आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दलचा लेख आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी शतदा प्रेम करावे या त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. तो लेख सुरेश ठाकूर यांच्या परवानगीने येथे प्रसिद्ध करत आहोत.
………………………

आम्हा आचरेवासीयांची ‘मर्मबंधातली ठेव!’
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व स्वर्गीय पु. ल. देशपांडे आपल्यातून निघून गेल्यावर पंधरा वर्षे केव्हाच निघून गेली. गेल्याच शुक्रवारी त्यांचा पंधरावा स्मृतिदिन ‘कालगणने’प्रमाणे सर्वांनी साजरा केला! पण चाळीस वर्षांपूर्वी, १९७५ च्या आचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु. ल. देशपांडे आणि त्यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा आम्हा आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या कवितेतील ओळ खऱ्या अर्थाने आचरे गावात साकार झाली. ते दिवस आम्हा समस्त आचरेवासीयांसाठी स्वर्गीयच! अशी स्वर्गीय सुखाची तबके आपल्या ध्यानी आणि मनीही नसताना तो विधाता का पाठवून देतो? याचे आश्चर्य वाटत राहते. याची कारणे कदाचित अनाकलनीय असतीलही, पण ‘पुलं’च्या सान्निध्यातील ते ‘पुलकित दिवस’ म्हणजे माझ्या आयुष्यातील नक्षत्रांची अजब देणगीच होती. एक नक्षत्रच काय, अख्खी ‘आकाशगंगाच’ त्या वेळी आचरेगावी अवतीर्ण झाली होती.

मित्र हो! त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे, रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना एक पत्र आले. ‘या वर्षी रामेश्वर मंदिराचा ‘त्रिशतसांवत्सरिक महोत्सव’ येत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादन, कला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू, मी, पु. ल. देशपांडे, कुमार गंधर्व, सुनीताबाई आणि माझ्या साठ-सत्तर स्नेह्यांना घेऊन येत आहे. तयारीला लागावे’ त्या पत्रातील प्रत्येक अक्षराने अण्णा गुरवासोबत अख्खे आचरे गाव आनंदून गेले! माझ्या वडील बंधूंनी, दादा ठाकूर यांनी, ही बातमी घरी सांगितल्यावर आम्हीही मंत्रून गेलो. चिपळूणहून निघणारे एक ‘सागर’ स्थानिक नियतकालिक सोडले तर अन्य गावागावात पोहोचणारे त्या वेळी स्थानिक वृत्तपत्र नव्हते; पण ‘पु. ल. देशपांडे आचरे गावी येणार आणि चक्क आठ दिवस मुक्कामाला राहाणार’ ही सुवार्ता ‘रानारानात गेली बाई शीळ’ करीत गावागावात, घराघरात पोहोचली. ‘पुलं’, सुनीताबाईंसोबत मध्येमध्ये धामापूरला येऊन जायचे. पण आचरे गावी आणि आठ दिवस ‘पुलं’ परिवाराचा मुक्काम हा सर्वांसाठीच ‘महाप्रसाद’ होता. वसंतराव आचरेकरांनी आपले मुंबईनिवासी मित्र, तसेच उद्योगपती तात्यासाहेब मुसळे आणि भार्गवराम पांगे (मुंबई मराठी साहित्य संघ) यांच्या सहकाऱ्याने तो कार्यक्रम ठरविला होता आणि दिग्गज माणसे येणार होती ती केवळ वसंतराव आचरेकर यांच्या मैत्रीखातर!

… आणि ज्या सोनियाच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. रामनवमी उत्सव चालू असतानाच कोल्हापूर मार्गे व्हाया कणकवली, रामगड, श्रावण करीत धुळीचे रस्ते अक्षरश: तुडवत तुडवत तीन-चार जीपगाड्या, दोन मॅटॅडोर, अम्बेसॅडर, फियाट आदी वाहनांनी पु. ल. देशपांडे आणि त्यांचा गोतावळा आचरे येथे डेरेदाखल झाला. ‘दादा ते आले ना? मी त्यांना प्रथम पाहिले’ अशी रुक्मिणीसारखी अवस्था प्रत्येक आचरेवासीयांच्या तनाची आणि मनाची झाली! एक एक नक्षत्र पायउतार होत होते. आपल्या गावी त्या काळी नसलेल्या कोणत्याही भौतिक सुविधांनी ‘ओशाळून’ न जाता स्वत: वसंतराव आचरेकर खांद्यावरील हातरुमाल सावरत सर्वांना उतरवून घेत होते. ‘येवा, आचरा आपला आसा.’ हे सारे त्या आदरतिथ्यात जाणवत होते. त्यात  होते पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अतुल व्यास, रत्नाकर व्यास, मुंबई विद्यापीठाचे त्यावेळचे संगीत विभागाचे प्रमुख अशोकजी रानडे, थोर साहित्यिक अरविंद मंगळूरकर, शरदचंद्र चिरमुले, बंडूभैया चौगुले, राम पुजारी, इंदूरचे नटवर्य बाबा डीके, इंदोरचे पत्रकार राहुल देव, बारपुते, थोर चित्रकार एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी साठ-सत्तर मंडळी अक्षरश: आचरे गावी अवतीर्ण होत होती आणि आचरे गावचे नभांगण तार्यांनी भरुन जात होते. दुपारची वेळ, रामेश्वर सभामंडपातील महिरपी, कनातीही जणू गाऊ लागल्या होत्या. वाळ्याचे पडदे वातावरण गंधित करीत होते.सभामंडपातील हंडी-झुंबरात दुपारचे सूर्यकिरण लोलकासारखे भासत होते. दरबारात रामेश्वर संस्थानचे त्यावेळचे वयोवृद्ध ख्याल गायक ‘साळुंकेबुवा’ गात होते. त्यांचा ‘पूरिया धनश्री’ ऐन बहरात आला होता. तबल्यावर होते रामेश्वर संस्थानचे तबलावादक केसरीनाथ आचरेकर आणि हार्मोनियमवर ‘पवार; आणि त्याच ‘धूपदीप वातावरणात’ पुरिया धनश्रीच्या पार्श्वसंगीतावर आचरे गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा फोंडकेकाका, पु. ल. देशपांडेंच्या हाती मानाचा नारळ देऊन त्यांचे चक्क हात आपल्या हाती घेऊन, जसा जावयाला लग्नाच्या माळेला घेऊन यावा तसे, ‘पुलं’ना रामेश्वराच्या सभामंडपात आणत होते. ‘पुलं’च्या मागाहून महाराष्ट्राचा साहित्य, संगीत, चित्र शिल्पकलेचा अक्षरश: ‘शाही सरंजाम’ पायी चालत येत होता. त्या माजघरातील शाही स्वागताने ‘भाईंचे’ डोळे पाणावून गेल्याचे आम्ही अगदी जवळून पाहिले.

त्या वेळी रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोणत्याही अत्याधुनिक सोडाच, पण अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. ‘पु. ल. देशपांडे आपल्या घरी राहतील का? सुनीताबाई अॅडजेस्ट करून घेतील का,’ या विचारांनी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब तथा अण्णा थोडे धास्तावलेच होते. त्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे अक्षरशः त्यांचा शेजारचा मांगर. तो त्यांनी झापाने शाकारून सजवला होता. जमीन शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या होत्या. गाद्या, उशा, खुर्च्या, वसंतराव आचरेकरांनी कोल्हापूरहून आणल्या होत्या. सर्व तऱ्हेच्या आठ दिवसाला लागणाऱ्या भाज्या आणि सोबत यल्लप्पा आचारीदेखील कोल्हापूरहूनच आणला होता.वास्तूला शोभा त्यांच्या स्थापत्यरचनेपेक्षा, ‘त्यात कोणाचे वास्तव्य,’ यावरच खरी अवलंबून! ‘पुलं’, सुनीताबाई, कुमार गंधर्व, एम. आर. आचरेकर आदी रत्नजडीत साठ-सत्तर जवाहीर त्या ‘मांगरवजा कुटीत’ राहायला आले आणि त्या पर्णकुटीचा क्षणार्धात कसा ‘राजमहल’ झाला तो आम्ही याची डोळा पाहिला. अण्णा गुरवांची काकी (थोरली काकी), सौ. अरुणा वहिनी (अण्णांच्या पत्नी), अख्खं गुरव कुटुंबच त्यांच्या तैनातीला होतं. सुनीताबाई, वसुंधरा कोमकली गुरवांच्या घरच्या सुनाच झाल्या होत्या. ‘पुलं’ची दंगामस्ती बघायला आम्ही आमचाही तळ आमच्या घराकडून गुरवांच्या घरी हलवला होता. एकदा काही पत्रकारांनी ‘सुनीताबाईंना’ गुरवांच्या घरी तांदूळ निवडताना पाहून प्रश्न केला. ‘तुम्ही तांदूळ निवडता?’ त्या वेळी सुनीताबाई म्हणाल्या, ‘हो, आम्ही जेवतोसुद्धा!’ आणि कुमारांपासून गोविंदराव पटवर्धनांपर्यंत सर्व हास्यकल्लोळात  बुडाले!

त्या पर्णकुटीत ‘पुलं’. आपल्या विविध प्रवास वर्णनातील ‘किस्से’ सांगत तो एक वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अगदी लहान मूल आजोळी जशी दंगामस्ती करते तसे ‘पुलं’ आपले वय विसरून वागायचे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अरे वसंता, काल मी पु. ल. देशपांडे होतो रे! आज मी पु. ल. आचरेकर झालो.’ दुपारी, संध्याकाळी रामेश्वर मंडपात कुमारांच्या मैफिली रंगायच्या. प्रारंभी मालिनी राजूरकर, वसुंधरा कोमकली, नारायण पंडित यांचे गायन व्हायचे. नंतर सतारवादन, संतूरवादन; त्यानंतर कुमारजी अवतीर्ण व्हायचे!

भार्गवराम तथा दादा पांगे ध्वनी संयोजनाची जबाबदारी घ्यायचे. तबल्यावर वसंतराव आचरेकर तर कधी त्यांचे चिरंजीव सुरेश आचरेकर, हार्मोनिअमवर गोविंदराव पटवर्धन, तानपुऱ्यावर वसुंधरा कोमकली आणि निवेदनाची जबाबदारी स्वत: पु. ल. देशपांडे यानी घेतलेली आणि रंगत म्हणजे त्या कार्यक्रमाची जिवंत चित्रे पांढऱ्या शुभ्र ड्रॉइंग पेपरवर स्वत: एम. आर. आचरेकर चितारीत असत. कुमारांची ‘तान’ ते लीलया पेन्सिलने त्या ड्राईंग पेपरवर उतरवित. सुरुवातीला त्या रेषा अगदी शेवयासारख्या वाटत. पण क्षणार्धात ‘गवयाच्या बैठकीचा आकार’ कसा घेत ही जादू, एम. आर. आचरेकर या प्रचंड व्यक्तित्वाच्या, महान कलाकाराच्या, अगदी कुशीत राहून बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

कुमारांच्या ‘रागदारी’ गायनानंतर ‘पुलं’चे निवेदन, त्यानंतर कुमारजीची ‘निर्गुण भजने’ सुरू व्हायची. इंदूर, देवासच्या कलाकारांसोबत आचरेवासीय कलावंतांनाही ती भजने डोलवत ठेवायची! एके दिवशी तर बहारच आली. दुपारी मालिनी राजूरकरांपासून कुमार गंधर्वापर्यंत सर्वांनी वसंत, भीमपलासी, तोंडी, गुजरी-तोडी, मुलतानी-तोडी आदी ‘रागदारी’ गायकीने चैत्रातील त्या दुपारला मोगऱ्याचा गंध दिला. खऱ्या अर्थाने वसंतोत्सव रंगला!

आणि त्याच सायंकाळी ‘पुलं’चा एक आगळा पैलू आम्ही पाहिला! हार्मोनिअमची स्वर्गीय जुगलबंदी! ‘पुलं’सोबत तेवढ्याच तोलामोलाचे ‘संवादिनीचे’ बादशहा होते, गोविंदराव पटवर्धन! तबल्यावर सुरेश आचरेकर आणि जुगलबंदीसाठी उभयतांनी नाट्यसंगीत निवडले होते, ‘स्वकुल तारक सुता.’ जुगलबंदी जवळजवळ दीड तास चालली होती. उभयतांची बोटे सुरांवरून लीलया फिरत होती आणि स्वरांचे ‘महाल’ सभामंडपात आकारत होते. त्या काळी आम्हा कोणाजवळच ‘टेपरेकॉर्डर’ सारखं साधं उपकरणही उपलब्ध नव्हतं. तो स्वर्गीय ठेवा अजूनपर्यंत फक्त आम्ही कानात आणि मनात जपून ठेवला आहे, अगदी अत्तराच्या फायासारखा! चिरंतन! आणि चिरंजीव! 

‘पुलं’चे आदर्श जीवनाचे गुपित साऱ्या मराठी मनाला ज्ञात आहे. ‘पुलं’ सांगत ‘आयुष्यात मला भावलेले एक गूज सांगतो, ‘उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या! पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा! पण एवढ्यावरच थांबू नका! साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेची मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल…’ ‘पुलं’चे हे सुवचन साऱ्या मराठी मनाने, शब्दश: आत्मसात केले असेल; पण आम्ही आचरेवासीयांनी पु. ल. देशपांडे यांच्या त्या सुखद सहवासातूनच त्या वचनाचा गंध घेतला! त्या वेळी रंगांतून, स्वरांतून, शब्दांतून, चित्रांतून, तालांतून, अवघ्या भारत वर्षाला भरभरून देणारे ‘कलावंत दाते’, ‘पुलं’ आपल्यासोबत घेऊन आले होते. रंगातून देणाऱ्यात होते एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी (चिंचाळकर गुरुजीचे नेपथ्य एवढे दर्जेदार असायचे, की एका काँग्रेस महाअधिवेशनाचे प्रवेशद्वार नुसत्या साध्या झाडू व खराट्यांनी त्यांनी सजवले व ते पाहूनच भारताचे पहिले लाडके पंतप्रधान पंडित नेहरू प्रवेशद्वारापाशीच थांबले आणि त्यांनी गुरुजींचे कसे कौतुक केले हे ‘पुलं’नीच आम्हाला सांगितले, असे हे चिंचाळकर गुरुजी!) शब्दातून देणाऱ्या होते दात्यांत सर्वश्री अरविंद मंगरुळकर, बंडूभैया चौगुले, शरदचंद्र चिरमुले, राम पुजारी, बाबा डिके, राहुलदेव बारपुते आणि स्वत: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ताल सुरातून आनंद देणारे सौदागर होते, एक ना अनेक! स्वत: कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, प्रभाकर कारेकर, नारायण पंडित, रत्नाकर व्यास, गोविंदराव पटवर्धन, वसंतराव आचरेकर, आदी अनेक कलावंतांनी कलेशी केलेली मैत्री आणि जीवनाला आणलेली एक सोनेरी महिरप आम्ही अगदी जवळून पाहिली. त्याचा एक वेगळा संस्कार आमच्या मनावर झाला. पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेले ते ‘गूज’ प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला बरेच काही सांगून गेले.

अतिशय हजरजबाबी, खोडकर, खेळकर, अवखळ ‘पुलं’ची बालरूपे आम्ही अण्णा गुरवांच्या मांगरात पहात होतो. तेवढीच त्यांची शब्दशिल्पे कशी आकार घेतात, ही रामेश्वर सभामंडपात दुपार व सायंकाळच्या वेळी होणाऱ्या, कुमारजी व इतर गायकांच्या मैफिलीच्या निवेदनाच्या वेळी अनुभवीत होतो. अण्णा गुरवांच्या मांगरातील गप्पांच्या मैफिली आणि सभामंडपातील ‘ख्याल गायनाच्या मैफिली’ तेवढ्याच दर्जेदारपणे रंगत जायच्या! काय बघू आणि काय नको असे होऊन जायचे. साहित्य, विनोद, नाटक, चित्रपट, संगीत वक्तृत्व आदी अनेक क्षेत्रात एकाचवेळी संचार करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे सामान्यरूप आम्ही जवळून पाहत होतो. ‘पुलं – एक प्रवास’ व्हाया अण्णा गुरव मांगर ते रामेश्वर सभामंडप!’

त्या वेळी आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला तसे काही नियोजन असे नसायचे. ‘आले ‘पुलं’, कुमारजींच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ अशाच स्वरूपाचा तो कार्यक्रम होता. त्यामुळे रामेश्वर मंदिर व अण्णांचा मांगर सोडून कुठे जाऊ नये असे वाटे. मुंबई साहित्य संघाचे सर्वेसर्वा आणि आचरे गावचे सुपुत्र भार्गवराम पांगे, तथा दादा पांगे कार्यक्रमाचे संयोजक होते. सहा फूट उंचीचे, धोतर नेसलेले, डोक्यावर जाड भिंगाचा चष्मा, धारदार नाक, शोधक व कलात्मक नजर, ओठांना लाली देणारा किंचित पानांचा रंग, असे दादा पांगे आधीच देहयष्टीने आणि व्यक्तिमत्त्वाने उंच असल्याने सर्व कलावंताच्या तारांगणात उठून दिसत. तेच कार्यक्रमाची विविधता मध्येच सांगत.

एकदा दादा पांगेंनी सांगितले, ‘संध्याकाळी रामेश्वर मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळा होणार!’ त्या निवेदनाने आम्ही चक्रावलोच. कारण आमच्या गावात होणारा ‘पुस्तक प्रकाशनाचा’ तो पहिलावहिला सोहळा! अधिक चौकशीअंती समजले. आचरे गावचे सुपुत्र, मुंबईनिवासी, भारतीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि चिंतक, गंगाधर आचरेकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय संगीत’ या भारतीय संगीतावर मराठीत पहिल्यांदा प्रकाशित होत असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन सर्वश्री पु. ल. देशपांडे यांचे शुभहस्ते होणार होते आणि चक्क आमच्या आचरे गावात!

संध्याकाळी इंदोर, देवास, मुंबईच्या रसिकजनासोबत, ‘आचरेकर समस्त श्रोते’ सभामंडपात जमले. गंगाधर आचरेकरांचे छोटेखानी प्रास्ताविक झाले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात साहित्य आणि संगीत याचा खरा पूल, या ‘पुलं’नी जोडला आहे, म्हणून माझ्याच जन्मगावी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पु. ल. देशपांडेंच्या उपस्थितीत होत आहे.’ आणि त्यानंतर ‘पुलं’ बोलू लागले, ‘गेले चार दिवस वसंता मला आचऱ्याचा सुंदर निसर्ग दाखवत आहे. माडाची बने आणि देवाचा हिरवागार मळा (त्या वेळी आचऱ्याच्या देवाच्या मळ्यात वायंगणी शेती पिकविली जायची) या सुंदर निसर्गसंपन्न वातावरणात आचरे गावी संगीताची, कलेचीच पिकं येणार! वसंतराव, भार्गवराम आचरेकर. भार्गवराम पांगे, एम. आर. जी., गंगाधर आचरेकर ही याच निसर्गाची मोठी देन आहे.’ पु.लं.च्या त्या कौतुकाने आमच्या अंगावर क्षणभर हिरवे रोमांच उभे राहिले.

‘पुलं’ पुढे म्हणाले, ‘भारतीय संगीताचे पुढे काय होणार आहे,’ हे ‘हिऱ्याचे पुढे काय होणार आहे,’ असे विचारण्यासारखे आहे. हा हिराच आहे. त्याचेवर प्रकाश पडला की, तो लखलखणारच. तुम्ही नको म्हटले तरी! गंगाधार आचरेकरांचा हा ‘ग्रंथराज’ भारतीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक असाच राहील!’ ‘पुलं’ बोलत होते. आम्ही कान देऊन ऐकत होतो. भारतीय संगीतावर नंतर त्यांचे तासभर अभ्यासपूर्ण भाषण झाले. आमचे कान तृप्त झाले, आमच्या गावी हे आम्ही प्रथमच ऐकत होतो.

एका सायंकाळी ‘देवाचं अस्तित्व मान्य करता का’ या विषयावर मजेशीर परिसंवाद झाला. पु. ल. देशपांडे आपला किल्ला एकांगी लढवत होते; पण त्या परिसंवादात राम पुजारी, बाबा डिके, शरदचंद्र चिरमुले, अरविंद मंगळूरकर आदींनी ‘पुलं’च्या मुद्द्याचा चांगलाच परामर्श घेतला होता. पण आमच्या लक्षात राहिले ते ‘पुलं’चे मुद्देच अधिक! त्यांनी सर्वांना चिमटे आणि गुद्दे देऊन अक्षरश: हैराण केले.

एकदा दुपारीच लहर आली म्हणून सगळे सवंगडी झोपी गेले असतानाच पु. ल. देशपांडे रामेश्वर मंदिरानजीक असलेल्या वाचन मंदिरात येऊन टपकले. पुलंना काही वेळ अशी गंमत करण्याची लहर यायची. त्या वेळी वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून सत्तर वर्षाचे वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक काका दळवी काम करीत. वाचनालयाचे काम अगदी निष्ठेने व काटेकोरपणे करायचे. त्यांनी काही ‘पुलं’ना ओळखले नाही. (ओळख असूनही दाखविलीही नसेल. कारण ग्रंथपाल काका दळवी हे एक आचऱ्याचे अजब रसायन! माझा पहिला लेख त्यांच्यावरच आहे. ग्रंथपाल हेच गुरू! तेच हे काका दळवी!) त्यांची नजर थोडी अधू होती. पण वृत्ती करारी होती. त्यांच्यात आणि पु. ल. देशपांडे यांच्यात वाचनालयात झालेला, बाळासाहेब गुरव यांनी कथन केलेला, संवाद जसाच्या तसा आमच्या लक्षात आहे. आम्हाला मागाहून कळलेला.

पु. ल. देशपांडे – ‘काय हो, मी केव्हाची पुस्तकासाठी वाट बघतोय आहात कुठे?’
काका दळवी – ‘आत्ता घड्याळात तीन वाजले. वाचनालयात यायची वेळ तीनचीच आहे. ‘तीन’लाच उघडणार!
पु. ल. देशपांडे – ‘मला पु. ल. देशपांडे यांची असतील तेवढी पुस्तके हवी आहेत.’
काका दळवी – ‘मिळणार नाहीत! एकच मिळेल. तेही डिपॉझिट भरून. अण्णा गुरवांकडे उतरला असाल तर त्यांची चिठ्ठी आणा. अगर अण्णांना घेऊन या. त्यानी केलेले नियम मी मोडणार नाही. समजले?’


‘पुलं’ त्वरित अण्णाच्या मांगरात आले. त्यानी ही गंमत रामेश्वर वाचनालयाचे सेक्रेटरी अण्णा गुरव यांना सांगितली व त्यांनाच ते पालक म्हणून घेऊन पुन्हा वाचनालयात आले. अण्णा, काका दळवींना म्हणाले – ‘काका, हे पु.ल. देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ओळखलं नाहीत?’ तेव्हा काका म्हणाले, ‘मी नाही ओळखलं, मी तर त्यांना पहिल्यांदाच पाहतो. अहो देशपांडे, नमस्कार! तुमची पुस्तके आम्हांला दैवतासमान! ती प्राणापलीकडे या खेड्यात आम्ही जपतो. डिपॉझिट घेतल्याशिवाय कोणालाच वाचायला देत नाही. तुम्हाला मी बोललो असेन तर माफ करा! आज ‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले’ हो! नाही तर तुमची पुस्तके हेच आमचे ‘पुलं’ काका दळवींच्या बोलण्याने ‘पुलं’देखील गहिवरले! ‘पुलं’ म्हणाले, ‘काका दळवी! तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष ग्रंथपाल या वाचनालयाला लाभले आहेत. हे  वाचनालय ‘शताब्दीच’ काय, आपली सहस्राब्दीही वैभवात साजरी करेल!’

पुढे एक जानेवारी १९९४ रोजी ज्या वेळी रामेश्वर वाचन मंदिराची शताब्दी आम्ही दणक्यात साजरी केली, त्या वेळी आमच्या ‘ग्रंथ पालखीचे’ प्रमुख मानाचे भोई झालेले थोर साहित्यिक कोकणपुत्र श्रीपाद काळे होते. त्यांना मी पु. ल. देशपांडे आणि काका दळवी यांचा संवाद सांगितला. ते म्हणाले ‘ठाकूर, हे कुठेतरी लिखित करा म्हणजे ‘द्विशताब्दी’च्या वेळी कोणीतरी सर्वांना सांगेल. भाईंचे शब्द खरे झालेले असतील!’ आज ‘पुलं’ नाहीत, काका दळवीही नाहीत आणि श्रीपाद काळेदेखील नाहीत. आहेत त्या सोबत आठवणी! मन हेलावणाऱ्या.

शेवटच्या समारंभाच्या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते सर्व सत्तर अतिथींचा रामेश्वर सभामंडपात रामेश्वराचा फोटो देऊन सत्कार करण्यात येत होता. अध्यक्षस्थानी होते अर्थात ‘पुलं’! ते प्रत्येकाची खाशी ओळख सर्वांना करून देत. त्या वेळी सभामंडपात खसखस तरी पिकायची, टाळ्यांचा कडकडाट तरी व्हायचा, नाही तर शांतता पसरायची! वसंतराव आचरेकरांचा सत्कार करताना ‘पुलं’ म्हणाले, ‘तुमचा वसंता तालांचा बादशहा आहे. उद्या कोणीतरी म्हणेल इंग्लंडची व्हिक्टोरिया राणी कोण? तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण वसंताबाबत असं होणार नाही. त्याचे ताल मराठी मनामनात पोहोचलेत. संगीत ही अशी कला आहे तिथं फसवता येत नाही. सूर म्हणजे सूरच लागावा लागतो. ताल म्हणजे तालच यावा लागतो. मनुष्य कितीही श्रीमंत असला अगदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तरी त्रिताल हा सोळा मात्रांतच घ्यावा लागतो. तिथं सतरावी मात्रा चालत नाही आणि पंधरावीही. हसविण्याचा माझा धंदा! आणि वसंताचा न फसविण्याचा धंदा! अरे, तो काही झाले तरी तालाचा सम्राट आहे.’

अशा कौतुकानेही सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट होई. एम.आर. आचरेकरांचे कौतुक करताना ‘अरे, तुमचे हे एम. आर.! राज कपूरच्या ‘श्री ४२०’, ‘आवारा’पासून कालच्या ‘बॉबी पर्यंत राजकपूरच्या मागे ‘आर्ट डायरेक्टर’ म्हणून खंदे उभे आहेत. म्हणून राज कपूर उभा आहे!’ अशा कौतुकानेही एक प्रकारची शांतता पसरे आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट होई. ती समदेखील बरोबर साधली जाई!

सर्व मंडळी जायला निघण्यापूर्वी अण्णा गुरवांच्या घरी एक आगळा सोहळा संपन्न झाला. सोलापूरचे खंदे वक्ते व ‘पुलं’चे जिगरदोस्त राम पुजारी सर्वांना म्हणाले, ‘अरे, सर्वांचे सत्कार झाले, पण ज्याने आम्हाला आठ दिवस सुग्रास भोजन करून घातले त्या आचारी ‘यल्लप्पा’ चा सत्कार व्हायला हवा.’ झाले पु. ल. देशपांडे आणि त्यांचे सर्व ‘मैत्र जिवांचे’ कामाला लागले. गुरवाच्या खळ्यात ‘बल्लवाचार्य’ यलप्पाचा सत्कार सर्वांनी आयोजित केला.

अध्यक्षस्थानी होते राम पुजारी. ते प्रारंभी बोलले, नंतर सर्व वक्ते बोलले, राम पुजारी म्हणाले, ‘आज यल्लप्पाच्या सत्काराचे अध्यक्षपद मला देण्यात आले आहे. त्याचे हे एक गुपित आहे. कुमारजीपासून एम. आर. आचरेकरांपर्यंत आणि नारायण पंडितापासून पु. ल. देशपांडेंपर्यंत हे सर्व माझे दोस्त आचरे येथे सपत्नीक आले आहेत. केवळ मीच शिडाफटिंग माणूस आहे! या सर्व महान व्यक्तींना कदाचित आपआपल्या पत्नीसमोर ‘यल्लप्पा’च्या  सुग्रास भोजनाचे कौतुक करणे जड जात आहे. कारण उद्यापासून प्रत्येकाला आपल्या सौभाग्यवतीने केलेले कदान्न, पक्वान्न म्हणून खावे लागणार, अशी ही लबाड माणसं! (टाळ्या)’ अशा तऱ्हेने त्या छोटेखानी कार्यक्रमातच एक प्रकारची मजा आली. नंतर इतर सर्व वक्ते दणकून बोलले. शेवटी ‘पुलं’ बोलले. पु.लं. यल्लप्पावर भरभरून बोलले. त्या बिचाऱ्याला मराठी समजत नव्हते. तरी ‘पुलं’च्या चेहऱ्यावरील भाव त्याला समजत होते. तो अक्षरश: ढसाढसा रडला. रंगमंचावरील कलावंतासोबत पडद्यामागील कारागिराच्या श्रमाची कदर कशी केली जाते हेही, आम्ही अगदी जवळून पाहिले.

‘पुलं’च्या शब्दात सांगायचं झालं तर, ‘आज आमचा आचरे येथील घास संपला.’ आठ दिवस राहून सर्व मंडळी आली तशी त्याच गाड्यातून भुर्रऽऽकन निघून गेली. आमचं गाव खऱ्या अर्थानं रितं झालं. आमचीही तंद्री पुरती उतरत नव्हती. ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ नावाचे एक लोकविलक्षण, विविधगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आपल्या साठ-सत्तर मित्रांसमवेत आपल्या गावी चक्क आठ दिवस मुक्कामाला होते. या एका वेगळ्या तंद्रीत असताना देवस्थानचे ट्रस्टी बाळासाहेब गुरव तथा अण्णा गुरव यांना ‘पुलं’चे पत्र आले.

त्याचा शेवटचा परिच्छेद असा होता, ‘साठ-सत्तर पाहुण्यांची देखभाल करायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तुम्ही ज्या आपुलकीने आमचा पाहुणचार केलात त्याबद्दल आभार हे शब्द वास्तविक अपुरे आहेत, याची मला जाणीव आहे. देवळाची शोभा देवाएवढीच त्या परिसरातल्या माणसांच्या चांगुलपणामुळे, स्नेहभावामुळे वाढत असते. तुम्ही या गुणांनी केवळ आम्हांलाच नव्हे तर, सर्व पाहुणे मंडळींना जोडले आहे. पुन्हा आचऱ्याला येण्याचा योग केव्हा येईल, काय सांगावे? पण पुन्हा यावेसे वाटेल ते तुमच्या सर्वांच्या सहवासातील अगत्यामुळे हे निश्चित! कळावे, लोभ असावा.
तुमचे पु. ल. देशपांडे’

त्यानंतर या अशा वलयांकित व्यक्तींना अगदी जवळून पाहिल्याचे, अनुभवल्याचे आम्ही सर्वांना सांगत राहिलो. त्या प्रसंगाची दुर्मिळ छायाचित्रे दाखवून आमची ही श्रीमंती इतरांना वाटत राहिलो. ‘पुलं’चा मराठी विश्वात संचार अनभिषिक्त सम्राटासारखा चालूच होता.

त्यानंतर त्यांना ‘पार्किन्सन’सारख्या असाध्य रोगाने गाठल्याचे वाचले. सर्व जगभर प्रवास करणारे हे कलावंत प्रवासी, घरातच व्हीलचेअरवर असतात, ही बातमी वाचून वाईट वाटायचं! आणि एके दिवशी, १२ जून २००० रोजी, त्या दिवशी सोमवार होता; अण्णा गुरवाचा मला दुपारी तीन वाजता फोन आला. ‘अरे, तुला बातमी समजली? ‘पुलं’ गेले; आत्ताच टी.व्ही.वर सांगितलं. फार वाईट झालं.’
‘फार वाईट झालं’ यापेक्षा अण्णा काही बोलू शकले नाहीत. ‘पुन्हा आचऱ्याला येण्याचा योग केव्हा येईल काय सांगावे? पण पुन्हा यावेसे वाटेल ते तुमच्या अगत्य सहवासामुळे’ हीच दोन वाक्ये सारखी आठवू लागली.


आयुष्याची चव घेत घेत जगणारा एक आनंदयात्री गेला! हिमालयाच्या उंचीचा एक कलावंत काळाच्या पडद्याआड गेला! एक ‘पुलं’ पर्व संपलं! पण त्यांच्या त्या पुलकित दिवसांचा तो स्वर्गीय ठेवा आम्ही प्रत्येक आचरेवासीयांनी जपून ठेवला आहे.’ ‘मम सुखाची ठेव’… म्हणूनच!

– सुरेश ठाकूर 
संपर्क : 
९४२१२ ६३६६५

(सुरेश ठाकूर यांचे शतदा प्रेम करावे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले असून, त्याचे ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

2 comments

  1. सध्याच्या निवांतक्षणी पुल.आणि आचरेकरांसारख्या कोकणरत्नांच्या आठवणीना या लेखातून उजाळा मिळाला.वेळ सार्थकी लागला. धन्यवाद!!!

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s