माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १७ (आचरे केंद्रशाळेतील ठाकूर गुरुजी)

ठाकूर गुरुजी

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १७वा लेख आहे मंदार सांबारी यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षक सुरेश श्यामराव ठाकूर यांच्याविषयीचा…
………
गुरू जणू की कल्पतरू। पैलतीरी नेणारा तारू।।
गुरू; बाळाची माऊली। गुरू उन्हातली सावली।
गुरू; लोखंडालागी परीस। जलबिंदूंचे करितो मोती; गुरू!!

किती यथार्थ वर्णन केलंय या शब्दांनी माझ्या आदरणीय ठाकूर गुरुजींचं! आमच्या संस्कारक्षम बालवयात आम्हाला लाभलेल्या अनेक गुरूंमध्ये मला घडविण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ते आमचे लाडके ठाकूर गुरुजी!

आमच्यासारख्या कित्येक लोखंडाच्या तुकड्यांना सोनं बनविण्यासाठीचा त्यांचा परीसस्पर्श, असंख्य जलबिंदूंचे अनमोल मोती तयार करण्यासाठी घेतलेले कष्ट, धडपड मी माझ्या डोळ्यांनी बघितलीय.

आमची शाळा १८५७ साली स्थापन झाली. लवकरच आमची शाळा १६४व्या वर्षात पदार्पण करणार आहे. १९७५पूर्वी शाळेचे नाव ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर, केंद्रशाळा, आचरे नंबर एक’ असे होते. १९७५नंतर शाळेचे नाव ‘कै. बाळकृष्ण नारायण बिडये विद्यालय केंद्रशाळा आचरे नंबर १’ असे झाले. आमच्या शाळेचे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येते ती शाळेची पवित्र वास्तू आणि या ज्ञानमंदिरात ज्यांनी आम्हाला घडवलं ते सातही वर्षांतील सर्व शिक्षक!! त्या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा!

त्यांच्यातलाच एक कोहिनूर हिरा म्हणजे माझे गुरू, मार्गदर्शक ठाकूर गुरूजी! स्पष्ट उच्चार, शिकवण्याची हातोटी, विषयांचं सखोल ज्ञान, वेळेचं काटेकोर पालन, दिलेला शब्द पूर्ण करण्याची वृत्ती, सर्वांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करण्यात यशस्वी झालेले गुरुजी! प्रेमाच्या वेळी प्रेम देणारे आणि चुकीच्या वेळी शिक्षा करणारे, कडक शिस्तीचे गुरुजी मी अनुभवलेत.

आताच्या काळातील विद्यार्थी ज्याबद्दल अनभिज्ञ आहेत, अशी गोष्ट… ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’चा जिवंत अनुभव मी घेतलाय; पण याच शिस्तीमुळे आणि अध्यापनकौशल्यामुळे मी चौथी व सातवीत राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात दोन्ही वेळा मालवण तालुक्यात प्रथम, तर चौथीत गुणवत्ता यादीत म्हणजे जिल्ह्यात तिसरा येऊ शकलो.

सातही वर्षांत मी वर्गातला पहिला नंबर सोडला नाही. नाटक, गायन, शालेय वा मैदानी विविध प्रकारच्या स्पर्धांत भाग घेणे आणि बहुतांशी स्पर्धांत नंबर मिळविणे अशी माझ्या शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी करू शकलो, ते या गुरुजनांमुळेच!! अजूनही मी त्यांचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

अशा या खळाळत्या झऱ्याला, अखंड ऊर्जास्रोताला दीर्घ आयुरारोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

– मंदार श्रीकांत सांबारी
(संचालक, वै. रामेश्वर पतसंस्था, आचरा; उपाध्यक्ष, व्यापारी संघटना, आचरा)
पत्ता : मु. पो. आचरा (देऊळवाडी), ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४.
मोबाइल : ९४२०७ ९९०७६.
…..
(पुढचा लेख विशाखा चौकेकर यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply