रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जून) दिवसभरात १९ जणांना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २७९ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज नवा करोनारुग्ण सापडला नसून, १२ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (१३ जून) सायंकाळच्या स्थितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४०२ असून, त्यात १६ मृतांचा समावेश आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १०६ जण उपचारांखाली आहेत. बरे झाल्याने आज घरी सोडण्यात आलेल्या १९ रुग्णांमध्ये सावर्डे कोव्हिड केअर सेंटरमधील सात, समाजकल्याण भवनातील सहा, जिल्हा रुग्णालयातील एक, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही दापोली येथील तीन आणि साडवलीतील दोघांचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या १० अहवालांमधील पाच जण रत्नागिरीतील, एक रुग्ण कामथे येथील असून, दापोली आणि संगमेश्वर येथील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यातील दापोलीतील एक रुग्ण गेल्या ११ जून रोजी दाखल करण्यासाठी आणले असता मरण पावला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १६ झाली आहे.
सध्या संस्थात्मक विलगीकरणात ५० जण आहेत. होम क्वारंटाइन असलेल्यांची संख्या ९४८ने वाढली असून, ती आता ५२ हजार ८३१ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ झाली आहे. आज (१३ जून) एकही नवा रुग्ण सापडला नाही. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४९ असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबईत गेला आहे, तर ८९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत १९० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. या मशीनद्वारे नऊ जूनपासून जिल्ह्यात करोनाची तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून एक ट्रुनॅट मशीन प्राप्त झाल्यामुळे तपासणीचा वेग वाढला आहे. त्यामुळे एकूण दोन ट्रुनॅट मशीनद्वारे सिंधुदुर्गात तपासणी सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात एक हजार ७०९ जण करोनाबाधित
रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या एक हजार ७०९ झाली असून, आतापर्यंत एक हजार २३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
आज (१३ जून) ५७ नव्या करोनाबाधित रुग्णांची रायगड जिल्ह्यात नोंद झाली असून, सध्या जिल्ह्यात ३९७ जण उपचारांखाली आहेत. त्यांची केंद्रनिहाय आकडेवारी अशी – पनवेल मनपा – २५१, पनवेल ग्रामीण – ६४, उरण – १९, खालापूर – ३, कर्जत – ७, पेण – १२, अलिबाग – ६, मुरुड – ३, माणगाव – ६, रोहा – १, म्हसळा – ११, महाड – ७, पोलादपूर – ७ अशी एकूण ३९७ झाली आहे.
करोनामुक्त झालेले एक हजार २३८ रुग्ण असे – पनवेल मनपा – ६३८, पनवेल ग्रामीण २१२, उरण – १५९, खालापूर – १०, कर्जत – २४, पेण – १३, अलिबाग – ३६, मुरुड – १३, माणगाव – ४६, तळा – १२, रोहा – २३, सुधागड – २, श्रीवर्धन – ९, म्हसळा – १८, महाड – १० पोलादपूर – १३.
आज दिवसभरातही पनवेल मनपा – २२, पनवेल ग्रामीण – २, तळा – १ असे एकूण २५ नागरिक करोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा – ३९, पनवेल ग्रामीण – ११, उरण – १, खालापूर – १, कर्जत – ४, अलिबाग – ३, मुरुड – २, माणगाव – १, तळा – १, श्रीवर्धन – २, म्हसळा – ३, महाड – ५, पोलादपूर – १ असे एकूण ७४ नागरिक मरण पावले. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोनाविरोधातील लढाईत दुर्दैवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील करोनाबाधित रुग्णसंख्येत पनवेल मनपा – ३७, पनवेल (ग्रा) – १६, उरण – २, अलिबाग – १, माणगाव – १ अशी ५७ ने वाढ झाली आहे. आजच्या दिवसात तीन व्यक्तींची (पनवेल मनपा – २, माणगाव – १) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून ५ हजार ३२४ नागरिकांचे स्वॅब मुंबईत कस्तुरबा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ३ हजार ५०६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
