रत्नागिरीत नवे १६ करोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्येचे शतक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल (१९ मे) १६ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र आज (२० मे) पुन्हा नवे १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या १०६ झाली आहे. (रत्नागिरीच्या नर्सिंग स्टाफ मधील दोघींचा अहवाल पुन्हा प्राप्त झाल्याने आज सकाळी एकूण बाधितांची संख्या १०८ सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात बाधितांची संख्या १०६ आहे, असे जिल्हा करोनाविषयक बुलेटिनमध्ये सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आले आहे.)

जिल्ह्यातील १०६ करोना रुग्णांपैकी आतापर्यंत ३३ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ७० करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१९मे रोजी रात्रीनंतर मिरजमधून ८२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६६ अहवाल निगेटिव्ह असून, १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरीतील सहा, संगमेश्वरातील सहा आणि गुहागरातील चार अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती विलगीकरणात होत्या. तसेच, त्यातील बहुतेक जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील धामापूर (२), कोळंबे (२), भिरकोंड (१), कसबा (१), गुहागर तालुक्यातील शृंगारतळी (४), रत्नागिरी तालुक्यातील कर्ला (१), रत्नागिरी (१) या गावांतील आहेत. तसेच, चार रुग्ण रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेलमधील आहेत. (त्यापैकी दोघींचा अहवाल पुन्हा आला आहे.)

One comment

  1. प्रत्येक क्षणाचा अपडेट्स मस्त

Leave a Reply