स्वातंत्र्याचा पहिला दिवस : यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आठवण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
………..
स्वातंत्र्य-जी कालपर्यंत एक अमूर्त कल्पना होती, ती आज मूर्त स्वरूपात येत होती. जे, काल एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते. जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता. कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता. पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्यासाठी मंगलप्रभात आज उगवणार होती.

अननुभूत आनंदाचा तो एक दिवस, कृतार्थभावनेचा तो दिवस आज पंचवीस वर्षांनंतरही माझ्या डोळ्यांसमोर ताजा आहे. पंचवीस वर्षे झाली. कालगणनेचे चक्र चालू आहे, अव्याहत चालू आहे, त्याची नोंदच आहे ती. ती चुकेल कशी? खरोखरच पंचवीस वर्षे झाली असलीच पाहिजेत; पण त्या दिवसाची आठवण झाली, की मनाचे हरीण केव्हाच त्या पवित्र दिवसापाशी जाऊन पोचते.

तो स्वातंत्र्यदिन, लौकिकार्थाने दि. १५ ऑगस्ट खरा; पण दि. १४ ऑगस्टलाच आम्ही त्याच्या स्वागतासाठी सिद्ध झालो होतो. त्या दिवशी मध्यरात्री जुन्या सचिवालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकणार होता. अधिकृत अशा त्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे वेध, तसे म्हटले, तर सकाळपासूनच लागले होते. मी तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होतो, आणि त्या समारंभाला मला हजर राहावयाचे होते. आमचे बिऱ्हाड तेव्हा मरीन लाइन्सजवळ होते. येणाऱ्या-जाण्याऱ्यांची वर्दळ घरी तेव्हा खूप असायची. त्याही दिवशी सकाळपासून मित्रमंडळी येत-जात होती. गप्पागोष्टी चालल्या होत्या. विषय स्वातंत्र्याचाच होता. माझे काही मित्र, स्वातंत्र्यलढ्यातले माझे सहकारी मुंबईतला स्वातंत्र्यदिन सोहळा पाहण्यासाठी मुद्दाम आले होते, तेही घरी होतेच. एका धन्यतेच्या भावनेने आम्ही स्वातंत्र्याबद्दल गोष्टी बोलत होतो. हा दिवस इतक्या लवकर पाहायला मिळेलसे आम्हांला पाच वर्षांपूर्वी – ४२ साली काही वाटले नव्हते; पण आज स्वातंत्र्याची पहाट झाली होती. ती कोवळी उन्हे अंगावर खेळवत असतानाच आम्हांला आमच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील काही प्रसंग आठवत होते, काही सहकाऱ्यांची याद येत होती. स्वातंत्र्य मिळाले, आता पुढच्या जबाबदाऱ्या कोणत्या, याची चर्चा आम्ही करीत होतो.

गप्पागोष्टी चालल्या होत्या आणि माझ्या एका सहकाऱ्याने आम्हांला जवळजवळ सोळा वर्षे मागे खेचून नेले. आम्ही साजऱ्या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती. स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत झाला, त्या दिवशी २६, जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. १९३० सालची २६ जानेवारी जवळ येत चालली होती.

कराडमध्ये हा स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावयाचा, याचा आम्ही काही तरुण मंडळी विचार करीत होतो. मी तर तेव्हा वरच्या वर्गातला शाळकरी विद्यार्थीच होतो; पण काँग्रेसच्या चळवळीत स्वतःला लोटून दिलेले होते. समविचाराच्या युवकांत रंगून गेलो होतो. असेच आम्ही काही जण कराडमधल्या एका छोट्या छापखान्यात जमलो होतो; दि. २६ जानेवारीचाच विचार चालू होता. ‘स्वातंत्र्याची हाक’ देणारे एक बुलेटिन तयार करून शाळेतून व चौकाचौकांतून वाटावे, अशी कल्पना पुढे आली आणि लगेच संमतही झाली. मी तेव्हा थोडासा लेखक होतो. शाळेतील निबंध वगैरे बऱ्यापैकी लिहीत असे. तेव्हा काही लिहिण्याचा प्रसंग आला, म्हणजे माझे सहकारी ते काम माझ्यावर टाकीत, त्या दिवशी ‘स्वातंत्र्याची हाक’ लिहिण्याचे कामही माझ्यावर आले होते. त्या रात्री लिहिलेली ‘स्वातंत्र्याची हाक’ स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या दिवशी व त्यानंतर आज पंचवीस वर्षांनीही माझ्या कानांत खणखणते आहे.
………
सभेला मी आलो, तेव्हा ध्यानात न आलेली एक गोष्ट आता दिसत होती. लोकांचे जथेच्या जथे आनंदोत्सवात भाग घेण्यासाठी निघाले होते. रोशनाई झाली होती. स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. एक गुलाम देश स्वतंत्र झाला होता.

आजच्या पिढीला या आनंदाची कल्पना सांगूनही येणार नाही. एक प्रकारच्या बेहोशीतच मी घरी पोचलो होतो. स्वातंत्र्य घोषित व्हायला आता अवघे दोन तास उरले होते. उत्कंठा, औत्सुक्य, उत्साह, समाधान, इत्यादी भावनांचे अमृतमय रसायन या दोन तासांत इतके उदंड भरले होते, की विचारू नका. थोड्याच वेळाने जुन्या सचिवालयात मी पोचलो. ओव्हल मैदानाच्या बाजूला जी चिंचोळी बाग, त्या बागेत आम्ही उभे होतो. बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे पंतप्रधान होते. जुन्या सचिवालयाच्या पोर्चवर त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला. विश्वविजयी प्यारा तिरंगा वायुलहरींवर डोलू लागला. भारत स्वतंत्र झाल्याची ती निशाणी होती. ध्वजवंदन झाल्यावर, मला वाटते, बाळासाहेब खेरांचे थोडा वेळ भाषण झाले. आज त्या भाषणातले मला काहीच आठवत नाही. झेंडावंदनाच्या वेळची धुंदी, हर्ष मात्र, आज पंचवीस वर्षे झाली, तरी डोक्यात घर करून बसला आहे. पुढे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी झेंडावंदने झाली. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा झेंडावंदन झाले. संरक्षणमंत्री म्हणून लाल किल्ल्यावर होणा-या झेंडावंदनाच्या समारंभाचे यजमानपदही मी भूषविले. पण जुन्या सचविलयाच्या छोट्याशा हिरवळीवर झालेले स्वतंत्र भारतातील पहिले झेंडावंदन अजूनही आठवते.

आठवण झाली, की अजून मन मोहरून येते. हृदय भरून येते. देह पुलकित होतो. या झेंड्याला स्वतंत्र भारताच्या नभांगणात फडकलेला पाहावा, म्हणून जी लढाई झाली, तीमधील मी एक साधा सैनिक, हा झेंडा खांद्यावर घेऊन शाळकरी जीवनात मिरवणुका काढल्या. पोलिसांची कडी तोडून या झेंड्याचा सन्मान राखण्यासाठी मार खाल्लेला मी, मी एक शिपाई. आज कृतार्थपणे त्या झेंड्याचे वैभव पाहत होतो. भारत स्वतंत्र झाला होता. एक संकल्प सिद्ध झाला होता. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी हे स्वातंत्र्य सार्थ करण्याचे नवे संकल्प मनात डोकावत होते.
– यशवंतराव चव्हाण

(यशवंतराव चव्हाण यांच्या ‘ऋणानुबंध’ या पुस्तकातील ‘स्वातंत्र्याचा पहिला दिवस’ या लेखातील हा काही अंश आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या यशवंतरावांच्या समग्र साहित्याच्या वेबसाइटच्या सौजन्याने हा लेखाचा काही भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. मूळ संपूर्ण लेख आणि पुस्तक http://ybchavan.in/ या वेबसाइटवर वाचता येईल.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply