माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १८ (महाराष्ट्र हायस्कूलमधील गोखले मॅडम)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १८वा लेख आहे विशाखा चौकेकर यांचा… लोअर परेल (मुंबई) येथील महाराष्ट्र हायस्कूलमधील शिक्षिका गोखले मॅडम यांच्याविषयीचा…
………
शालेय जीवनातील शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात, जणू जीवनाला वळणच लावतात. तसे वेगवेगळ्या मार्गाने अनेक जण शिक्षकाच्या भूमिकेतून आपल्या आयुष्यात येत असतातच. नशिबाने मला वेगवेगळ्या शाळांतून वेगवेगळे अनुभव शिकता आले. प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे अनुभव वेगवेगळे.

माझी चौथी शाळा म्हणजे घरापासून जवळच असलेली मुंबईतल्या लोअर परेलचे महाराष्ट्र हायस्कूल. सातच्या गिरणीचा भोंगा झाला, की आमची रपेट सुरू व्हायची ती शाळेच्या दारात थांबायची. शहरालगतची गजबजलेल्या ठिकाणची शाळा. त्यात सकाळ- दुपार सत्रात शाळा भरायची. लांबची मुलं लवकरच यायची. मॅडम दाराजवळ उभ्या राहून बूट, टाय, बॅच, वेण्या वगैरे पाहून आत सोडत. वक्तशीरपणा, शिस्तीचं बंधन यामुळे नावाजलेली. मुख्याध्यापक मॅडमच असल्याने मुलींकडे बारकाईने लक्ष देत.

आमच्या आठवीच्या वर्गाला श्रीमती गोखले मॅडम होत्या. त्या दर शनिवारी मारुती स्तोत्र म्हणून घेत. कोण चुकतं असं वाटलं, की त्याला सर्व वर्गासमोर म्हणायला लावीत. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शुद्धलेखन यांवर त्यांचा जास्त भर असायचा. लिहिलेला निबंध मोठ्याने वर्गात वाचून घेत. चुका समजावून सांगत. मोजकं, पण अर्थपूर्ण कसं लिहायचं, आपलं मत स्पष्ट व विचारपूर्वक कसं मांडायचं, हे त्या सांगत. स्पष्ट उच्चार व्हावेत यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. प्रत्येकात सभाधीटपणा यावा हा त्यांचा अट्टाहास. त्यामुळे मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेऊन माझ्यात सभाधीटपणा कधी आला कळलंच नाही.

एकदा मी दुसरी घटक चाचणी सोडवत होते. अचानक मला चक्कर आली. मॅडम सुपरवायझर होत्या. त्यांनी मला स्टाफ रूममध्ये नेलं. डॉक्टरना बोलावून औषधोपचार केले. मैत्रिणीबरोबर शाळा सुटल्यावर घरी पाठविलं. कठीण प्रसंगातून संयमाने मार्ग काढून त्यावर मात कशी करायची याचं बाळकडू पाजलं.

त्यामुळेच आज ३४ वर्षांनंतरही त्यांची आठवण माझ्यासोबत आहे. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो; पण जीवनात अनुभव घेत असताना नेमकी भूमिका कशी घ्यावी, यासाठी तयार करण्याचं काम शिक्षकांनी केलं. त्यामुळेच जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाले.

– विशाखा विजय चौकेकर
(एलआयसी विमा प्रतिनिधी. BRT/CTC)
पत्ता : मु. पो. चौके, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०५
मोबाइल : ९४२१२ ३७८०५
ई-मेल : vishakhachoukekar73@gmail.com
…..
(पुढचा लेख भानू तळगावकर यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply