रत्नागिरीतील आठ दिवसांच्या लॉकडाउनचे आदेश जारी; काय सुरू, काय बंद?

रत्नागिरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, कोव्हिड-19 उपाययोजना आणि भारतीय दंड विधानातील कलम 144 नुसार ठोस उपाययोजना म्हणून करोना विषाणू साखळी तोडण्यासाठी उद्यापासून (दि. १ जुलै) ८ जुलैपर्यंत लॉकडाउनचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले.

दोन दिवसांपूर्वी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश आज जारी करण्यात आले.

लॉकडाउननुसार याअतंर्गत कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सीमा या कालावधीत बंद असतील. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद राहील. अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे व सहा फुटांचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. दुकानात एका वेळी पाचपेक्षा जास्त ग्राहकांना बंदी आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमेल अशी कोणतीही कृती करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. असे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कामाच्या ठिकाणी थर्मल, स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर ठेवणे सुरू राहणाऱ्या आस्थापनांच्या प्रमुखांवर बंधनकारक असेल. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागांचे निर्जंतुकीकरणदेखील बंधनकारक असेल.

काय सुरू राहणार –
आपत्ती व्यवस्थापन आणि अत्यावश्यक सेवांच्या आस्थापना आणि कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह, तर अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा आणि स्वच्छता करणाऱ्या यंत्रणा तसेच बँका, टपाल, कुरियर, दूरध्वनी आणि इंटरनेट पुरविणाऱ्या आस्थापना, ऑनलाइन शिक्षण, आयटी आस्थापना, ई-कॉमर्स (जसे ॲमेझॉन) यांच्या सेवा सुरू राहतील.

अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, दूधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू राहतील. मांस/मासे आणि अंडी यांची दुकाने बुधवार, शुक्रवार व रविवारी सुरू राहतील.

रुग्णालये, वैद्यकीय आस्थापना, मेडिकल दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने व देखभाल केंद्र तसेच पाळीव प्राण्यांची पशुवैद्यक आस्थापना व दुकाने सुरू राहतील. सर्व प्रकारचे उद्योग व त्यासंबंधी असणाऱ्या व्यवसायाच्या आस्थापना ऑइल, गॅस व ऊर्जा संसाधनांच्या आस्थापना व गोदामे सुरू राहतील.

प्रसारमाध्यमे व इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू राहील. शासकीय कामे, शेती कामे, कृषीमाल प्रक्रिया व साठवणूक, सर्व बंदरे व त्याच्याशी निगडीत बाबी सुरू राहतील. अंत्यविधीसाठी करोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेत २० जणांसाठी परवानगी असेल. ऑनलाइन मागणी स्वीकारून मद्यविक्रीची घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.

निसर्ग चक्रीवादळामुळे पुनर्बांधणी, पंचनामे व मदत वाटप करणारी कार्यालये सुरू असतील. ज्या घटकांना कामकाज सुरू ठेवण्याची मुभा आहे, त्यांनी अत्यावश्यक बाबीसाठी ओळखपत्र व वाहनावर स्वयंघोषित फलक लावून प्रवास वा वाहतूक करता येईल.

अत्यावश्यक सेवा व त्यांच्या आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू असतील. सायंकाळी ५ ते सकाळी ९ या कालावधीत केवळ वैद्यकीय तपासणीखेरीज घराबाहेर पडता येणार नाही. याखेरीज कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास संबंधित तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकार राहील*

या सवलती कंटेनमेंट झोनमध्ये लागू असणार नाहीत. त्यासाठीचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. Ajunahi lok cleanliness babat jagrut nahit… Thunklyavr dand ahe he mahit asun hi tyana farak padat nahi mhnje ch tyakade laksh dile jat nahi…. Fakt adesh denya peksha tyavar action ghetli geli pahije…. Kachara suddha rastyavr padlela asato…Itaka kathin Kal yeun hi lok sudharat nahit… Ya kade laksh dyav hi mazi kalkalichi vinanti ahe….Karan ajun schools chalu zalya nahit tar hi situation ahe…. Schools suru zalyavr he khup mahagat padel…. Mi 1 teacher ahe…. Lahan mulana kas control madhe thevta yeil….. Shist lagali tar ch farak padel…… Gadi cha number direct RTO madhe pochto tar ghan karnaryacha foto ka nahi pochat….. Plz ya vr vichar karava… 🙏

Leave a Reply