रत्नागिरीत पुढच्या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनिश्चितता संपली आहे. येत्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२९ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सामंत बोलत होते. ते म्हणाले, की विजय राजाराम शेगोकार यांची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे समन्वयक म्हणून नियुक्ती झाली असून रत्नागिरीच्या नियोजित महाविद्यालयाचे डीन म्हणून डॉ. शैलेंद्र जाधव काम पाहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आवश्यक तेवढ्या जागांची पूर्तता करण्यासाठी आज तातडीने रत्नागिरीचा दौरा केला आहे. रत्नागिरीजवळच्या दांडे आडोम गावात १७ एकर, तर कापडगावमध्ये साडेआठ एकर अशी शासनाची साडेपंचवीस एकर जागा महाविद्यालयासाठी देण्याचे ठरविण्यात आले आहे. या दोन्ही जागा लवकरच नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांच्या नावे होणार आहेत. रुग्णालयापासून पंधरा मिनिटे किंवा दहा किलोमीटर परिसरात महाविद्यालयासाठी आवश्यक संकुले उभारली गेली पाहिजेत, असा नियम आहे. त्या दृष्टीने या जागा निश्चित करण्यात आल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

येत्या ३० नोव्हेंबरपूर्वी महाविद्यालयाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयाचे कामकाज सुरू होईल. त्याबाबतचा शासन आदेश लवकरच निघणार आहे. येत्या म्हणजे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे येथे प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचा विचार होता. मात्र त्याऐवजी मिऱ्या गावात बावीस एकर जागेवर प्राणिसंग्रहालय उभारले जाणार आहे. औरंगाबाद, पुणे आणि जयपूर या प्राणिसंग्रहालयांशी रत्नागिरीतील प्राणिसंग्रहालय संलग्न असेल. प्राण्यांची अदलाबदल करण्याकरिता ही संलग्नता आवश्यक असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मेरिटाइम युनिव्हर्सिटी सुरू करण्याचाही विचार असल्याचे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply