करोना रुग्णसंख्येत दिवसभरात रत्नागिरीत २०, तर सिंधुदुर्गात १३ने वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन जून) सकाळी आणि सायंकाळी मिरज येथील प्रयोगशाळेकडून आलेल्या करोनाविषयक अहवालांनुसार जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०ने वाढली आहे. सकाळच्या अहवालात १०, तर सायंकाळच्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण बाधितांची संख्या ३०७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दोन जून) दिवसभरात करोना रुग्णांच्या संख्येत १३ने वाढ झाली. त्यामुळे तेथील बाधितांची एकूण संख्या ८५ झाली आहे.

रत्नागिरीची स्थिती
रत्नागिरीत काल रात्री (एक जून) मिळालेल्या अहवालाची माहिती आज सकाळी देण्यात आली. त्यानुसार नऊ रुग्ण संगमेश्वरच्या रुग्णालयात दाखल आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू ३० मे रोजी झाला होता. त्याचा अहवाल काल रात्री मिळाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १० झाली आहे. दरम्यान, आज (दोन जून) सायंकाळी मिळालेल्या अहवालांनुसार कामथे येथील चार, संगमेश्वर आणि दापोलीतील प्रत्येकी दोन, तर रत्नागिरी आणि राजापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. आज चार रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२० झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये १६८ रुग्ण सध्या उपचारांखाली आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १० हजार २० चाकरमानी दाखल झाले आहेत, तर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेले मजूर आणि इतरांची संख्या ४० हजार १०७ आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या ७८ हजार ९२, तर संस्थात्मक क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या १७३ आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयास आज (दोन जून) प्राप्त झालेल्या १३६ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कुडाळ तालुक्यातील दोन, कणकवली तालुक्यातील दोन, देवगड तालुक्यातील दोन, मालवण तालुक्यातील सहा, सावंतवाडी तालुक्यातील एक आणि वेंगुर्ला तालुक्यातील एका अहवालाचा समावेश आहे. एका रुग्णाचे दोन स्वॅब घेण्यात आले होते. त्यामुळे पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १४ आहे. परंतु दिवसभरात रुग्णांची संख्या १३ने वाढली आहे.
जिल्ह्यातील एकूण ८५ करोनाबाधित रुग्णांपैकी आठ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून, तसा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply