माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक २ (आजगावच्या शाळेतील कणबरकर सर)

श्री. कणबरकर सर

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेतील दुसरा लेख आहे सौ. मेघना संजय जोशी यांचा… आजगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमधील शिक्षक मारुती कणबरकर यांच्याविषयीचा…
………
शाळा ही अशी जागा, की जिच्या नावाच्या उच्चारानेही डोळे स्वप्नील होतात. नशीबाने मला वेगवेगळ्या शाळा लाभल्या. आज मी ज्यांच्याबद्दल लिहिणार आहे, ती शाळा म्हणजे सावंतवाडी तालुक्याच्या आजगावमधील विद्या विहार इंग्लिश स्कूल. ही माझी आठवीपासून दहावीपर्यंतची शाळा. त्या काळात शाळेतील बहुतेक सर्व शिक्षकांशी या ना त्या कारणाने संपर्क आला; पण प्रकर्षाने लक्षात राहिले ते श्री. मारुती गुंडू कणबरकर सर. ते आमचे गणित आणि रसायनशास्त्र या विषयांचे शिक्षक; पण खेळाच्या मैदानावरही तेवढंच वर्चस्व.

शाळेत दोन प्रकारचे शिक्षक असतात एक म्हणजे खूप बुद्धिमान आणि दुसरे म्हणजे मुलांना समजून आणि समजावून देण्याची बुद्धिमत्ता लाभलेले. श्री. कणबरकर सर या दोन्हींचं मिश्रण होते. आपण शिकवलेलं वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे ही सरांची कळकळ. त्यासाठी ते अक्षरश: जिवाचं रान करीत. मला आज ती शाळा सोडून पस्तीस वर्षं लोटली तरी सरांचं शिकवणं जसंच्या तस्सं आठवतं.

सरांबद्दलच का लिहावंसं वाटलं, तर सरांनी मला दोन चांगल्या सवयी लावल्या. पहिली म्हणजे अभ्यास दिलेल्या वेळी पूर्ण करणं आणि दुसरी म्हणजे स्वच्छ लिहिणं आणि पायऱ्यापायऱ्यांनी विचार करणं. या दोन्ही सवयी माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या आहेत आणि तेच माझ्या आजवर मिळवलेल्या यशाचं रहस्य आहे. कसलीही डेडलाइन उल्लंघण्याचं धाडस मला आजही होत नाही आणि तसं होतंय असं वाटलं तर कणबरकर सर मला रागावतील असा भास होतो.

जीवन म्हणजे ठायीठायी समस्या आल्याच. या समस्यांचं निराकरण पायरीपायरीने विचार करण्यावाचून होणारच नाही. पायरीपायरीने विचार केला की उत्तर सापडणार हे निश्चित, असा ठाम विश्वास सरांनी दिला. प्रत्येक वेळी उत्तर सापडलं नाही; पण उत्तर शोधण्याची जिद्द मात्र आहे. अक्षरश: ‘नफरत करनेवालों के सीने में प्यार भर दूँ।‘ असं म्हणत गणितात पत्थर असणाऱ्या आम्हा मुलांना ‘पत्थर को मोंम कर दूँ’ म्हणत शिकवायचे श्री. कणबरकर सर.

देववाणी संस्कृत ही अशी भाषा आहे, की तिच्यामध्ये शिक्षकाला अध्यापक, उपाध्याय, आचार्य, पंडित, द्रष्टा आणि गुरू असे वेगवेगळे शब्द योजलेले आहेत. त्यातील व्याख्यांनुसार कणबरकर सर हे माझ्यासाठी द्रष्टा, ज्यांनी मला गणितीय दृष्टीने पायरीपायरीने विचार करायला शिकवला असे आणि गुरू, ज्यांनी माझ्यातील सुप्त शक्ती ओळखण्यास मदत केली व अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली. अशा या द्रष्ट्या गुरूला सादर वंदन!

  • सौ. मेघना संजय जोशी (सुवर्णा रामदास महाबळ)
    (माजी मुख्याध्यापिका, जय गणेश इंग्लिश मीडिअम स्कूल, मालवण; शैक्षणिक समुपदेशिका; लेखिका)
    पत्ता : आशीर्वाद, मु. पो. ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ४१६६०६
    मोबाइल : ९४२२९ ६७८२५
    …..
    (उद्याचा लेख विजय चौकेकर यांचा)
    (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. नवनवीन गुरूंविषयी त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणी वाचताना खूपच समाधान वाटते, तसेच खूप काही शिकायला मिळते व त्यातून आत्मपरीक्षण करावेसे वाटते. छानच उपक्रम.

Leave a Reply