नोकरीच्या महाद्वाराकडे बेरोजगार कोकणाची पाठ

नोकरीचा शोध हा प्रत्येक तरुण-तरुणीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यासाठी पूर्वी वृत्तपत्रांतून येणाऱ्या जाहिराती, एवढेच एक माध्यम होते. हळूहळू ही माध्यमे विस्तारत गेली. त्याबरोबर नोकरीच्या शोधाच्या वाटाही विस्तारत गेल्या. नोकरी इच्छुकांसाठी अनेक खासगी कंपन्या स्वतंत्रपणे काम करू लागल्या. खासगी क्षेत्रात देश-विदेशातील नोकरीच्या संधी एका बोटाच्या अंतरावर उपलब्ध होऊ लागल्या. तरीसुद्धा अगदी अलीकडेपर्यंत ही सगळी माहिती एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित होती. आता अँड्रॉइड मोबाइल आणि स्वस्त डाटामुळे तीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे केवळ नोकर्यां ची माहिती देणारी अनेक संकेतस्थळे सुरू झाली. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळू लागला. तेच ओळखून राज्य शासनाने महाजॉब्ज नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यावर केवळ सरकारी नव्हेत, तर खासगी नोकरीची माहितीही मिळते. त्यातून किती जणांना नोकऱ्या मिळणार आणि किती उद्योजकांची कामगारांची गरज भागणार, हा प्रश्न अलाहिदा. पण नोकरी करू इच्छिणारे तरुण आणि नोकरी देणारे उद्योजक या दोघांचा समन्वय या संकेतस्थळावर साधला गेला आहे. त्यादृष्टीने ते अत्यंत उपयुक्त संकेतस्थळ आहे.

महाजॉब्ज संकेतस्थळ अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. कोरोना- लॉकडाउनच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ठिकठिकाणचे उद्योग नव्याने उभारी घेत असतानाच महाजॉब्ज संकेतस्थळ सुरू झाले आहे. ही वेळ रोजगार देणारे आणि रोजगार करू इच्छिणारे या दोन्ही घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लॉकडाउनच्या काळात महानगरांसह राज्यभरातील कारखान्यांमध्ये काम करणारे लाखो कामगार आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे उद्योगांना तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत नव्याने मोठी भर पडली आहे. अशा स्थितीत बेरोजगार मनुष्यबळ आणि मनुष्यबळाची आवश्यकता असलेले उद्योग यांचा समन्वय या संकेतस्थळाने साधला आहे. पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर सुमारे ९० हजार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली, तर कामगारांची गरज असलेल्या साडेसातशे कंपन्याही नोंदविल्या गेल्या. या संधीचा उपयोग कोण कसा करून घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणातील कोणीही संकेतस्थळाचा उपयोग करून घेतला गेला नसल्याचे दिसते.


या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमधील एकाही खासगी उद्योजकाने कामगारांची आपली गरज तेथे नोंदविलेली नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन लाख चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. ते सारे अकुशल, कुशल आणि अतिकुशल श्रेणीमध्ये मोडणारे आहेत. मुंबईतील नोकऱ्या गेल्यामुळे अनेक जण कोकणात दाखल झाले आहेत. महाजॉब्जवर त्यांच्या लायकीच्या नोकऱ्या कोकणात नाहीत, असाही याचा अर्थ निघतो किंवा कोणताही उद्योजक आपल्या कामगारांसाठी तेथे मागणी नोंदवू इच्छित नाही, असेही म्हणता येते. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेवर आहेत. या सरकारने हे अत्यंत उपयुक्त संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. अर्थातच महाआघाडी सरकारच्या बाहेरील म्हणजेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावर, त्यामधील नेत्यांवर, टीका करणे, उपराष्ट्रपती या देशातल्या द्वितीय नागरिकाचा पुतळा जाळणे, निषेध करणे, पुतळे जाळणे जितके सोपे आहे, तितके नोकऱ्यांना इच्छुक असलेले बेरोजगार शोधून काढणे, त्यांच्यासाठी नोकऱ्या शोधणे आणि नोकऱ्या देणारे उद्योजक शोधणे सोपे नाही हेही खरेच.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २४ जुलै २०२०)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २४ जुलैचा अंक डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांच्या कंट्रोल रूम्सचे नंबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास त्या नंबर्सवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नंबर्स पुढील लिंकवर https://www.facebook.com/724383954341946/posts/3896430377137272/

Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply