मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या आमदारांसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य, तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करून त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली असून, त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन देण्यात येईल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
‘कोरोना’चे संकट आणि ‘लॉकडाउन’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन, तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा देऊन सहकार्य करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media