ठाण्याच्या साने दांपत्याची गाण्यातून करोनाप्रतिबंधक संदेशांची साप्ताहिक मालिका

ठाणे: करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमध्ये काय करावे, हा अनेकांना प्रश्न पडतो. याबाबत शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले जात आहे. ठाण्यातील एका कलाकार दांपत्याने हेच प्रबोधन कलात्मक पद्धतीने करायचे ठरविले आणि समाजमाध्यमांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

लॉकडाऊनचा काळ आनंदात घालविण्यासाठी अनेक उपाय सुचविले जात आहेत. मन प्रसन्न ठेवण्यासाठी हेमंत साने आणि मेघना साने या ठाण्यातील कलाकार दाम्पत्याला एक युक्ती सापडली. आपल्या निरनिराळ्या कलांचा आविष्कार त्यांनी यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून केला आणि नव्याने या कलेला जागतिक व्यासपीठ मिळाले. घरातच दोनच व्यक्तींमध्ये पहिले दोन व्हिडीओ बनवून सरकारचे आदेश कसे पाळावे, असा सोशल मेसेजेस त्यांनी दिला. या व्हिडीओंना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पहिला व्हिडीओ अविनाश चिंचवडकर यांच्या ‘दिवस घरी हे बसायचे’ या विडंबनगीतावर चित्रित केला होता. त्याला एका दिवसात जगभरातून ५० हजार लाइक्स आले. अजूनही लाइक्सचा ओघ सुरू आहे. त्यानंतर त्यांनी दर आठवड्याला एक याप्रमाणे व्हिडीओ तयार करण्याचे सातत्य ठेवले. चौथा व्हिडीओ ‘दुनियामें रहना है तो मास्क पहन प्यारे’ या मेघना साने यांनी लिहिलेल्या विडंबनगीतावर होता. तोही खूप लोकप्रिय झाला. ‘हम तुम’ हा व्हिडीओ जेष्ठ दाम्पत्यांनी एकमेकांची काळजी कशी घ्यावी, हे दाखवणारा होता. घरी राहावे, घरकामात सर्वांनी मदत करावी, असे सूचित करणारे व्हिडीओही आहेत. नमस्कार करावा, उगीच बाहेर भटकू नये हे विनोदी पद्धतीने सांगितले आहे. अशा तऱ्हेने लॉकडाऊनच्या काळातील सरकारचे संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले आहे.

या सर्व व्हिडीओची निर्मिती मेघना साने यांची आहे. हेमंत साने यांनी सादरीकरण केले. विवेक मेहेत्रे यांनी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा व मार्गदर्शन केले.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साने दांपत्याने आणखी एक नवीन चॅनल यूट्यूबवर सुरू केले. त्यात पाहिले गीत राज्याचे माहिती महासंचालक आणि प्रसिद्ध गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आहे. हेमंत साने यांनी संगीत दिले आहे. वैशाली मेहेत्रे यांनी या व्हिडीओची सुंदर सजावट केली आहे. “लॉकडाऊनच्या काळात रसिकांच्या मनोरंजनासाठी आम्ही दर आठवड्यात अशा सुंदर गाण्यांची निर्मिती करत राहू”, असे मेघना साने यांनी सांगितले.
(संपर्क ९८९२१५१३४४)

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply