रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या २६९; सिंधुदुर्गातील संख्या ५६वर

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आज (३१ मे) २६९वर पोहोचली असून, करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या नऊवर पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज तीन नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची एकूण संख्या ५६ झाली आहे.

आज (३१ मे) सकाळी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २६९ झाली आहे. जिल्ह्यातील दोन रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल होताच तासाभरात मृत्यू झाला; मात्र तत्पूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (३१ मे) मिळाले आहेत. ते दोघेही रुग्ण करोनाबाधित असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. तसेच, आज आणखी एका रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यासह जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या आता नऊ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विविध रुग्णालयांमध्ये सध्या १५८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आज (३१ मे) सायंकाळी देण्यात आली. दरम्यान, लांजा येथे घरीच विलगीकरणात असलेल्या तीन रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ९३ हजार ४५८, तर संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या १८६ आहे. त्यापैकी सर्वाधिक ३६ जण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

सिंधुदुर्गात रुग्णसंख्या ५६
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज (३१ मे) प्राप्त झालेल्या १२३ अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले. आज पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये मालवण, कणकवली आणि देवगड तालुक्यातील प्रत्येकी एकाच समावेश आहे. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५६ झाली आहे. त्यापैकी सात जण बरे होऊन घरी गेले असून, एक जण उपचारांसाठी मुंबईत गेला आहे. सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकूळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकूळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्यातील पणदूर-मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेन्मेंट झोन आहेत.

Leave a Reply