रत्नागिरीत एका दिवसात रत्नागिरीत वाढले करोनाचे ४७ रुग्ण

रत्नागिरी : काल (२९ मे) रात्रीपासून आज (३० मे) सायंकाळपर्यंत मिरज येथील विषाणू प्रयोगशाळेकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या अहवालांनुसार, जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत ४७ने वाढ झाली आहे. काल (२९ मे) रात्री २५ रुग्ण आढळले होते. आज सायंकाळी आणखी २२ रुग्णांची त्यात भर पडली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

आज सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार संगमेश्वरमधील सहा, तर रत्नागिरी आणि कामथे येथील प्रत्येकी आठ जण करोनाबाधित आहेत. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून २५ जण करोनाबाधित असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्यांचे विवरण देण्यात आले नव्हते. आता जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २५६ झाली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एकूण बाधितांची संख्या सध्या २३० आहे. मिरज येथील प्रयोगशाळेकडे आणखी ३२९ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आज रत्नागिरी आणि कळंबणीतून प्रत्येकी दोन, तर वेळणेश्वर येथून चौघांना घरी जाऊ देण्यात आले. आज सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७९५ जण बाहेरच्या जिल्ह्यांतून दाखल झाले आहेत. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात, तसेच परराज्यात ३७ हजार ७३ जण निघून गेले आहेत. त्यापैकी १० हजार २३१ जण विशेष श्रमिक रेल्वेने रवाना झाले, तर बाकीचे खासगी बसेस किंवा एसटीने गेले आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या ९२ हजार ३२८, तर संस्थात्मक क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या १९१ आहे.

(सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

One comment

Leave a Reply