अंजनवेल ग्रामपंचायतीने करोनासाठी उभारले स्वतंत्र आरोग्य उपचार केंद्र

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी करोना प्रादुर्भावाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी ग्रामस्थांकरिता मोफत स्वतंत्र आरोग्य उपचार केंद्र उभारले आहे. तेथे औषधांबरोबर एमबीबीएस, बालरोगतज्ज्ञाची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनवेल ग्रामपंचायतीने करोनाच्या काळात आणखी एक आदर्श उपक्रम राबविला आहे.

याबाबत सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले, की अंजनवेल ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, तसेच जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करोनाच्या काळासाठी करोनाचे संक्रमण आणि उद्रेक, फैलाव किंवा पुन्हा रोग उद्भवण्यास प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायत आरोग्य उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे. युसूफ मेहेर अली सेंटर संचालित प्रिन्स चिन्नेश व नेनेस्का खेडकर स्मारक रुग्णालयाची जुनी इमारत या ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतली आहे. तेथे हे उपचार केंद्र चालविले जाते. डॉ. शशांक ढेरे (एमबीबीएस, बालरोग तज्ज्ञ) यांची तेथे नेमणूक केली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी एक परिचारिका, ३ आशा वर्कर्सची नेमणूक केली आहे. त्या सर्वांचे मासिक मानधन ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून दिले जाणार आहे. गेल्या सोमवारी सुरू केलेल्या या केंद्रात सहा दिवसांत ४३ ग्रामस्थांनी आपली तपासणी करून घेतली.

अंजनवेल गावातील कोणत्याही ग्रामस्थाला सर्दी, ताप, खोकला आदी त्रास होत असेल आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालयात दाखल करावे लागणार असेल, तर तेथे दाखल करून उपचार करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या परंतु करोना पॉझिटिव्ह असलेल्या फक्त अंजनवेल गावातील ग्रामस्थांना तेथे दाखल करून घेण्याची व औषधोपचार करण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता प्रत्येकी ३ खाटांच्या दोन, तर प्रत्येकी ४ खाटांच्या दोन अशा चार खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

दररोज सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाते. सर्व उपचार विनामूल्य केले जातात. करोनाच्या काळात गरज असलेल्या गावातील रुग्णांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून केंद्रावर मोफत आणण्याची आणि पुन्हा घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जात आहे.

श्री. बाईत म्हणाले, की साठ वर्षांपुढील तीव्र लक्षणे असलेल्या आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांना तेथे दाखल करून घेतले जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षांपुढील सर्व ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ग्रामपंचायतीकडून डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिनयुक्त औषधांचा विनामूल्य पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नेमलेले कर्मचारी महसूल गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची माहिती जमा करीत आहेत. गावाची लोकसंख्या ३२१३ इतकी आहे. प्रत्येक महसुली गावासाठी नेमण्यात आलेल्या आशा कर्मचारी दररोज आपल्या महसुली गावातील सर्व कुटुंबाशी संपर्क ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेतील आणि कोणाला आजारपणाची लक्षणे असल्यास त्यांना डॉक्टरांकडे पाठवण्याची व्यवस्था करतील. आपल्या गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ही सतर्कता बाळगली असल्याचे सरपंच श्री. बाईत यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीने २०१३ साली स्वतःची रुग्णवाहिका घेतली आहे. इतर वेळी ग्रामस्थांना अल्प दरात, तर इतरांना शासकीय दरांपेक्षा कमी दरात सेवा पुरविली जाते. याशिवाय गावातील ४२ अपंगांना दरमहा प्रत्येकी १४०० रुपयांचे मानधन दिले जाते, अशी माहिती सरपंच यशवंत बाईत यांनी दिली. हा उपक्रम गेली आठ वर्षे सुरू आहे.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply