सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ रुग्णांची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या २०८वर

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या मर्यादित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत आज (२९ मे) एकदम १५ रुग्णांची वाढ झाली. २८ मे रोजी रात्री सहा, तर २९ मे रोजी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३९ झाली असून, ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९ मे) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १२ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०८ झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधित गावांची यादीही आज जाहीर करण्यात आली. (हे सर्व मुद्दे विस्ताराने खाली दिले आहेत.)

सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या ३९वर
काल रात्री (२८ मे) जे सहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये कणकवली तालुक्यातील बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, वेगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील एक, सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ७९ वर्षीय मृत महिलेचा अहवालही पॉजिटिव्ह आला आहे. या महिलेचा मृत्यू २३ मे रोजी झाला होता. ती महिला १९ मे रोजी मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली होती. २० मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करुन स्वॅब घेण्यात आला होता. या महिलेला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा जुना आजार होता. २८ मे रोजी अहवाल प्राप्त झालेले सर्व रुग्ण मुंबईतून जिल्ह्यात आलेले असून, आल्यापासून ते सर्व जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

आज दुपारी (२९ मे) आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील एक, हरकुळ बुद्रुक येथील एक, पियाळी येथील एक, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी येथील एक, माडखोलमधील एक, इगवेवाडीतील एक, तर वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वॅब २२ मे २०२० रोजी घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (२९ मे) प्राप्त झाले. आज संध्याकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तो रुग्ण मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील आहे.

त्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३९ झाली आहे. त्यापैकी सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूब नगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक अलगीकरणातील रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी रुग्ण गृह अलगीकरणात सापडले आहेत, त्याच ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०८
रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९ मे) काळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १२ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०८ झाली आहे. आतापर्यंत ८३ जणांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले, तर आतापर्यंत करोनाची बाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १२० रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ७४४ जणांचे नमुने करोनाविषयक तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी पाच हजार १३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरज येथील प्रयोगशाळेकडे ३९२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत परवानगी घेऊन बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांची संख्या ९७ हजार ९२४ आहे, तर बाहेरगावांहून आल्याने ८८ हजार ६१ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय २०६ जण विविध ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात, तसेच परराज्यात गेलेल्या मजुरांची संख्या ३५ हजार १५० असून, त्यातील ९ हजार २०६ जण रेल्वेने गेले, तर इतर सारे जण खासगी बसेस किंवा एसटीने गेले आहेत.

रत्नागिरीतील करोनाबाधित गावांची यादी जाहीर
करोनाचे रुग्ण आढळल्याने रत्नागिरी तालुक्यातील मौजे उक्षी, नाणीज, भंडारपुळे, नाचणे-शांतीनगर, तरवळ, तर संगमेश्वर तालुक्यातील देवडे, दाभोळे, कोंडगाव ही गावे करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी विकास सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवांमधील सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादी, तसेच अन्य वितरक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची वाहने वगळता अन्य सर्वांना या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करायला आणि त्या क्षेत्रातून बाहेर जायला परवानगी राहणार नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या गावांची किंवा तालुक्यांची माहितीही यापुढे दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. केवळ रुग्णांची संख्या दिली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने जारी केलेल्या निर्देशांप्रमाणे साथरोग नियंत्रण कायद्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार करोनाबाधितांची नावे, त्यांचे पत्ते आणि नातेवाईकांची माहिती प्रसिद्ध करता येणार नसल्याने ही माहिती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींची नावे प्रसिद्ध करण्यासही मनाई करण्यात आली आहे. असे करणे हा दंडनीय अपराध मानला जाईल, असेही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाबाधित रुग्ण ज्या गावात आढळतील, ती गावे प्रतिबंधित म्हणून त्या त्या वेळी घोषित केली जाणार आहेत. त्यावरून कोणत्या गावात करोनाबाधित आढळले आहेत, त्याची माहिती मिळणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply