रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी महिला करोनाबाधित, रुग्णसंख्या अकरा

रत्नागिरी : जिल्ह्यात आज आणखी एक करोनाबाधित महिला रुग्ण आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. ती महिला ६५ वर्षांची असून मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ती गेली होती. तेथून परतल्यानंतर तिला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही महिला सध्या दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे. या महिलेच्या स्वॅबचा नमुना मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज मिळाला असून त्यामध्ये त्या महिलेला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनाची बाधा झालेली ती पाचवी महिला असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता अकरा झाली आहे, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पाच आहे.

ही महिला दापोली तालुक्यातील माटवण-नवानगर येथील रहिवासी असून तिला करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तत्काळ माटवण-नवानगर गाव कन्टेन्मेंट एरिया म्हणून आणि शेजारचा भाग बफर झोन म्हणून प्रतिबंधित करण्याची कार्यवाही दापोलीच्या तालुका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली.

Leave a Reply