आदिपंढरी वालावलच्या नारायणाची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात आषाढी एकादशीला होणारा उत्सव यंदा करोनामुळे मोजक्या उपस्थितीत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने, हे मंदिर आणि उत्सवाची माहिती देणारा लेख…
…………
वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात कर्ली नदीच्या काठावर वसलेले हे अत्यंत रमणीय गाव आहे. कुपीचा डोंगर, सौंदर्यपूर्ण कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे गाव कीर्ती मिळवून आहे. गावात श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. याच मंदिरामुळे ‘आदिपंढरी’ अशी वालावल गावाची ओळख आहे.

भगवान परशुरामाने कोकण प्रदेश वसविल्यापासून आर्यांची अधिसत्ता येथे सुरू झाली असावी. इसवी सन पूर्व २५०च्या सुमारास मौर्यवंशीय सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा प्रदेश होता, असे १८२२ साली तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात नालासोपारा येथे सापडलेल्या शिलालेखावरून दिसून येते. सम्राट अशोकाच्या अखेरच्या काळात मौर्य सत्ता नष्ट होऊन हा प्रदेश सातवाहन किंवा शालिवाहन राजघराण्याकडे आला. शालिवाहन राजघराण्याचा पहिला राजा सिमुक इसवी सनापूर्वी ७३व्या वर्षी गादीवर बसला. पैठण ही त्याची राजधानी होती. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्य कुळातील राजांनी हा भाग जिंकला. त्यांची राजधानी वातापीपूर (आत्ताचे विजापूर जिल्ह्यातील बदामी) ही होती. चालुक्यांनी दक्षिण कोकण ताब्यात घेतल्यापासून त्यांची दक्षिण कोकण आणि गोव्याची राजधानी रेवतीद्वीप म्हणजे आजच्या सिंधुदुर्गातील रेडी हे गाव होते. या चालुक्य कुळातील सत्याश्रय पुलकेशी नावाच्या राजाने आपला मुलगा चंद्रादित्य याला कुडाळ येथे राज्यकारभार करण्यासाठी पाठविले होते. हा चंद्रादित्य राजा आणि त्याची राणी विजयभट्टारिका ही फार उदार मनाची होती. राणीने कोचरा आणि नेरूर येथे काही जमिनी इनाम दिल्याचे ताम्रपट सापडले आहेत. वालावल गावाची वसाहतही प्राचीन असून, नेरूर येथे सापडलेल्या एका ताम्रपटावरून या गावांचे चालुक्यकालीन नाव बल्लावल्ली असल्याचे दिसते.

आठव्या शतकात राष्ट्रकूट वंशाची अधिसत्ता आली. दक्षिण कोकणावर शिलाहार राजांनीही राज्य केले. प्रथम ते राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक होते. नंतर काही काळ स्वतंत्र राजे म्हणूनही राज्य करीत होते. अकराव्या शतकाच्या सुमारास महालक्ष्मी लब्धवर प्रसाद ही उपाधी लावणाऱ्या कोल्हापूर शाखेच्या शिलाहार राजांनी कोकण प्रांतात राज्य मिळविले, त्या वेळी वालावल येथील कुळाचा डोंगर या ठिकाणी त्यांचे वसतिस्थान असल्याचे दिसून येते. यादवांच्या कारकिर्दीत कृष्णप्रभू या कुडाळदेशकर भारद्वाज गोत्री ब्राह्मणाला कोकणचा सर्वाधिकारी म्हणून नेमले गेले होते. १३१८-१९ मध्ये दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी मलिक कफूरला पाठवून यादवांची सत्ता नष्ट केली आणि तेथून मुस्लिम सुलतानांची सत्ता सुरू झाली. मलिक कफूरच्या शेवटच्या स्वारीत गोमंतक त्याच्या साम्राज्यात गेला.

गोमंतकीय जनतेला मुसलमानी अंमल फार त्रासदायक झाला. हिंदू चालीरीती, समाजाची व्यवस्था, उत्कर्षाची साधने मुसलमानी विचारांच्या अगदी विरुद्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी अपमान आणि त्रास सोसावा लागत असे. चौदाव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांनी गोव्यात हैदोस घातला होता आणि हिंदूंची दैना होऊन त्यांची देवालये भ्रष्ट होऊ लागली होती. १३५१-५२ मध्ये बहामनी हसन गंगूने गोवा ताब्यात घेऊन कदंबांचे राज्य बुडविले. १३५२ ते १३८० मध्ये बहामनी सत्तेने गोव्यात धर्मांतर, प्रजेचा छळ करून देवालये भ्रष्ट केली. गोवा प्रदेशाचे राज्य कदंबांकडे होते. तेव्हा सप्तकोटीश्वराला त्यांनी आराध्य दैवत मानले होते. बहामनी सल्तनतीने कदंबांचा पराभव करून गोवा घेतले, तेव्हा त्यांनी सोमनाथाप्रमाणे हरमल येथे असलेल्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातही संपत्ती पुरून ठेवली आहे, अशा समजाने संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करून टाकले. याच धार्मिक छळाच्या काळात श्री देव नारायणाच्या हरमल येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला असावा आणि नारायणाची मूर्ती उचलून वालावल येथे आणली असावी व जंगलात लपवून ठेवली असावी, असे मानले जाते.

वालावल गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दऱ्या आणि कर्ली नदीमुळे प्राचीन काळापासून हे गाव तसे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकाऱ्यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. शिलाहार आणि नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी आणि नंतर विजापूरच्या राजवटीपर्यंत प्रभुदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते. हरमल गावातून श्री देव नारायणाची मूर्ती वालावल गावात आणली गेली, त्या वेळी चंद्रभान आणि सूर्यभान हे वीर पुरुष वालावलचे अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावल गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरासमोरील दीपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणाऱ्या कल्याणपुरुषाची घुमटी आणि वृंदावन आहे. घुमटीत श्रींकडे तोंड करून बद्धांजली वीरासन घालून बसलेली विनम्र श्रीकल्याण पुरुषाची आणि हातांत चवरी घेऊन उभी असलेली अशी त्यांच्या परिचारकाची अशा दोन मूर्ती आहेत. लक्ष्मीनारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इसवी सन १३५० ते १४००च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पद्धतीची असून, कालौघात मूळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली.

वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिर

या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विविध उत्सव साजरे केले जात असले, तरी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी काही दिवस लक्ष्मीनारायणाच्या गळ्यातील तुळशीच्या मंजिऱ्याची माळ आणि मूर्तीच्या अंगावरील वस्त्र घेऊन करमळकर घराण्यातील एक व्यक्ती चालत पंढरपूरला जात असे. तेथे आषाढ दशमीदिवशी सकाळी पांडुरंगाची पूजा करून सोबत आणलेले लक्ष्मीनारायणाचे वस्त्र पांडुरंगाला नेसवत असे आणि नारायणाच्या गळ्यातील माळ पांडुरंगाच्या गळ्यात घालत असे. त्यानंतर पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होत असे. पांडुरंगाने आपला आषाढीचा उत्सव साजरा करून घ्यावा, अशी विनंती लक्ष्मीनारायणाकडून केली जात असे, असा संकेत त्यामागे होता. पांडुरंगाचे विधिवत पूजन केल्यानंतर करमळकर घराण्यातील पंढरपूरला गेलेली व्यक्ती आषाढ द्वादशीला पांडुरंगाची पूजा करून त्याला महानैवेद्य अर्पण करत असे आणि तेथे अकरा ब्राह्मणांची समाराधना (भोजन) करत असे. त्यानंतर हे कार्य पूर्ण झाल्याचे पत्र आणि पांडुरंगाच्या अंगावरील वस्त्र, शेला देऊन त्याची पंढरपूरच्या मंदिर व्यवस्थापनाकडून पाठवणी केली जात असे. पांडुरंगाची वस्त्रे घेऊन ती व्यक्ती वालावलला आल्यानंतर ती लक्ष्मीनारायणाची पूजा करत असे आणि पांडुरंगाने दिलेले भेटीचे वस्त्र लक्ष्मीनारायणाला अर्पण करत असे. वालावलमध्येही महानैवेद्य दाखवून ११ ब्राह्मणांची समाराधना करत असे, अशी प्रथा होती. कालानुरूप ती प्रथा बंद पडली असली, तरी पूर्वीप्रमाणेच एकादशीच्या काही दिवस आधी लक्ष्मीनारायणाच्या गळ्यातील तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ आणि मूर्तीच्या अंगावरील वस्त्र पंढरपूरच्या देवस्थानाकडे टपालाने पाठविण्यात येते. या वर्षीही लॉकडाउन असले, तरी ती पाठविण्यात आली. वालावलच्या लक्ष्मीनारायणाचे पंढरपूरएवढेच महात्म्य असल्याने वालावलच्या ग्रामस्थांनी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ नये, असा प्रघात आहे. तो अजूनही पाळला जातो आणि आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

मंदिराच्या जवळच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले आणि तेथून सुमारे तीन-चार किलोमीटरवर माऊलीचे मंदिर आहे. एका दंतकथेनुसार लक्ष्मीनारायण आणि माऊली हे भावंडे आहेत. माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. तेथे नवरात्रौत्सव साजरा केला जातो. लक्ष्मीनारायणाचे देवालय गावातील मुड्याचा कोन नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनविलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि प्रसन्नतेमुळे या स्थानाला आपोआपच गांभीर्य आणि पावित्र्य लाभले आहे. श्री देव नारायणाच्या मूर्तीला प्रसिद्ध विद्वान भय्यादाजी शास्त्री अनिरुद्धाची मूर्ती म्हणतात.

लक्ष्मीनारायण देवालयाची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी अधूनमधून मंदिराला भेट देतात. मुंबईतील रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य खानोलकर यांनी मंदिराला दहा वर्षांपूर्वी भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितले, की देवालयाच्या गाभाऱ्याबाहेरील शिल्पकला व देवळाचे बांधकाम पायाभूत स्थापत्यशास्त्राच्या कल्पनेशी जवळीक दाखवते. मुख्य देवालयाची बांधणी चालुक्य पद्धतीची असल्याचे म्हटले जाते. बांधकाम जांभेथर दगडाचे आणि आतील खांब आणि व गाभाऱ्याचा दरवाजा काळीथर दगडाचा आहे. त्यावर सुंदर कोरीवकाम आहे.

चौकापुढील मुखशाळेचे काम काळीथर दगडाचे आहे. मुखशाळेचे छत १८८४ साली पुनर्बांधित झाले असावे, असे एका दक्षिणोत्तर आडव्या मोठ्या तुळईवर ‘शके १८०६ नारायण मुखशाळा’ अशा कोरलेल्या अस्पष्ट अक्षरांवरून वाटते. मुखशाळेपुढे नव्या-जुन्या पद्धतीच्या मिश्रणाने बांधलेला अर्वाचीन सभामंडप व सभामंडपाच्या पुढे काळीथर दगडाची पाचखांबी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बांधकामाची पद्धत मराठेशाहीतील असल्याचे म्हटले जाते. वृंदावनाच्या दर्शनी दासमारुतीची मूर्ती कोरलेली आहे. देवालयाच्या सभोवार तट आहे. तटाच्या आतील देवस्थानाच्या पवित्र जागेला जगत् म्हणतात. या जगताला तीन दरवाजे असून, वर नगारखाने आहेत. श्री नारायण मंदिराच्या उजवीकडे एक जुने देवचाफ्याचे झाड आणि जुनी धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेच्या मागे औदुंबर आणि त्याखाली काही योगी पुरुषांच्या समाधी होत्या. धर्मशाळेच्या जागी देव पावणेराची वास्तू आता पुन्हा उभी राहिली आहे.

नैर्ऋत्येच्या बाजूने जगताला लागून विस्तीर्ण नयनरम्य तलाव आहे. या तलावाचे पाणी कधीही खराब होत नाही असा लौकिक आहे. तलावाला नारायणतीर्थ म्हटले जाते. देवाच्या अभिषेकासाठी हे पाणी वापरतात. तलावाच्या काठी शिवलिंग आणि श्रीराम मूर्तीची स्थापना केलेली आहे. ज्यांना दक्षिण रामेश्वराचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यांनी ते या ठिकाणी दर्शन घेतले, तर रामेश्वराच्या दर्शनाचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. भक्तांच्या उदार देणग्यांमुळे देवालयातील आवारातील इमारतींचा जीर्णोद्धार, सुधारणा व नवीन बांधकामे होतच असतात. मंदिरामागील जीर्ण होऊन पडायला आलेल्या दोन धर्मशाळांची पुनर्बांधणी तशीच झाली. मंदिराच्या पूर्वेला तटाबाहेर ग्रामदेवता रवळनाथाचे प्राचीन देवालय आहे. दोन्ही मंदिराच्या मधे एक पिंपळाचा पार असून त्यावर मारुतीची घुमटी आहे.

लक्ष्मीनारायणाच्या मुख्य मंदिराच्या आवारातच घाडवस म्हणजे घाडी समाजाच्या दैवताचे मंदिर आहे. त्यामध्ये बाराचा घाडवस आणि राज्याचा घाडवस अशा मूर्ती आहेत. बाराचा घाडवस गावासाठी म्हणजे गावातील बारा-पाचाच्या मानकऱ्यांसाठी आहे, तर राज्याचा घाडवस सह्याद्रीच्या शेंड्यापासून समुद्राच्या टोकापर्यंत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी आहे. कोकणातल्या कोणाही व्यक्तीला त्याचे संरक्षण मिळते. घाडी समाजाच्या मानकऱ्याला बोलावून घाडवसाला गाऱ्हाणे घातले, की कोणाचीही पीडा दूर होते, अशी श्रद्धा आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानात कोणतेही कार्य करण्यापूर्वी वालावलच्या घाड्याला बोलावून त्याच्याकडून गाऱ्हाणे घातले जात असे. दसऱ्यादिवशी सावंतवाडी संस्थानच्या राजगादीच्या मागे असलेल्या पाटेश्वर मंदिरात आणि राजगादीसमोर नारळ ठेवून वालावलच्या घाडी समाजातील व्यक्तीकडून गाऱ्हाणे घातले जात असे. गाऱ्हाणे घालणाऱ्याचा रेशमी गोंड्याची घोंगडी देऊन सत्कार केला जात असे. सावंतवाडीच्या प्रमुख चौकातही राज्यात सुखशांती नांदावी, समृद्धी व्हावी, यासाठी राज्यातील सर्व देवतांनी, गणदेवतांनी साह्य करावे, यासाठी वालावलच्या घाड्याकडूनच गाऱ्हाणे घातले जात असे. त्याबद्दल वालावलच्या घाडीवाड्याच्या बाजूला असलेल्या डोंगराचा आणि शेतजिमनीचा काही भाग इनाम टेंब म्हणून घाड्यांना सावंतवाडी संस्थानने इनाम दिलेला आहे.
अशा या मंदिराला आणि आषाढी एकादशीसह सर्वच उत्सवांना भाविकांनी अवश्य भेट द्यायला हवी.

आषाढीचा उत्सव
पूर्वी टोपीवाले देसाई आणि इतर ग्रामस्थ मिळून आषाढी एकादशी उत्साहात साजरी करत असत. कालांतराने त्यात खंड पडला; मात्र एकादशीला भाविक अभिषेक करायचे. त्यानंतर पूर्वीसारखी आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे काही भाविकांना वाटू लागले. त्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी ४ जुलै २०१७, नंतर २३ जुलै २०१८ आणि गेल्या वर्षी १२ जुलै २०१९ रोजी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी झाली. (या वर्षी करोनाच्या संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होत आहे.)

महालक्ष्मी ३६५ गावांची स्वामिनी
लक्ष्मीनारायण मंदिरामुळे वालावल गाव प्रसिद्ध असले, तरी गावातच दुसऱ्या एका ठिकाणी असलेली महालक्ष्मी ही गावाची मूळ देवता आहे. ती ३६५ गावांची स्वामिनी आहे. तिच्या आवारात असलेला चाळासुद्धा ३६५ गावांचा रक्षक मानला जातो. कोकणातील कोणालाही संकट आले, तर तेथे नारळ ठेवला जातो. महालक्ष्मीची ओटी भरली जाते आणि चाळ्याला पानाचा विडा ठेवला जातो. तसे केल्यानंतर कोणाच्याही आणि कोणत्याही संकटाचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात आणि गावात विशिष्ट पद्धतीने गाऱ्हाणे घातले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही सेवा बजावणारे गणपती घाडी यांनी सांगितले, की आमच्याकडे २७ देवस्थाने आहेत. ती कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीशी संलग्न आहेत; मात्र गावातील देवस्थानांची व्यवस्था स्थानिक कमिटीच पाहते. धार्मिक कार्यक्रम मात्र परंपरेप्रमाणेच पूर्वीच्याच पद्धतीने होतात. गावात महालक्ष्मीचे देऊळ महत्त्वाचे आहे. ही महालक्ष्मी ३६५ गावांची देवी आहे. या देवळाच्या समोरच जो राष्ट्रोळा म्हणजे चाळा आहे, तो ३६५ गावांचे रक्षण करतो. देवीचे स्थान ३६५ गावांमध्ये आहे. त्यामुळे तो मान आम्ही राखतो. वर्षातून एकदा होणाऱ्या समाराधनेच्या कार्यक्रमात तिची ओटी भरतो आणि मांड भरतो. देवीला अळणी खिरीचा नैवेद्य दाखवतो. मानाचे ३६५ विडे लावतो. त्यानंतर ते ३६५ गावांमध्ये पोहोचते करतो. गावातल्या सगळ्यांचे, बालगोपाळांचे रक्षण कर, असे गाऱ्हाणे घालतो. लक्ष्मीनारायण, जैन ब्राह्मण, माऊली अशा सगळ्या देवांकरिता प्रार्थना करतो. उत्सवात गावातले सगळे बारा-पाचाचे मानकरी एकत्र येतात. सार्वजनिक काम आम्ही सगळे मिळून पार पाडून घेतो. देवळातल्या कोणत्याही धार्मिक कामासाठी गणेशपूजा झाली की आम्ही गाऱ्हाणे घालतो. परब मानकरी आणि देसाई मानकरी यांच्यातर्फे नारळ ठेवला जातो. ‘ठेवलेला नारळ मान्य करून घे आणि सगळ्यांचे कल्याण कर, अडीअडचणी दूर कर, क्लेश परिहार कर, बाधा असतील तर त्या दूर कर, काही चुका असतील त्या माफ कर, राजी हो, मने कलुषित झाली असतील, तर ती अडचण दूर कर, सगळ्यांना अन्न, वस्त्र देऊन सगळ्यांना सुखी राख,’ अशी प्रार्थना केली जाते.

माहेरवाशिणींची देवी
रवळनाथ मंदिरापासून जवळच असलेली खंदरबी देवी माहेरवाशिणींची देवी म्हणून ओळखली जाते. मंदिरात देवीची मूर्ती नाही. केवळ एक चिरा उभा आहे. ही देवी माहेरवाशिणींच्या नवसाला पावते. माहेरवाशिणींना कोणतेही संकट आले, तर ते दूर करण्यासाठी किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. हा नवस दसऱ्याच्या आदल्या दिवशी विशिष्ट पद्धतीने फेडला जातो. त्या दिवशी अग्नीचा स्पर्श झालेले काहीही न खाता उपवास केला जातो. नवमीच्या सायंकाळी कातरवेळी नवस फेडणाऱ्यांना पेटत्या निखाऱ्यांची आंघोळ घातली जाते. (सुपलीमधून पेटते निखारे घेऊन ते नवस फेडणाऱ्याच्या डोक्यावर ओतले जातात.) मात्र भाविकांना कोणताच अपाय होत नाही, हे विशेष. याशिवाय साडीचोळीसह ओटी भरूनही नवस मेडले जातात.

दशावतारी नाटकाचे मूळ स्थान
भगवान विष्णूने वेळोवेळी जगाच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध अवतारांना एकत्रितपणे दशावतार असे म्हटले जाते. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे ते दहा अवतार आहेत. त्यांचीच महती सांगणारा दशावतारी नाटकांचा उद्बोधक कलाप्रकार उत्तर गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सादर केला जातो. दशावताराची ही लोककला खूप लोकप्रिय आहे. दशावतारी नाटक प्रामुख्याने गावच्या मंदिरांच्या प्रांगणात वार्षिक जत्रेच्या रात्री सादर केले जाते. देव, राक्षस, अप्सरा अशी अनेक पात्रे या नाटकांमध्ये रंगविली जातात. विशेष म्हणजे स्त्री पात्रेही पुरुषच साकारतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ जुनी आणि प्रमुख दशावतार मंडळे आहेत. त्यात वालावलकर दशावतार मंडळ हे पहिले मंडळ मानले जाते. तेलंग समाजाच्या वालावलकरांनी शेकडो वर्षे ही लोककला जिवंत ठेवली आहे. अकराव्या शतकात ही लोककला श्याम नाइकजी काळे यांनी सुरू केली. दुसऱ्या एका मतप्रवाहाप्रमाणे गोरे नामक व्यक्तीने वालावल गावात प्रथम दशावतार सादर केला. त्या अर्थाने वालावल ही या कलाप्रकाराची आद्यभूमीच आहे.

  • प्रमोद कोनकर
    (या लेखासाठी वामन शांताराम वालावलकर यांनी संकलित केलेल्या श्री क्षेत्र वालावल या ग्रंथाचा आणि मंदिराच्या संकेतस्थळाचा संदर्भ घेतला आहे.) (लेख पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक कोकण मीडिया – पाच जुलै २०१९चा अंक)

    (वालावलची रामनवमी हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
    …………………………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s