करोना विलगीकरण केंद्रासाठी रिमोट कंट्रोल्ड कार्टची निर्मिती

देवरूख : करोना विलगीकरण केंद्रासाठी रिमोट कंट्रोल्ड कार्टची निर्मिती आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बनविली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार्ट बनविण्यात आली आहे.

करोना व्हायरसचा विळखा जगासह आपल्या देशातही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. करोनाबाधितांचे विलगीकरण करणे तसेच त्यांना त्याठिकाणी आवश्यक सुविधा प्राप्त करून देण्याचे काम शासन स्तरावर हाती घेण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूल आणि अन्य ठिकाणी विलगीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

विलगीकरण केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे. याचा विचार करून आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ब्लूटूथद्वारे नियंत्रित होणाऱ्या कार्टची निर्मिती केली. ही बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे १० मीटरपर्यंत आणि जवळपास ९० किलो वजनापर्यंतच्या सामग्रीची ने-आण करणे शक्य आहे. रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधे देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल. त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता लाभेल. महाविद्यालयाचे प्रा. इसाक शिकलगार आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतीक महाडिक यांनी ही कार्ट तयार केली आहे.

संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने यांच्या हस्ते संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे ही कार्ट आज सुपूर्द करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी आर. एम. दारोकार, पोलीस निरीक्षक निशा जाधव, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, पद्मनाभ शेलार आदी उपस्थित होते. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या या एकात्मिक प्रयत्नाबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित कार्टसोबत राजेंद्र माने कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply