दिवसभरात रत्नागिरीत २४ आणि सिंधुदुर्गात एका रुग्णाची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या १५६

रत्नागिरी : आज (२४ मे) सायंकाळी व रात्री मिरजमधून प्राप्त झालेल्या अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १५६वर पोहोचली आहे. आज (२४ मे) सकाळीच १३ रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत आज २४ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेले सहा अहवाल कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे आहेत. तळे (ता. खेड) या गावातील एका कुटुंबातील चार जणांचा त्यात समावेश आहे. हे सगळे जण मुंबईतून आले होते आणि ताप असल्याचे आढळल्याने क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यात दोन स्त्रिया आणि दोन पुरुष आहेत. या व्यतिरिक्त अन्य दोन रुग्ण पुरुष असून, तेदेखील मुलुंड आणि ठाणे येथून आलेले आहेत. ठाण्यातून आलेल्या युवकाचे गाव वेरवली (ता. लांजा) असून, मुलुंड येथून आलेल्या रुग्णाचे गाव दयाळ (ता. खेड) हे आहे.

आज रात्री आढळलेल्या पाच नव्या रुग्णांपैकी दोन रुग्ण वांझोळे (ता. संगमेश्वर) या गावातील असून, एक रुग्ण सडेजंभारी (ता. गुहागर) येथील आहे. एक रुग्ण पांगरी (ता. संगमेश्वर) येथील असून, अन्य एक रुग्ण लाजूळ (ता. रत्नागिरी) येथील आहे.

आज सकाळी जे १३ रुग्ण सापडले, त्यात चार स्त्रिया आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. सर्वांचा मुंबई प्रवासाचा इतिहास असून, सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन होते. हे रुग्ण कळंबट, कळंबस्ते, वाघिरे मोहल्ला (चिपळूण), मानसकोंड, निवे (संगमेश्वर), भोके, करबुडे, हरचिरी (रत्नागिरी), वाघ्रट (लांजा), राजापूर या गावांतील आहेत.

सिंधुदुर्गात आणखी एक रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (२३ मे) आठ नवे रुग्ण सापडले होते. आजही (२४ मे) एक नवा रुग्ण जिल्ह्यात सापडला आहे. कुडाळ तालुक्यातील ५२ वर्षांच्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ती १७ मे रोजी मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली. २० मे रोजी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता १७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यापैकी सात रुग्ण करोनामुक्त झाले असून, १० जणांवर उपचार सुरू आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply