‘सीए होणे हे वेगळे, मानाचे आणि जबाबदारीचे काम’

रत्नागिरी : ‘ऑडिट करणे हे अर्थकारणातील अत्यंत महत्त्वाचे काम असून, ते चार्टर्ड अकाउंटंट्सना करता येते. या प्रोफेशनकडे समाजात चांगल्या दृष्टीने पाहिले जाते. तसेच, या क्षेत्रात नैतिक मूल्ये काटेकोरपणे पाळली जातात. त्यामुळेच सीए होणे हे अन्य क्षेत्रांपेक्षा वेगळे, मानाचे आणि तितक्याच जबाबदारीने करण्याचे काम आहे. जास्तीत जास्त नागरिक अर्थविषयक कायद्यांनुसार वागावेत, यासाठी सीए मोठी भूमिका निभावू शकतात,’ असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रसिद्ध सीए वैभव देवधर यांनी केले.

नुकतेच दहावीचे निकाल लागले असून, पुढच्या अॅडमिशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, कॉमर्समधील शिक्षण आणि करिअरसंधी या विषयावर तज्ज्ञांच्या मुलाखतमालेचे आयोजन प्रोफिशियंट अॅकॅडमीने केले आहे. त्या मालिकेतील पहिली मुलाखत सीए देवधर यांची झाली. प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या मुग्धा खंडकर यांनी ही मुलाखत घेतली.
‘नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा, असे पहिल्यापासूनच डोक्यात होते. त्यामुळे सीए व्हायचे ठरवूनच दहावीनंतर कॉमर्सला आलो आणि त्यातील विविध टप्पे पार करून उद्दिष्ट साध्य केले,’ असे त्यांनी सांगितले. (मुलाखतीचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

सखोल ज्ञान

‘ऑडिट अर्थात संस्था, व्यक्तींचे हिशेब ऑथेंटिक आहेत की नाहीत, हे तपासणे हे सीएचे मुख्य काम असते. बँकांकडून कर्ज दिले जाणे, कंपन्यांची गुंतवणूक आदी त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी खात्रीशीर असाव्या लागतात. ते काम सीए करतात. सीए होण्यासाठी अभ्यासाची, परीक्षांची काठिण्यपातळी जास्त असते. तसेच, केवळ परीक्षा देऊन भागत नाही, तर तीन वर्षे आर्टिकलशिप झाल्यानंतर अंतिम परीक्षा असते. त्यामुळे सीए होणारी व्यक्ती थिअरी आणि प्रॅक्टिकल यांचे सखोल ज्ञान घेऊन बाहेर पडते,’ असे देवधर म्हणाले.

अंगभूत गुण

सीए होण्यासाठी कोणते अंगभूत गुण असणे आवश्यक आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना देवधर म्हणाले, ‘मुख्य म्हणजे संयम खूप असला पाहिजे. या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करायला अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागू शततो. तसेच, समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्याची मनोवृत्ती असणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे, हे ठामपणे सांगता येण्याचा गुणही आवश्यक आहे. कारण सीएवर मोठी जबाबदारी असते. त्याच्या सहीवर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी अवलंबून असतात. काही वेळा नैतिक प्रश्न उभे राहू शकतात; मात्र काहीही झाले तर योग्य असेल तेच क्लायंटला पटवून देण्याचे काम सीएला करावे लागते. म्हणून ठामपणा आवश्यक आहे. एखादी गोष्ट योग्य होत नाही तोपर्यंत प्रश्न विचारण्याची सवयही असावी लागते. त्याशिवाय, सीएला अनेक प्रकारच्या व्यक्ती, संस्थांशी व्यवहार करायचे असल्याने माणसांशी त्या त्या परिस्थितीनुसार योग्य प्रकारे वागण्याचे कौशल्य प्राप्त करणेही आवश्यक असते.’

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हातभार

समाजातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सीए कसा हातभार लावू शकतो, या प्रश्नाचे उत्तर देताना देवधर यांनी सांगितले, ‘बऱ्याचदा लोक कायदेशीर बाबी योग्य वेळेत करत नाहीत. वेळ आली की काय ते पाहू, अशी मानसिकता असते; पण सीए त्यांना योग्य मार्गदर्शन करून योग्य वेळी आणि कायदेशीर पद्धतीनेच व्यवहार पूर्ण करायला सांगू शकतो. जनजागृती करण्याचे मोठे काम सीए करू शकतो.’

विविध संधी

‘सीए झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस करणे हा चांगला पर्याय आहे; पण कंपन्यांतून चांगल्या नोकऱ्यांच्या संधीही सीएंना उपलब्ध होतात. सीए इन्स्टिट्यूटकडून कॅम्पस इंटरव्ह्यूही होतात. त्यातून संधी मिळू शकतात. त्याशिवाय, टीचिंग अर्थात शिकविणे हा चांगला पर्याय असू शकतो. कारण अलीकडे सीए होण्याकडे मुलांचा कल वाढलेला दिसतोय. या क्षेत्रातील चांगल्या लोकांनी मुलांना मार्गदर्शन केलं, तर ती एक उत्तम संधी ठरू शकते. त्याचप्रमाणे, आर्थिक विषयांशी संबंधित वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ करून यू-ट्यूबवर लोकांसाठी शेअर करणे हा पर्यायही लॉकडाउनमुळे अधिक प्रकर्षाने पुढे आला आहे. चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकलो, तर तोही उत्पन्नाचा एक चांगला पर्याय ठरू शकतो,’ असे देवधर यांनी सांगितले.

सीएव्यतिरिक्त टॅक्सेशन क्षेत्रातील अन्य संधींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर देवधर म्हणाले, ‘टॅक्स कन्सल्टंट, टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणूनही काम करता येते. त्यासाठी टॅक्सेशन डिप्लोमा आदी कोर्सेस करावे लागतात. काही जण एलएलबी झाल्यानंतरही टॅक्सेशन क्षेत्रात काम करतात. अशा प्रकारच्या संधी आहेत; मात्र त्यांनी कॉस्ट अकाउंटंट, सीए आदींकडे किमान तीन-चार वर्षे तरी अनुभव घ्यायला हवा. बी. कॉमनंतर जीडीसीए केल्यास सहकारी संस्थांच्या ऑडिटचे अधिकार मिळतात. तेही क्षेत्र चांगले आहे.’

‘डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस हे दोन मुख्य विभाग असून, त्याशिवाय त्यांचे उपप्रकार आहेत. त्यामुळे आपल्याला ज्यात काम करायचे आहे, ते ठरवावे आणि त्यात तज्ज्ञ बनणे आवश्यक आहे. ‘जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन’ असे असून चालत नाही,’ असेही देवधर यांनी आवर्जून नमूद केले.

आधुनिक तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाचा, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या क्षेत्रातील रोजगारावर काय परिणाम होईल, असा प्रश्न मुग्धा खंडकर यांनी विचारला. त्यावर देवधर म्हणाले, ‘लोकांची सर्वसाधारण मानसिकता अशी असते, की एक वेळ आम्ही जास्त कर भरू, पण आमच्या डोक्याला कटकट नको. जास्तीत जास्त लोकसंख्येला करयंत्रणेत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यात तंत्रज्ञानाच्या साह्याने सुलभता आणली जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या क्षेत्रातील लोकांची मागणी घटू शकेल. म्हणूनच या क्षेत्रातील लोकांनी कायम कालसुसंगत राहिले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. विषयाचे मूलभूत तांत्रिक ज्ञान, नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रॅक्टिकल अनुभव या सगळ्या गोष्टी येणे आवश्यक आहे.’

‘आत्ताच्या करोना महामारीमुळे तंत्रज्ञानावर आधारित बाबींना बळ मिळाले आहे. त्यामुळे फसवणुकीचे काही वेगळे प्रकारही घडू शकतात. त्या दृष्टीने सावधानता बाळगायला हवी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आव्हान आहे. एखाद्या अडचणीच्या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या यंत्रणेला कायदेशीर सल्ले विचारण्याची सुरुवात पाश्चिमात्य देशांत आत्ताच झाली आहे. अशा गोष्टी आपल्याकडेही १०-१२ वर्षांत येतीलच; त्यामुळे रोजगारावर परिणाम होऊ शकतो; पण तरीही शेवटी मानवी बुद्धिमत्तेला काही गोष्टींत तरी पर्याय नाही. त्यामुळे प्रोफेशनल लोकांनी या बाबी कटाक्षाने शिकत राहिले पाहिजे,’ असेही देवधर यांनी सांगितले.

देशातील कररचना, जीएसटीची वैशिष्ट्ये आदी बाबीही देवधर यांनी उलगडून सांगितल्या. जास्तीत जास्त लोकांना करयंत्रणेत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी लोकांना जागरूक करण्याची गरज आहे आणि ती गोष्ट सीए चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणूनच सीए, टॅक्सेशन या क्षेत्रात अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत, असे सीए देवधर यांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
कार्यक्रमाला मोफत नोंदणी करण्याकरिता लिंक : https://bit.ly/2XpB6OP

पुढील मुलाखत डॉ. अपूर्वा जोशी यांची… ती पाहा https://youtu.be/Q0xb8tQAeA4 या लिंकवर..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply