करोनाविषयक सायबर गुन्हेगारीपासून रत्नागिरी जिल्हा मुक्त

रत्नागिरी : करोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव घेण्यासारखे नसले, तरी अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर रत्नागिरी जिल्ह्याने अजिबात केलेला नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाने करोनाप्रतिबंधक संचारबंदीच्या काळात प्रभावी कारवाई सुरू ठेवली आहे. राज्यात आतापर्यंत करोनाविषयक अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध १६१ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून सायबरविषयक एकही गुन्हा दाखल झालेला नाही.


सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभाग या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर याकरिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १६१ गुन्हे कालपर्यंत (दि. ९ एप्रिल) दाखल झाले आहेत. त्यामध्ये बीडमध्ये २२, कोल्हापूर १३, पुणे ग्रामीण १२, मुंबई ११, जळगाव १०, जालना ९, नाशिक ग्रामीण ८, सातारा ७, , नांदेड ६, नागपूर शहर ५, नाशिक शहर ५, परभणी ५, ठाणे शहर ४, बुलढाणा ४, गोंदिया ३, भंडारा ३, अमरावती ३, लातूर ३, नंदुरबार २, नवी मुंबई २, उस्मानाबाद २ आणि हिंगोलीतील एका गुन्ह्याचा समावेश आहे.


या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले, तेव्हा निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉर्वर्ड केल्या प्रकरणी ८९, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी ३, आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३, तर ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब इत्यादी अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ३६ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी करोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. त्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मुंबईत काल कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपीने एका विशिष्ट मेडिकल स्टोअरच्या स्टाफला करोना व्हायरसची बाधा झाल्याने कोणी त्या दुकानातून खरेदी करू नये, अशा आशयाचा खोटा मेसेज पसरविला होता. हा आणि अशा पद्धतीचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. ते टाळण्याची दक्षता घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.

Leave a Reply