संगमेश्वरातील ४०० वर्षांचा इतिहास असलेली नवरात्रातील तुणतुणे परंपरा

कोकणात, खासकरून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात नवरात्रौत्सवात नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. शहाजीराजांनी सुरू केलेली ही परंपरा सरवदे समाजाने गेली ४०० वर्षं निष्ठेनं जपली आहे. इथून पुढच्या काळात मात्र ती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या परंपरेविषयी…
………
कोकणात गणपती उत्सवाप्रमाणे घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव. तसं पाहिलं तर हा गुजराती बांधवांचा उत्सव; पण कोकणात हा उत्सव खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो. आणि ह्या उत्सवाचा अविभाज्य म्हणजे नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये.

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात ही परंपरा मोठी आहे. सरवदे समाज ही परंपरा गेली चारशे वर्षं निष्ठेनं जपत आला आहे. तालुक्यातील देवळे ह्या गावाला लागून असलेल्या चाफवली ह्या गावात रसाळ, यादव, मोरे, रणसे, सुर्वे, भागवत, केतकर ही आडनावं लावणारा सरवदे समाज राहतो. गावात त्यांची एकूण २८ घरं आहेत. सरवदेवाडी ह्या नावानंच ही वाडी ओळखली जाते. वाडीतील प्रत्येक घराला तालुक्यातील गावं वाटून दिली आहेत. त्या घरातील लोक त्याच गावात जाऊन भुत्याच्या वेशात नवरात्रातून तुणतुणेवादनाची परंपरा चालवतात. (वरील फोटोत : तुणतुणे परंपरा सादर करताना प्रकाश रसाळ आणि संतोष यादव)

ह्या परंपरेला चारशे वर्षांचा इतिहास आहे. ही परंपरा सुरू केली ती शहाजीराजांनी. त्यामुळे शहाजीराजे हे ह्या समाजाचं दैवत. शहाजीराजांनी ह्या समाजाची नेमणूक बहुरूपी म्हणून केली. त्यांच्या काळात ह्या समाजाचे लोक कोणतं ना कोणतं रूप घेऊन गावागावातून फिरत आणि शत्रूची माहिती काढून आणत. त्यामुळे त्या काळात गुप्तहेर म्हणून हे लोक प्रसिद्ध होते. कालांतरानं शहाजीराजांनी त्यांची नेमणूक महसूल गोळा करण्यासाठी केली. महसूल गोळा करणारे अधिकारी म्हणून त्यांना ताम्रपत्र देण्यात आलं. सरवदे समाज वर्षातून गोळा होणाऱ्या महसुलापैकी एक हिस्सा स्वत:ला ठेवून उर्वरित तीन हिस्से शहाजीराजांकडे जमा करत असत.

शहाजीराजांनंतर स्वराज्यात शिवाजीराजांनी आणि संभाजीराजांनी सरवदे समाजाच्या ह्या कामात कोणताही बदल केला नाही. स्वराज्यातही सरवदे समाज महसूल गोळा करत असे. ही परंपरा थेट पेशवेकाळापर्यंत सुरू होती. पेशवाईच्या अस्तानंतर आलेल्या इंग्रजांनी मात्र ह्या परंपरेत बदल केला आणि नवरात्रातील केवळ नऊ दिवसांचा महसूल सरवदे समाजाकडे ठेवण्यास परवानगी दिली. उर्वरित ३५६ दिवसाचा महसूल इंग्रजांना द्यावा लागत असे. स्वातंत्र्यानंतर ही प्रथादेखील बंद पडली आणि तुणतुणे परंपरा तेवढी सुरू राहिली.

भैरी देवी, भवानी देवी, वाघंबर, काळकाई देवी, रूपाजीबाबा, इटलाई देवी, सात आसरा देवी, पितरबाबा आणि ब्राह्मण ही ह्या समाजाची प्रमुख नऊ दैवतं. नवरात्रातील नऊ दिवस ते कवड्यांची माळ गळ्यात घालतात. हे नऊ दिवस हे लोक त्यांना नेमून दिलेल्या गावात जाऊन राहतात. ग्रामदेवतेच्या देवळात त्यांचा मुक्काम असतो. रोज सकाळी हे लोक प्रथम ग्रामदेवतेच्या देवळात जातात. देवळात सकाळी आरती गाऊन त्यांच्या दिनचर्येला प्रारंभ होतो. तिथून ते मग गावातील घरं घेण्यास सुरुवात करतात. प्रत्येक घरात जाऊन घरातील देवासमोर आरती म्हणतात. असं करत प्रत्येक घर घेत ते पुढे जातात. संध्याकाळ झाली की पुन्हा ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन संध्याकाळची आरती म्हणतात आणि त्या दिवसाची सांगता होते. नऊ दिवसांत ह्या दिनचर्येत खंड पडत नाही. ह्या नऊ दिवसांत घरोघर फिरून ते सगळं गाव पूर्ण करतात. केवळ बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या घरात मात्र ते जात नाहीत. गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर कवड्यांची अथवा गांधी टोपी, खांद्याला अडकवलेला देवीचा देव्हारा, हातात तुणतुणे असा त्यांचा साधा वेश असतो. नऊ दिवस संपूर्ण अनवाणी पायांनी ते गावात फिरतात. हे नऊ दिवस हे लोक अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान पूर्ण वर्ज्य करतात. (या परंपरेची झलक दर्शविणारा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.)

सरवदे समाजाच्या प्रमुख नऊ देवांचे टाक

इंग्रजांच्या काळापासून महसूल प्रथेवर मोठा परिणाम झाल्यामुळे चरितार्थाचा मोठा प्रश्न ह्या समाजापुढे उभा राहिला. त्यामुळे नवरात्र काळात केलेल्या सेवेबद्दल त्यांना धान्य देण्याची प्रथा सुरू झाली. घरात येऊन देवासमोर आरती गाण्याचा मोबदला म्हणून त्यांना घरटी पायलीभर भात देण्याची प्रथा होती; पण हे भात नवरात्रातून भुत्ये घेत नसत. दिवाळीनंतर होणाऱ्या तुळशीविवाहानंतर भात घेण्यासाठी हे लोक पुन्हा नेमून दिलेल्या गावात जात असत. सोबत तीन-चार माणसं बरोबर घेऊन गावात घरोघरी फिरून धान्य गोळा करत आणि धान्याची पोती आपापल्या घरी आणत. धान्य गोळा करण्याचा ह्या प्रथेला त्यांच्या समाजात ‘उकळ’ असं म्हणत.

… पण आता काळ बदलला. उकळ केलेलं धान्य नेण्यासाठी पुन्हा गावात जाणं अवघड झालं. सोबत माणसंही मिळेनाशी झाली. त्याचबरोबर स्वत:ची थोडीफार शेती असल्यामुळे सरवदे समाजानं आणखी धान्य आणण्याची प्रथा मागील पाच वर्षांपासून बंद केली. आता ‘उकळ’ ही रोख व्यवहारानं होते. गावात प्रत्येक चुलीमागे पन्नास रुपये असा व्यवहार ठरला आहे.

गेल्या काही वर्षांत मात्र तुणतुण्याची ही परंपरा काही गावांतून बंद पडली आहे. ही परंपरा चालवत असलेली सध्याची पिढी आता ज्येष्ठ झाली आहे. त्यामुळे ज्या गावातील भुत्ये वयोवृद्ध झाले किंवा ज्यांचं निधन झालं त्या गावात आता नव्याने ह्या समाजातील कोणी तरुण भुत्या होऊन येत नाहीत. सरवदे समाजातही शिक्षणाचं महत्व पटल्यामुळे पुढची पिढी सुशिक्षित, उच्चशिक्षित झाली आहे. त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, त्यांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले. ह्या सगळ्यामुळे पुढची पिढी ही परंपरा जोपासण्यात उत्सुक दिसत नाही.

त्यामुळे शहाजीराजांपासून चालत आलेली चार शतकांची ही तुणतुणे परंपरा सध्याच्या पिढीबरोबरच अस्ताला जाण्याच्या काठावर उभी आहे.

  • अमित पंडित
    मोबाइल :
    ९५२७१ ०८५२२
    ई-मेल : ameet293@gmail.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply