रत्नागिरी : रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाच्या रुग्णांची वाढती लक्षात घेता रत्नागिरीतील उद्यमनगर भागातील शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचे तातडीने कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २५ जुलै रोजी सायंकाळी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
उदय सामंत म्हणाले, की याबाबत एक राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, मेडिकल एज्युकेशनचे संजय मुखर्जी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. जाखड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी कमलापूरकर, आरोग्य संचालिका अर्चना पाटील आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील करोना कसा रोखता येईल, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खेड उपजिल्हा रुग्णालय, कामथे उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू राहतील, तर डेरवण येथील वालावलकर रुग्णालय नॉन-कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू केले जाईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
घरडा हॉस्पिटल, वसतिगृह, इमारतही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावी. तेथे करोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, असेही बैठकीत ठरविण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच खासगी रुग्णवाहिकाही भाड्याने घेण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच स्टाफ नर्सच्या जागा भरल्या जातील. एमबीबीएस डॉक्टर मिळाले नाहीत, तर बीएएमएस घेतले जातील, जीएनएम नर्स मिळाल्या नाहीत तर एएनएम घेतल्या जातील, असेही श्री. सामंत म्हणाले.
रत्नागिरीतील खासगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करावीत, असा विषयही या बैठकीत पुढे आला. रत्नागिरीतील काही डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या दौऱ्यात सहभागी असल्याने सामंत गेले १० दिवस स्वतःहून क्वारंटाइन झाले आहेत. आपल्याला करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले असून, आपण १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
