सिंधुसाहित्यक्षेत्रीचे परशुराम… प. स. देसाई (सिंधुसाहित्यसरिता – १६)

परशुराम देसाई (२१ मे १८९२ – २६ एप्रिल १९८२)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १६वा लेख… परशुराम देसाई यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उज्ज्वला धानजी यांनी…
………
ग्रीष्मातील सूर्यकिरणांच्या तापाने तप्त झालेल्या आकाशाला आणि तीव्र ज्वालेने तांबूस रंग आलेल्या क्षितिजाला वर्षा ऋतूतील मेघ श्यामलता, शीतलता आणीत असतात. शरदाच्या चित्रविचित्र मेघांनी भरलेल्या आणि सोन्यासारख्या चमकणाऱ्या किरणांनी उज्ज्वल झालेल्या आणि हिरव्यागार दिसणाऱ्या पृथ्वीवरील शोभेला दवबिंदूंनी व धुक्याने धूसर, धुरकट अस्पष्ट करण्याकरिता हेमंत येत असतो. शिशिराचा अंगावर शहारे आणणारा शीतलपणा घालविण्यासाठी वसंतराज आपल्या अंगावरील पिवळी शाल जमीन, पाणी आणि आकाश यांच्यावर फेकून देत असतो.

अहाहा! ऋतुचक्राचे असे हे सौंदर्य पाहणारे मर्मज्ञ म्हणजे प. स. अर्थात परशुराम सदाशिव देसाई. थोर साहित्यिक, नाटककार, कादंबरीकार अशी बिरुदावली लाभलेले एक सरस्वतीपुत्र! व्रतस्थ आणि वंदनीय!

सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे २१ मे १८९२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा किंजवडे या गावी त्यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. तरीही शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द कायम होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यात संकटे झेलून चैतन्यमय जीवनाशी हातमिळवणी केली आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात आनंदाची पहाट फुलवली. सातवी पास झाल्यावर १९०७ साली त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि १९०९पासून त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण व मराठी लेखन सुरू केले.

देसाई उच्चशिक्षित नव्हते; पण स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वाध्यायाने त्यांनी संस्कृत, इंग्रजी, बंगाली भाषांचे ज्ञान मिळवले, वाढवले. त्या ज्ञानाचा लोकप्रबोधनासाठी उपयोगही केला.

रामकृष्ण परमहंस, देवी शारदामणी व विवेकानंद ही त्यांची परमदैवते. त्यांच्यासाठी ते कलकत्त्याला जाऊन राहिले. बंगालीसह इतर तत्सम भाषांचा अभ्यास केला. लेखनातून पैसा मिळू लागताच नोकरी सोडून सरस्वती देवीची एकनिष्ठ सेवा करून साहित्यसेवेला सुरुवात केली. त्यांचा साहित्यिक प्रवास तर थक्क करणारा आहे.

त्यांनी १९१५ ते १९६४ या कालखंडात जवळजवळ १५ सामाजिक कादंबऱ्यांचे लेखन केले. अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. समाजसुधारणा, समाजहित, नीतिनियमांचे पालन करून आदर्श वागणूक कशी असावी हा संदेश त्यांनी आपल्या लेखनातून दिला.

लग्नविधी ह्या प्रमुख संस्कारातील त्यांचे त्या वेळचे विचार आजही प्रबोधनात्मक आहेत. ते म्हणतात, ‘वधू-वरांनी विवाहापूर्वीच आपली अंत:करणे, सवयी, अपराध, भविष्यकाळातील आपल्या आशा-आकांक्षा एकमेकांसमोर प्रांजलपणे उघड कराव्यात. त्यात आडपडदा राहिला तर विवाहानंतर वारंवार ठेचाळत जाण्याचा प्रसंग येतो. हाच तो वधूवरांतील अंतःपट. नंतर उन्नतीच्या अवघड सात पायऱ्या एकमेकांच्या हृदयाची एकतानता करून कशा ओलांडाव्यात हे शिकवणारी ती सप्तपदी. वैयक्तिक अभिमानाचा धूर दूर केल्याशिवाय ही एकतानता येत नाही. म्हणून सप्तपदीपूर्वी होम करावा लागतो.’ किती हे मार्मिक विवेचन!

त्यांनी स्वच्छंदपणे साहित्याच्या अनेक देदीप्यमान दालनांत विहार केला. मध्यंतरीच्या कालखंडात तर त्यांनी नऊ ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन केले आणि १९२३ साली लिहिलेल्या ‘शाही महाल’ या कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. सत्याच्या आधारावर रचलेली करवीर राज्य संस्थापक छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या जीवनावरील स्फूर्तिदायक सत्यकथा ‘मर्दाची माऊली!’ राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनी १८ जून १९२८ रोजी रत्नागिरी येथून प्रसिद्ध झालेली कादंबरी ‘झाशीवाली राणी’ या कादंबरीने त्यांच्या ऐतिहासिक साहित्यविश्वात भर घातली. त्या काळी ऐतिहासिक कादंबरी लिहिताना कोणत्याही प्रकारच्या सुविधा, संदर्भ सहजासहजी उपलब्ध नसताना लिहिलेल्या ह्या कादंबऱ्या.

देसाई यांना अनेक भाषा अवगत होत्या. १९४४ ते १९७३ या काळात त्यांनी सात बंगाली कादंबऱ्यांचे भाषांतर केले आहे. भारतीय व विदेशी भाषांतील लोकप्रिय साहित्य अनुवादरूपाने मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने ‘मानव तितुका एकच आहे’ या भावनेने विश्ववाणी कादंबरी मालिकेच्या रूपाने सुरू केला. त्यात ‘हुतात्मा नंदकुमार’, ‘विकट वाट ही संसाराची’ ही देसाई यांची भाषांतरे प्रसिद्ध केली. खरेच या प्रतिभावंतांचा हा फार मोठा सन्मान!

त्यांची प्रतिभा गुप्तहेरविषयक कादंबरीतूनही बहरली. १९२२ ते १९३०पर्यंत क्रमशः एकूण नऊ भागांत प्रसिद्ध झालेल्या डिटेक्टिव्ह कथा देसाई यांच्या बुद्धिकौशल्याची साक्ष देतात. ‘मर्दानी सौंदर्य’ या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. ‘मर्दानी सौंदर्य म्हणजेच प. स. देसाई’ हे समीकरण त्या वेळी दृढ झाले होते. त्याशिवाय देसाईंनी एक बृहत्काय डिटेक्टिव्ह कादंबरी मुळाबरहुकूम भाषांतरित केल्याच्या उल्लेखावरूनच त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व लक्षात येते. डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांतूनही त्यांचे असणारे प्रबोधन उल्लेखनीय आहे.

१९५० साली लिहिलेली ‘दर्या डाकू’ आणि १९५२ साली लिहिलेली ‘जलकन्या’ अशा साहसविषयक कादंबऱ्या मुलांमध्ये नाविक शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यासाठी, त्यांच्यात साहसी वृत्ती निर्माण होण्यासाठी म्हणून दर्यावर्दी साहित्य प्रकाशनतर्फे प्रकाशित झाल्या होत्या. त्यांच्या लिखाणाने वाङ्मय क्षेत्रात उघडले न गेलेले दर्यावर्दी साहित्याचे नवे दालन उघडले गेले.
जसे पाणी उंच कड्यावरून कोसळताना निर्माण होणारा धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते, तसेच साध्या शब्दांच्या अचूक आणि अर्थपूर्ण रचनेतून निर्माण झालेले ओघवते साहित्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडते याची प्रचिती येथे येते.
माणसाची रहस्यप्रियता आणि गूढ जगाविषयीचे कुतूहल जोपर्यंत जागृत आहे, तोपर्यंत पिशाच्च कथांची निर्मिती होत राहणारच. कारण अशा कथा वाचायला सर्वांनाच आवडतात. देसाईंनी ‘पिशाच्च प्रेम’ आणि ‘पिशाच्च लीला’ या पिशाच्चविषयक कादंबऱ्या लिहिल्या. पिशाच्चविषयक कादंबऱ्या लिहिण्याच्या बाबतीत त्या काळात त्यांचा हात धरणारा कुणी नव्हता, एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने, साध्या, सरळ, सोप्या भाषेत उत्सुकता कायम ठेवीत लिहिलेल्या ह्या कथा.

पंडित शिवनाथशास्त्री यांच्या मूळ बंगाली भाषेतील ‘आत्मजीवनी’चा अनुवाद करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या भाषांतर विभागाने देसाई यांच्यावर सोपविले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून सरस्वतीची सेवा करणाऱ्या देसाईंनी तो भार वयाच्या ऐंशीव्या वर्षीही समर्थपणे पेलला. सलाम अशा या बुद्धितेजाला!

स्वामी विवेकानंदांवरील प्रेमाने, भक्तिभावाने त्यांनी विवेकानंद होण्यापूर्वीचे ‘उगवता सूर्य’ हे नाटक त्यांच्या आत्मचरित्राचा आधार घेऊन लिहिले. सांगली येथील भावे नाट्यगृहाच्या रंगमंचावर याचा पहिला प्रयोग झाला होता.

लोकांचे प्रबोधन व्हावे, त्यांना आध्यात्मिक विचार समजावेत, या प्रांजळ हेतूने अध्यात्मासारख्या अवजड व आकलनास दुर्बोध विषयावरही तळमळीने लिहिणारे देसाई हे दुर्मीळ लेखकांमधील निःसंशय अग्रणी लेखक! ते स्वतःला सदाराम म्हणवून घेत असत व त्यांचा नित्य संवाद चालत असे तो आत्मारामाशी!

उपासना पत्रिकेच्या अंकामध्ये त्यांनी अनेक मंत्र, मंत्रजपाची पद्धती, अनेक स्तोत्रे, काहींची संहिता, काहींचा भावार्थ, अजपाजप विधानाविषयी, शिवकवच फलप्राप्तीविषयी, बृहदारण्यक उपनिषद यांच्या विधिविधानासंबंधी लिहिलेली माहिती अनमोल आहे.

प. स. देसाई यांच्या या समग्र लेखनाचा अभ्यास करायचा म्हणजे मुंगीने पर्वत ओलांडण्यासारखेच आहे. त्यांच्या प्रतिभेचे एकेक पैलू अचंबित होण्यासारखेच आहेत. एक पापुद्रा काढावा, तर आतमध्ये दुसरा. तोही हळुवारपणे सोडवावा, तर त्याच्या आत त्याच्याहूनही तजेलदार पापुद्रा तयारच. अशा प्रकारे चौफेर बुद्धिमत्ता असलेले, आयुष्यभर लोकांचे प्रबोधन करण्याचा वसा घेतलेले हे महान लेखक २६ एप्रिल १९८२ रोजी, अक्षय्य तृतीयेला साहित्याच्या ललितरम्यविलास शब्दसृष्टीत अंतर्धान पावले. अशा ह्या हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्त्वाला शतशः वंदन!

 • उज्ज्वला चंद्रशेखर धानजी
  (बँक ऑफ महाराष्ट्र, तळेरे शाखा येथे कार्यरत; लेखिका, कवयित्री)
  पत्ता : मु. पो. कलमठ, नाडकर्णीनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
  मोबाइल :
  ८३८०९ ३७६८१
  …..
  सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
  ……
  (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply