबत मार्गदर्शन, मोफत नेत्रतपासणी, रद्दीपासून कलात्मक वस्तू बनविण्याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्राची शिंदे यांनी केले आहे. पौर्णिमा साठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.