आश्विन महिन्यातील उपासना – श्रीसूक्त; परिचय आणि अनुवाद

धनंजय बोरकर

भारतीय कालगणनेनुसार शके १९४२मधील शारदीय नवरात्रौत्सव आज, १७ ऑक्टोबर २०२०पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने श्रीसूक्ताचा परिचय, तसेच मराठी अनुवाद कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे. ते बीई (इलेक्ट्रॉनिक्स), डीएमएस असून, ते सेवानिवृत्त इलेक्ट्रॉनिक (एविऑनि़क्स) इंजिनीअर आहेत. त्यांनी डीआरडीओ, एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये नोकरी केली; मात्र यापलीकडे जाऊन संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व पद्य रूपांतर करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. कविकुलगुरू कालिदासाचे ऋतुसंहार, जयदेवाचे गीतगोविंद, मूकशंकराचार्यांचे मूकपंचशती या काव्यांचे व इतर अनेक संस्कृत स्तोत्रांचे मराठी समश्लोकी रूपांतर त्यांनी केले आहे. त्यांच्या ऋतुसंहार काव्यावर आधारित दृक्श्राव्य कार्यक्रमाचे (स्लाइड शो) प्रयोग पुणे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाले आहेत. सिंगापूरमधील वास्तव्यात महाराष्ट्र मंडळाचे कोषाध्यक्ष आणि अध्यक्ष या नात्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. तसेच अनेक हौशी नाटकांमधून त्यांनी भूमिकाही वठवल्या आहेत. त्यांनी करून दिलेला श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचेचा क्रमवार मराठी अनुवाद कोकण मीडियाच्या वेबसाइटवर महिनाभर प्रसिद्ध केला जाणार आहे.
नाव आणि संपर्क : श्री. धनंजय मुकुंद बोरकर,
ए १८, वुडलँड्स, गांधी भवन मार्ग,
कोथरूड, पुणे – ४११ ०३८.
मोबाइल : ९८३३० ७७०९१
ई-मेल : bobhamu@gmail.com
…….
परिचय श्रीसूक्ताचा
श्रीसूक्त हे ऋग्वेदात समाविष्ट असले, तरी ते ‘खिलसूक्त’ या प्रकारात मोडते. एखाद्या प्रकरणाला अथवा मुख्य साहित्यप्रकाराला परिशिष्ट म्हणून जोडलेल्या साहित्याला खिल असे म्हणतात. वेदव्यासांनी संपादित केलेल्या ऋग्वेदाच्या मूळ संहितेत नसलेली, परंतु नंतर त्यात समाविष्ट केली गेलेली अशी ही सूक्ते खिलसूक्त, परिशिष्टसूक्त वा पदशिष्टसूक्त या नावांनीही ओळखली जातात.

काही वेळा मुख्य साहित्यकृतीला असे परिशिष्ट नंतरही जोडलेले असू शकते. कधी कधी मूळ कृती काळाच्या ओघात लुप्त होऊन फक्त परिशिष्टच शिल्लक राहिले, अशीही उदाहरणे आहेत. ऋग्वेदातील या प्रकारची अशी अनेक सूक्ते आहेत. पं. मॅक्समुलर यांच्या मते ३२, पं. सातवळेकर यांच्या मते ३६, तर वैदिक संशोधन मंडळानुसार सुमारे ८० खिलसूक्ते आहेत. वैदिक कर्मानुष्ठानात समावेश केलेला परशाखेतील भाग (ऋक्संहितेतर पवित्र मंत्र) असाही त्यांचा उल्लेख आढळतो. अभ्यासकांच्या मते ही यजुः वा सामवेद काळात रचली गेली असावीत. श्रीसूक्त हे त्यातीलच एक. पाचव्या मंडलाच्या अखेरीस आलेले हे सूक्त भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

हिरण्यवर्णामिति पञ्चदशर्चस्य सूक्तस्य
आनन्दकर्दमचिक्लीतेन्दिरासुता ऋषयः श्रीर्देवता
आद्यास्तिस्रोऽनुष्टुभः चतुर्थी बृहती पञ्चमीषष्ठ्यौ त्रिष्टुभौ
ततोऽष्टाऽवनुष्टुभः अन्त्या प्रस्तारपङ्क्तिः ।

हिरण्यवर्णाम् या पंधरा ऋचांच्या सूक्ताचे (कवी) इंदिरापुत्र आनंद, कर्दम, चिक्लीत हे ऋषी, लक्ष्मी देवता असून, सुरुवातीच्या तीन ऋचा अनुष्टुभ, चौथी बृहती, पाचवी व सहावी त्रिष्टुभ, नंतरच्या आठ अनुष्टुभ व शेवटची प्रस्तार छंदात आहे.
काही अभ्यासकांच्या मते, प्रत्येक ऋचेचा ऋषी, छंद, देवता आणि विनियोग वेगवेगळे आहेत. आनंद, कर्दम, चिक्लीत, श्रीदा आणि इंदिरा हे ऋषी; अग्नी आणि श्रीदेवी या देवता, ‘हिरण्यवर्णाम्’ हे बीज ‘ताम् म आवह’ शक्ती आणि ‘कीर्तिमृद्धिम्’ कीलक आहे.

आजपासून दररोज पाहू या श्रीसूक्ताचा अनुवाद.
……..
१७ ऑक्टोबर २०२०
निज आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४२

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥

अर्थ : हे अग्ने (जातवेद), सोन्यासमान वर्ण असणाऱ्या, सर्व पातकांचे हरण करणाऱ्या (हरिणीसमान सुंदर, चपळ असणाऱ्या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.
…………

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २ ॥

अर्थ : हे अग्ने, त्या कधीही दूर न जाणाऱ्या (अविनाशी) लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर, जिच्याकडून मला धन, गाय, घोडा तसेच पुरुष (नातलग, मित्र) मिळावेत.
…………

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥ ३ ॥

अर्थ : जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे, मध्यभागी रथ आहेत (जी रथात बसलेली आहे), जेथे हत्ती ललकारी देत आहेत, अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
…………

कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तांतर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ४ ॥

अर्थ : जिचे हास्य चमकदार आहे, जी सुवर्णमखरात विराजमान आहे, जी मायाळू आहे, तेजस्वी आहे, स्वतः तृप्त असून इतरांनाही तृप्त करते, जी कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे, अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
…………

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५ ॥

अर्थ : चंद्रासमान आभा असलेली, जिचे यश देदीप्यमान आहे, तिन्ही लोकात देव जिची पूजा करतात, जी उदार आहे, अशा या `ई’ नामक लक्ष्मीला मी शरण जातो. माझे दारिद्र्य नष्ट होवो, अशी तुला प्रार्थना करतो.
……

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६ ॥

अर्थ : हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी, तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष. त्याची फळे तपाच्या बलाने (माझ्या) अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करोत.
(टीप – येथे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी लक्ष्मीच्या तपःसामर्थ्याने फुले न येताच फळणारा बेलाचा वृक्ष निर्माण झाला असा अर्थ घेतला आहे.)
…………

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७ ॥

अर्थ : देवांचा मित्र (कुबेर) कीर्ती आणि जडजवाहिर यांच्यासह माझ्याकडे येवो. मी या देशात उत्पन्न झालो आहे. तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देवो.
(टीप – पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘मणिना सह’ याचा अर्थ चिन्तामणिसह असा घेतला आहे. परंतु चिन्तामणि हा शब्द निश्चितपणे काय दर्शवितो, हे स्पष्ट होत नाही.)
………..

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वा न् निर्णुद मे गृहात् ॥ ८ ॥

अर्थ : भूक, तहान, अस्वच्छता (रूपी) थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो. संकटे, अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे.
………..

गन्धद्वारां दुराधर्षा न् नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९ ॥

अर्थ : जी सुवासांचे प्रवेशद्वार आहे, जिच्यावर आक्रमण दुरापास्त आहे, जेथे नित्य समृद्धी नांदते आणि जी संपन्नेतेचे अवशेष सोडते, अशा त्या सर्व प्राणिमात्रांच्या स्वामिनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो.
………..

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १० ॥

अर्थ : (माझ्या) मनीच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती, वाणीचा सच्चेपणा, पशू, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते, ती लक्ष्मी मला यश देवो.
………..

कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११ ॥

अर्थ : जनांसाठी चिखल (कर्दम) हाच आधारभूत आहे. हे कर्दमा (इंदिरेचा पुत्र), तू मजबरोबर राहा. माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर.
………..

आपः स्रजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
 नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२ ॥

अर्थ : जलातून ओलसर (चिक्लीत) लोभसता निर्माण होऊ दे. हे चिक्लीता, माझ्या घरात निवास कर. (आणि तुझ्याबरोबर) माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर.
………..

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
 चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १३ ॥

अर्थ : हे अग्ने, कमळांच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या, (जनांचे) पोषण करणाऱ्या, सोनेरी वर्णाच्या, कमळांचा हार घातलेल्या, चंद्रासारख्या (शीतल), सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
………..

अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply