रत्नागिरीत करोनाचा दुसरा बळी; दापोलीतील महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील एका करोनाबाधित महिलेचा आज (१० मे) रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना बळींची संख्या दोन झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधितांची आजपर्यंतची संख्या ४२ असून, त्यापैकी पाच जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दापोलीतील ६५ वर्षांच्या करोनाबाधित महिलेचा आज (१० मे) सायंकाळी साडेसात वाजता रत्नागिरीत मृत्यू झाला. तिला २९ एप्रिल रोजी शस्त्रक्रियेसाठी मुंबईत सायन रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र तिला जेजे किंवा केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावे, असे तेथील डॉक्टर्सनी सांगितले होते; मात्र तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी वाहनाने दापोलीत आणले. तिचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज (१० मे) प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आठ जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी चार जण संगमेश्वरात, तर तीन जण रत्नागिरीत क्वारंटाइन होते. या सर्वांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. एक रुग्ण रत्नागिरीतील असून, यापूर्वी करोनाबाधित झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील ती व्यक्ती आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply