गौरवशाली मुंबई महापालिकेची वास्तू झाली १२८ वर्षांची!

मुंबई महापालिकेच्या वास्तूला आज (३१ जुलै २०२०) तब्बल १२८ वर्षे पूर्ण होत आहेत. ही इमारत वास्तु-कलासौंदर्याचा उत्तम नमुना तर आहेच; पण तिची मजबुती किती आहे, हेही आपण अनुभवतो आहोत. इमारतीचा आराखडा ब्रिटिश आर्किटेक्टने तयार केला असला, तरी इमारतीचे बांधकाम तेलुगू कंत्राटदारांनी कोणतेही लौकिक प्रशिक्षण न घेताही वेळेत आणि कमी खर्चात केले होते. मुंबईचे शिल्पकार अशी ओळख असलेले जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचाही आज (३१ जुलै) स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला मुंबई महापालिकेच्या वास्तूची वैशिष्ट्ये सांगणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.
…….
केरळ राज्यापेक्षा अधिक मोठ्या रकमेचे वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या मुंबई शहराचा कारभार मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदर येथील इमारतीतून पाहिला जातो. १२८ वर्षांची ही इमारत म्हणजे मुंबईकरांची शान आहे. विशेष म्हणजे इमारतीचा आराखडा ब्रिटिश आर्किटेक्टने तयार केला असला, तरी इमारतीचे बांधकाम तेलुगू म्हणजे भारतीय कंत्राटदारांनी कोणतेही लौकिक प्रशिक्षण न घेताही केले. अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्चात त्यांनी वेळेत बांधकाम करून दिले. विदेशी शैलीतील ही इमारत सौंदर्यपूर्ण वास्तू म्हणून नावाजली जाते.

मुंबई महानगरपालिका इमारतीच्या मध्यवर्ती गॅबल भिंतीवरील ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतीक चिन्हासोबत ‘अरब्स प्राइमा इन इंडिस’ (भारतातील प्रथम शहर) हे वाक्य लिहिले होते. एखाद्या जागेचे महत्त्व वा शहरयोजनेविषयी जाणून घ्यावयाचे असेल तर तेथील परंपरा, संस्कृती, नागरी सुधारणांच्या निरीक्षणातून समजून घेता येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईचा अनेक अंगांनी विकास झाला व त्यातून ‘स्मार्ट व सुंदर असे मुंबई शहर निर्माण झाले. मुंबईच्या इतिहासातील पहिल्या नागरी सुधारणेचे काम हाती घेण्याचे श्रेय सर हेन्री बार्टल एडवर्ड फ्रियर या गव्हर्नरला व ब्रिटिशकालीन मुंबईचे आराखडे तयार करण्याचे श्रेय जेम्स टर्बशॉ या आर्किटेक्टला जाते. याच आराखड्याचा एक भाग असलेल्या नगर चौकातील (भाटिया बाग) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) इमारतीसमोरील त्रिकोणी जागेवर ‘मुंबई महानगरपालिका’, तर हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) चौकातील दुसऱ्या त्रिकोणी जागेवर ‘ओरिएंटल बिल्डिंग’ उभी आहे. रेल्वे टर्मिनस व या दोन्ही इमारती गॉथिक शैलीत बांधलेल्या आहेत. या इमारती केवळ अल्पकाळ टिकण्यासाठी बांधल्या नसून, त्या अनेक वर्षे टिकून राहाव्यात या उद्देशाने बांधल्या आहेत, हे या इमारतींच्या अंतर्बाह्य रचनेतून दिसून येते. अशा इमारतींची अंतर्बाह्य रचना, कला-सौंदर्यविवेकास धरून असेल तर त्या अधिक काळ स्मरणात राहतात. योगायोग असा, की या तिन्ही इमारती, ब्रिटिश वास्तुविशारद फ्रेड्रिक विल्यम स्टीव्हन्सने आरेखित केलेल्या आहेत. यापैकी मुंबई महानगरपालिकेसाठी बांधलेल्या गौरवशाली इमारतीस ३१ जुलै २०२० रोजी १२८ वर्षे पूर्ण झाली आहेत. शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी बांधलेला हा ऐतिहासिक वारसा ‘पूर्वेकडील लंडन’ वाटण्याइतपत सर्व कसोट्यांवर उतरतो, हे खरे आहे!

इतिहास
मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे; परंतु मुंबई शहर मात्र कृत्रिमरीत्या तयार झालेले आहे. अठराव्या शतकातील फोर्ट परिसरातील मिश्र वसाहत हे एक प्रकारे छोटेखानी शहरच होते. सन १८०३ मध्ये फोर्ट परिसरात लागलेल्या आगीत अनेक इमारती जळून खाक झाल्या. तत्कालीन गव्हर्नर बार्टल फ्रियरने संरक्षक भिंती पाडून या परिसराचा विकास फोर्टबाहेरील मोकळ्या जागेत करण्याची योजना आखली.

दरम्यानच्या काळात काही सरकारी इमारती सोडल्यास फोर्टबाहेरील मोकळ्या जागेचा पूर्णपणे विकास झालेला नव्हता. नाना शंकरशेठ व त्यांचे समकालीन मित्र पालिकेत ‘जस्टिस ऑफ दी पीस’ म्हणून काम करीत असत. शहराचा कारभार गव्हर्नरच्या बंगल्यातूनन चालत असे. गव्हर्नरला नगर शासनाच्या जबाबदारीतून मुक्तच करण्यासाठी १८५८मध्ये तीन अतिरिक्तब म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. सुरुवातीच्या काळात गिरगावातील एका वाड्यात म्युनिसिपल कार्यालय सुरू करण्यात आले. सन १८६६पर्यंत हे कार्यालय ऱ्हिदम हाउस येथे होते व त्यानंतर ते १८६६मध्ये तत्कालीन गव्हर्नर क्रॉफर्डने आर्मी-नेव्ही इमारतीत हलविले. सन १८७२ मध्ये मुंबई (बाँबे) म्युनिसिपल कॉर्पोरेशन अस्तित्वात आले. त्यानंतर १८८८मध्ये मुंबई म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. जागेच्या अभावामुळे मोठ्या सभा टाउन हॉलमध्ये भरत असत. १६ एप्रिल १८५४ रोजी मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. सन १८८७मध्ये रेल्वे टर्मिनसची इमारत पूर्ण झाली. नाना शंकरशेठ व जमशेटजी जीजीभाई यांनी पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालींचा वेध घेऊन रेल्वे टर्मिनससमोरील मोकळ्या जागेचे पालिकेच्या नियोजित इमारतीसाठी आरक्षण करून ठेवले. या जागेची निवड करण्यामागचे कारणही किती रास्त होते, हे वर्तमान परिस्थितीवरून समजून येते.

मधल्या काळात नियोजित पालिकेच्या इमारतीचे आराखडे बनवण्याचे काम रेल्वे टर्मिनस इमारतीचे बाह्य सौंदर्य व परिसराशी तादात्म्य राखू शकेल अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे, असा ठराव तत्कालीन नगरसेवकांनी केला होता. या इमारतीसाठी आलेल्या दोन प्रस्तावांपैकी एक आरेखन इंडो-सारासेनिक शैलीत होते, तर दुसरे गॉथिक शैलीत केले होते. वास्तुविशारद एफ. डब्लू. स्टीव्हन्स १८८३-१८९३ या दरम्यान सरकारी नोकरीत नव्हता. या इमारतीचा आराखडा त्याने इंग्लंडमध्ये बसून बनवला होता. सर्व आराखडे पाठवले होते. पालिकेतील नगरसेवकांनी एकमताने वास्तुविशारद स्टीव्हन्सच्या आराखड्यास पसंती दिली. या काळात बी. जी. टीग्ज, टी. एस. ग्रेगसन व त्याचा मुलगा चार्ल्स फ्रेड्रिक हे वास्तुविशारद सोबत होते. सन १८९३ मध्ये पालिकेची इमारत बांधून पूर्ण झाली. तेव्हापासून आजतागायत पालिकेचे कार्य याच इमारतीतून चालते.

स्थापत्यशैली
१९ डिसेंबर १८४४ रोजी लॉर्ड रिपनच्या हस्ते या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली; परंतु प्रत्यक्षात बांधकाम २५ डिसेंबर १८८९ रोजी सुरू झाले आणि ३१ जुलै १८९३ रोजी पूर्ण झाले. सुरुवातीच्या काळात मुंबईतील अनेक इमारती गॉथिक शैलीतच बांधल्या गेल्या. पुरातन इमारतींचे वेगळेपण समजण्यासाठी त्या इमारतीची शैली व वास्तुविषयक वैशिष्ट्ये सर्व दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक असते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत व्हेनेशियन गॉथिक व सारासेनिक शैलीचा मिश्र वापर करून आरेखित केली. त्याने आरेखित केलेल्या मिश्र शैलीतील इमारतींमध्ये पालिकेची इमारत सर्वोत्कृष्ट समजली जाते! ही इमारत पूर्णपणे कार्यालयीन कामासाठी आरेखित केली आहे. खऱ्या अर्थाने स्टीव्हन्स वास्तु-कलासौंदर्यविवेक दृष्टी लाभलेला एक प्रतिभावान रचनाकार होता. पूर्वानुभव व या कामासाठी मिळालेल्या आरेखन स्वातंत्र्याचा उपयोग करून, दोन भिन्न शैलींमधील घटकांच्या मिलाफातून एक अप्रतिम व अनोखे असे वास्तुशिल्प निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. या इमारतीच्या दर्शनी खिडक्यांवरील कमानी चंद्रकोरीसमान दिसतात. दक्षिण टोकावरील दर्शनी भिंतीवरील अनेकविध आकृतिबंधांचा संयुक्तय मेळ व नियंत्रणातील संयम वाखाणण्याजोगा आहे. जिन्यावरील उंच घुमट, मनोरे व आकर्षक दगडी शिल्पे या इमारतीच्या भव्यतेत भर घालतात व यातून ब्रिटिश सामर्थ्याचे प्रतीक दर्शवतात.

कला-सौंदर्य
या इमारतीच्या बाह्य भिंतीसाठी फिकट पिवळसर हलक्या मुलायम रंगातील दगड वापरला आहे. पिवळसर दगडाचे वर्चस्व कमी करण्यासाठी व त्या रंगाचा समतोल राखण्यासाठी रचनाकाराने पांढऱ्या रंगातील चुनखडी दगडाचा वापर कल्पकतेने केला आहे. पांढऱ्या रंगामुळे उठावदार दिसणाऱ्या कमानीच्या खोबणीत बसवलेल्या खिडक्या व भिंतीपासून अलगद पुढे ओढलेला द्वारमंडप पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतो. भिंतीवरील आडवे पट्टे आणि विविध आकारातील खिडक्या व व्हरांड्यातील कमानीच्या आकारातील पांढऱ्या रंगातील वळणातील सहजता आकर्षक झाली आहे. इमारतीचे कोपरे व छतावरील दोन्ही कोपऱ्यांतील दंडगोलाकारातील निमुळते मनोरे व बहुआयामी कमानी आकर्षक आहेत. इमारतीची एकूण रंगसंगती, आकाराच्या विविधतेतील वरचढपणा रंगावर मात करतो. या आकृतिबंधातील बारकावे मन प्रसन्न करणारे आहेत. या द्वारमंडपात बहुपदरी कमानी, बहुरंगातील आकर्षक स्टेनग्लास व भारतीय पशु-पक्षी आणि पाने-फुले यांचे नक्षीकाम कोरलेले आहे. पालिकेच्या इमारतीची बहुतांश छायाचित्रे या एकच कोनातून चित्रित केलेली आहेत, हे या इमारतीच्या जुन्या-नव्या छायाचित्र संग्रहातून दिसून येते. दक्षिण टोकावरून पालिका इमारतीचे छायाचित्र घेताना कॅमेऱ्याच्या चौकटीत इतर कोणत्याही इमारतीचा अडसर येत नाही. त्यामुळे या इमारतीचे आकाशपटलावरील स्वतंत्र अस्तित्व आजतागायत अबाधित राहिले आहे. इमारतीच्या दर्शनी भिंतीवरील सर्व घटक एखादे शिल्प कोरल्यासारखे भासतात! म्हणून मुंबई महानगरपालिकेसाठी आरेखित केलेल्या वास्तुशिल्पाचे संपूर्ण श्रेय स्टीव्हन्सकडे असलेल्या सर्जनशील कला-सौंदर्यविवेक दृष्टीलाच द्यावे लागेल.

स्थापत्य
पालिकेच्या इमारतीचे बांधकाम फिकट पिवळसर छटेतील दगडात झाले आहे व त्याचा पृष्ठभाग खडबडीत ठेवला आहे, तर समोरच्या रेल्वे टर्मिनस इमारतीसाठी वापरलेला दगड घडीव व सफाईदार आहे. रेल्वे टर्मिनस इमारतीच्या आवारातून पालिका इमारतीचे अवलोकन केल्यास दोन्ही इमारतींचे आरेखन एकाच व्यक्तीइने केल्याचे लक्षात येते; परंतु दोन्ही इमारतींची वास्तुशास्त्रीय मांडणीतील बैठक वेगळी असल्याचे दिसून येते. पालिकेच्या इमारतीचा मध्यवर्ती घुमट २३५ फूट उंच आहे. रेल्वे टर्मिनसपेक्षा पालिकेच्या इमारतीचे क्षेत्रफळ कमी असले, तरी मध्यवर्ती भागाची उंची वाढवून त्या इमारतीचे श्रेष्ठत्व अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे. इमारतीचा घुमट व मिनार संपूर्णतः भारतीय शैलीतील आहेत.

पालिकेची इमारत त्रिकोणी आकारातील जमिनीवर उभी आहे. त्यामुळे पालिका इमारतीच्या दक्षिण टोकाची रुंदी कमी आहे. अरुंद भागाची उणीव भरून काढण्यासाठी मध्यवर्ती भागाची उंची वाढवली आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूंचे घुमट कमी उंचीचे ठेवल्यामुळे, दर्शनी इमारतीचा मध्यवर्ती भाग भव्य दिसतो. म्हणून तो भाग इमारतीचे जवळून निरीक्षण करणाऱ्यांच्या मानवी दृष्टिक्षेपाबाहेर जातो. द्वारमंडपाचा भाग मूळ इमारतीपासून पुढे ओढला आहे. दोन पातळ खांबांची जोडी आणि त्यावरील कमानीचे नक्षीकाम व द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंवरील अलौकिक रूपकात्मक दगडी आकृत्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराची शान वाढवतात. तळमजल्यावरील स्वागत कक्षातून मुख्य सभागृहाकडे जाणारा जिना व आजूबाजूच्या कमानी त्या जागेतील भव्यतेचे दडपण अभ्यागताला जाणवून देतात. महापालिकेची सभा ज्या ठिकाणी भरते, त्या सदनाची लांबी ६५ फूट व रुंदी ३२ फूट आहे. हे सभागृह वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

या इमारतीचे बांधकाम व्यंकू बाळोजी कालेवार व तेलुगू कंत्राटदार रामया व्यंकया अयावारु या जोडगोळीने केले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने अंदाजित खर्चापोटी ११ लाख ८८ हजार ८०२ रुपयांची मंजुरी दिली होती. या दोघांनी अथक परिश्रम घेऊन मंजूर केलेल्या किमतीपेक्षा कमी खर्चात बांधकाम करून ६८ हजार रुपयांची बचत केली व इमारतीचे बांधकामही वेळेवर पूर्ण करून दाखवले. विदेशी शैलीतील बांधकामाचे शिक्षण वा अनुभवाचे पाठबळ नसतानाही त्यांनी स्वकौशल्यावर हे काम करून दाखवले. मुंबईतील बहुतांश इमारती तेलुगू कंत्राटदारांनी बांधल्या आहेत.

पुरातन वास्तुदर्जा
प्राचीन व पुरातन काळातील इमारतींचे योग्य संवर्धन व संरक्षण व्हावे, म्हणून मुंबई पुरातत्त्व खात्याने शहरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना दर्जानुसार विभागले आहे. या खात्याने पालिकेच्या इमारतीस दर्जा-२ अ बहाल केला आहे.
साधारण १८२० ते १९३० च्या दरम्यान झालेला ब्रिटिशकालीन मुंबईचा विकास आजवर झालेल्या विकासापैकी सर्वोच्च असा आहे. या कालखंडात झालेली मुंबईची जडणघडण ब्रिटिश राज्यकर्ते आणि भारतीयांनीसुद्धा पाहिली आहे. मुंबईचा विकास १९३० पासून ते आजपर्यंत याच धोरणांवर आधारित झाला असता, तर आज आपण स्टीव्हन्सच्या कल्पनेतील सुंदर शहराचे नागरिक असतो! मुंबईस एक अप्रतिम शहर बनवण्यासाठी स्टीव्हन्सने घेतलेल्या कामाची दखल जेवढी घ्यायला हवी होती, तेवढी ती घेतली गेली नाही. मुंबईतील इमारतींमुळे त्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढी इंग्लंडमध्ये राहून मिळाली नाही! तीन मार्च १९०० रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. मुंबई शहरातील पुरातन इमारती केवळ वास्तु-कलासौंदर्यविवेक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून निर्माण केलेले पुरावे नसून, अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता या इमारतींमध्ये आहे. कलासक्त मनास उल्हसित करणारी शाश्वणत वास्तुशिल्पे कशी असावीत, हेच या परिसरातील इमारतींच्या आरेखनातून दिसून येते.

शहराची ओळख टिकवून ठेवण्यासाठी दिशाहीन व निरुद्देशाने केलेला वर्तमान विकास कुचकामी ठरणारा असेल. वर्तमान पुनर्विकासातून आकार घेणारे बहुअंगी मुंबई शहराचे चित्र ब्रिटिश राज्यकर्ते व वास्तुविशारदांकडे असलेली दूरदृष्टी व उद्देशाच्या जवळपासही पोहोचत नसल्याची खंत कलासक्त मनास कायम बोचत राहणारी आहे!

  • चंद्रशेखर बुरांडे, मुंबई
    ई-मेल : fifthwall@gmail.com

(हा लेख कोकण मीडियाच्या २०१७च्या दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झाला होता. तो विशेषांक वास्तुसौंदर्य या विषयाला वाहिलेला होता. मुंबईसह कोकणातील विविध वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचे वैभव उलगडून दाखविणारे साहित्य त्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. संदर्भमूल्य असलेला हा संग्राह्य विशेषांक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. अंक हार्ड कॉपी स्वरूपात हवा असल्यास 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply