मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर – भार्गवराम आचरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यवेड्या मालवण तालुक्याने तीन भार्गवराम मराठी रंगभूमीला दिले. भार्गवराम उर्फ मामा वरेरकर, भार्गवराम उर्फ मामा आचरेकर आणि भार्गवराम उर्फ दादा पांगे. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन. तसेच, भार्गवराम आचरेकर यांचा स्मृतिदिनही २७ मार्च. त्या निमित्ताने, मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर अशी ओळख असलेले भार्गवराम उर्फ मामा आचरेकर यांच्याबद्दल त्यांच्याच आचरा (मालवण) या गावातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
………………………
आपल्या मराठी रंगभूमीच्या भरभराटीत योगदान असलेल्या सर्व नाट्यकर्मी आणि नाट्यधर्मी बुजुर्गांना ‘नमन नटवरा विस्मयकारा!’ आपल्या रंगभूमीच्या सांस्कृतिक वारशात संगीत रंगभूमी म्हणजे मानाचे पान! अनेक नटश्रेष्ठांनी धनाची अपेक्षा न ठेवता मराठी रंगभूमीला आपले तन-मन अर्पण केले. त्यात ललितकलादर्श नाट्यमंडळी संस्थेचे भार्गवराम आचरेकर यांना अजूनही एकविसाव्या शतकातील पिढी विसरू शकली नाही. याला कारण भार्गवराम आचरेकर यांनी मराठी संगीत रंगभूमीला केवळ आपला पल्लेदार आवाजच दिला नाही, तर मराठी संगीत रंगभूमीसाठी ते पहाड म्हणून उभे ठाकले. रंगभूमी पायीची सेवा, निष्ठा आणि प्रेम याच्याशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही, स्वतःला कितीही आर्थिक, शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागल्या तरीही…! म्हणूनच ते मराठी संगीत रंगभूमीचे भार्गवमामा आचरेकर झाले. मामांना मराठी रंगभूमीशी असलेले ते रेशीमबंध कधीही तोडता आले नाहीत.

आचऱ्यातील रामेश्वर मंदिरात रंगलेल्या भार्गवमामांच्या अनेक मैफलींपैकी एक. तबल्यावर ज्येष्ठ तबलावादक वसंतराव आचरेकर. मैफलीचा आनंद लुटताना पं. जितेंद्र अभिषेकीबुवा.

मालवण नगरीचे तीन भार्गवराम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यवेड्या मालवण तालुक्याने तीन भार्गवराम मराठी रंगभूमीला दिले. त्यापैकी एक नाट्यकार (ललितकलादर्श नाट्यमंडळींचे हक्काचे) भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर, दुसरे ललितकलादर्श नाट्यमंडळींचे गायक नट भार्गवराम आचरेकर (उर्फ मामा आचरेकर) आणि तिसरे भार्गवराम पांगे (उर्फ दादा पांगे). यापैकी मामा वरेरकर मालवण नगरीचे, तर भार्गवराम आचरेकर आणि भार्गवराम पांगे दोघेही मालवण तालुक्यातील आचरे गावचे. या ठिकाणी तीन भार्गवांचा एक अपूर्व योगायोग आणि मराठी रंगभूमीसाठी असलेले योगदान आपणास मुद्दाम सांगावेसे वाटते. नाट्यकार भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर यांचे ‘कुंजविहारी’ हे नाट्यलेखनातील शुभारंभाचे नाटक. भार्गवराम उर्फ मामा आचरेकर यांची याच ‘कुंजविहारी’ नाटकातील ललितकलादर्श नाट्यमंडळी संस्थेतील पहिलीच प्रमुख भूमिका, तीही कृष्णाची! आणि या नाटकात पडद्यामागील नाट्यनिर्मात्याची भूमिका वठविणारे होते भार्गवराम उर्फ दादा पांगे. म्हणून मराठी रंगभूमीच्या उभारणीत मालवणच्या तीनही भार्गवरामांचे लेखक म्हणून, गायक नट म्हणून आणि नाट्यनिर्माता म्हणून मानाचे स्थान आहे. 

आपापल्या कलाक्षेत्रातील ‘गंधर्व मंडळीं’चे दुर्मीळ छायाचित्र. (डावीकडून) वसंतराव आचरेकर, पं. राम मराठे, काकासाहेब फणसे, यशवंत जोशी, भार्गवराम आचरेकर, बाबूराव नेजकर. (वसंतराव आचरेकर, बाबूराव नेजकर हे संगीतकार वसंत देसाईंकडे तबला, हार्मोनियमसाठी होते.

कलासक्त हे गुणिजन मंडित आचरे
आचरे गावाने रंगभूमीला अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार दिले आहेत. त्यापैकीच भार्गवराम आचरेकर एक.  भार्गवराम आचरेकर यांचा जन्म आचरे गावात १० जुलै १९१० रोजी झाला. लहानपणीच आई-वडिलांच्या छत्राला ते पोरके झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू अवधूत आचरेकर यांनी केला. अवधूत आचरेकर ही संगीतातील एक जाणकार व्यक्ती त्या काळी मानली जायची. भार्गवमामांची आईदेखील संगीताची चांगलीच जाणकार होती. त्यामुळे गाण्याचा गोड गळा परंपरेने घरातूनच लाभलेला. अवधूतकाकांनी आपल्या बंधूची संगीताची आवड अगदी बालपणापासून जोपासली. भार्गवमामादेखील संगीत शिकण्यात रमून जायचे. शालेय शिक्षणापेक्षा संगीतातच त्यांचा आत्मा अधिक रमायचा.

आचऱ्यात वझेबुवांच्या गायकीच्या ढंगाने ‘चंद्रिका ही जणू सादर’ करीत असताना भार्गवमामा. तबल्यावर अर्थात वसंतराव आचरेकर. बाजूला आचरे संस्थानचे तबलजी केसरीनाथ आचरेकर. तानपुऱ्यावर आचरे संस्थानचे दरबारी गायक साळुंके बुवा.. कराडकर

संगीत शारदा’तील भूमिकेने भाग्य उजळले
त्या वेळी आचरे येथील सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिराच्या शेजारीच देऊळवाडीमध्ये ‘श्री देव रामेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ’ नावाची नाट्यसंस्था होती. ही नाट्यसंस्था  ग्रामीण भागातील असली, तरीही त्या काळी तिचा नावलौकिक परिसरात होता. शिक्काकट्यार, राक्षसी महत्त्वाकांक्षा, संगीत सौभद्र, संगीत मानापमान यांसारखी नाटके ही संस्था बसवायची. त्यांचे प्रयोगही परिसरात होत. एकदा या मंडळाने शारदा नाटकाचा देखणा प्रयोग सादर केला. त्या नाटकात छोट्या शालेय भार्गवला ‘वल्लरी’ची भूमिका मिळाली. त्याचे काम एवढे चांगले झाले, की त्याच्या अभिनयाचा सुगंध मालवणच्या डॉ. आजगावकर यांच्यापर्यंत गेला. डॉ. आजगावकर हे जसे मालवण नागरीचे सुप्रसिद्ध धन्वंतरी होते, तसे ते नाट्यरसिक आणि नाट्यजाणकार होते. ललितकलादर्श नाट्यमंडळी या संस्थेशी त्यांचे अगदी घरोब्याचे आणि प्रेमाचे संबंध होते. बापूसाहेब पेंढारकर यांचे डॉ. आजगावकर यांच्याकडे येणे-जाणे असे.

त्याच सुमारास साधारणतः १९२५ साली ‘ललितकलादर्श’ या नाटक कंपनीचा मुक्काम मालवणला पडला होता. बापूसाहेब पेंढारकर (भालचंद्र पेंढारकरांचे वडील) कंपनीसोबत होतेच. छोट्या भार्गवच्या अभिनयाची कीर्ती त्यांच्या कानी पोहोचली. डॉ. आजगावकर आणि बापूसाहेब पेंढारकर लगेच आचऱ्यात आले. त्या वेळी आचरे-मालवण रस्ता फारच बिकट होता. दोन नद्या, खडतर रस्ता. तरीही दोघे आचऱ्यात दाखल झाले. भार्गवराम आचरेकरांचे ज्येष्ठ बंधू अवधूत आचरेकर यांच्याकडे त्यांनी भार्गवची मागणी केली. अवधूत आचरेकर यांनी आपल्या बंधूच्या उज्ज्वल भविष्यासाठी भार्गवला बापूसाहेब पेंढारकरांच्या स्वाधीन केले.

छोट्या भार्गवला ‘ललितकलां’चे पंख
बापूसाहेबांची ललितकलादर्श नाट्यमंडळी ही त्या काळातली गाजलेली नाट्यसंस्था. त्या संस्थेने भार्गवमामांना आपल्या पंखाखाली घेतले. हाच भार्गवराम आचरेकरांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. ‘ललितकलादर्श’मधील १९२४ ते १९३६ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्यजीवनाची चढती कमानच ठरली. त्यांच्या जीवनातला हाच अत्यंत उमेदीचा आणि ऐश्वर्याचा काळ होता. नटश्रेष्ठ बापूराव पेंढारकरांच्या सान्निध्याने याच काळात आचऱ्यातील या हिऱ्याला पैलू पडले.

‘मम आत्मा गमला’ 
आपले जीवनच मराठी संगीत रंगभूमीसाठी आहे, हा संस्कार भार्गवमामांना ललितकलादर्श नाट्यमंडळींच्या विविध नाटकांनी आणि विविध भूमिकांनी दिला. ‘ललितकला’च्या ‘कुंजविहारी’ नाटकातील कृष्ण ही मामांची पहिलीच भूमिका गाजली. अर्थात त्या नाटकाचे लेखक होते दुसरे भार्गवराम तथा मामा वरेरकर. त्यानंतर त्यांची अभिनयाची कमान चढतीच राहिली. वधूपरीक्षा, शारदा, पुण्यप्रभाव, इत्यादी नाटकांतही त्यांना भूमिका मिळू लागल्या. कोल्हटकर, देवल, गडकरी या त्या काळातल्या वैभवाच्या शिखरावर असलेल्या मोठ्या नाटककारांच्या नाटकात प्रमुख भूमिका करायला मिळणे हे मानाचे पान होते. मामांनी आपल्या अभिनयकौशल्याने तेही प्राप्त केले होते. त्यानंतर भार्गवराम आचरेकरांचा अभिनयाचा वेलू मराठी संगीत रंगभूमीवर गगनाचाच वेध घेत राहिला. त्यानंतर कंपनीचे मालक बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर भार्गवराम आचरेकर यांनी मानापमान नाटकातील ‘धैर्यधर’, शिक्काकट्यार नाटकातील ‘शाहू’ या अवघड आणि पल्लेदार गायकीच्या भूमिका अगदी तरुणपणी साकारल्या आणि पं. रामकृष्णबुवा वझे (वझेबुवा) यांची गायकी नाट्यसंगीताच्या माध्यमातून सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवली.

आचऱ्यातील इतर गायकांच्या मैफली तेवढ्याच तन्मयतेने ऐकणारे भार्गवमामा.

सारेच गुरू बुजुर्ग!
बापूसाहेब पेंढारकरांनी या हिऱ्याला पैलू पाडत असताना हातचे काहीच राखून ठेवले नव्हते. पूर्वी नाटक कंपनीत नवीन पोरगं दाखल झालं, की त्याचे गुण ओळखून त्याला घासून-पुसून स्वच्छ केलं जाई. भार्गवराम आचरेकर यांना नाटक कंपनीत असतानाच बापूराव पेंढारकरांनी पं. पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकर बुवा, रामकृष्ण वझेबुवा यांच्या खास तालमी ठेवल्या होत्या. मामांनी रियाजाचा आणि संगीत शिक्षणाचा कधीही कंटाळा केला नाही. ललितकलादर्श नाट्यमंडळींचा मुक्काम ज्या वेळी दोन वर्षे मुंबईत होता, तेव्हा तर मामांना दोन वर्षे बशीरखाँसाहेबांची तालीम देण्यात आली होती. त्या काळातील ही खर्चिक बाब होती. तरीपण मामांच्या गायन संस्कारात बापूसाहेब पेंढारकरांनी काहीही कमी पडू दिलं नाही. ‘भार्गव’च्या केवळ गाण्याकडेच नाही, तर अभिनयाकडेही बारकाईने लक्ष पुरविले.

अभिनयाचा ‘सोन्याचा कळस’
भार्गवराम आचरेकर यांना मराठी रंगभूमी भार्गवमामा आचरेकर किंवा मामा आचरेकर याच नावाने ओळखू लागली. ती ओळख त्यांचा भारदस्त पल्लेदार आवाज, लाघवी, ओजस्वी व्यक्तिमत्त्व याने करून दिलेली. ‘ललितकला’चे नाटक असले, की नाट्यरसिक नाट्यसंगीताच्या या स्वरभास्कराला डोळे भरून पाहण्यासाठी आणि कान भरून ऐकण्यासाठी गर्दी करू लागले. मामांच्या अभिनयाचा ‘कळस’ मराठी नाट्यरसिकांनी अनुभवला तो दिवस होता १५ ऑक्टोबर १९३२चा. मालवणचे सुपुत्र भार्गवराम वरेरकर उर्फ मामा वरेकर यांनी लिहिलेल्या ‘सोन्याचा कळस’ या नाटकाने दुसरे भार्गवराम उर्फ मामा आचरेकर यांना अभिनय-कीर्तीची पताका मिळवून दिली. या नाटकात सरळसरळ पण फटकळ स्वभावाची मराठमोळी ‘बिजली’ रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. भार्गवराम आचरेकर म्हणजे ‘बिजली’ आणि ‘बिजली’ म्हणजेच भार्गवमामा असे समीकरण मराठी नाट्यरसिकांनी केले होते. त्या वेळी असे म्हटले जायचे, की भार्गवराम आचरेकरांना डोळ्यांसमोर ठेवूनच मामा वरेकरांनी बिजलीची भूमिका ‘सोन्याचा कळस’साठी लिहिली.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाकडून कौतुक
अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम भार्गवराम आचरेकरांना कीर्तीच्या अत्युच्च स्थानी घेऊन गेला. त्यांच्या ‘बिजली’ या भूमिकेचे कौतुक आणि भार्गवमामांचा सत्कार करताना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘भार्गवराम आचरेकर हे मराठी संगीत रंगभूमीचे भाग्यशाली गायक नट. ‘नवताम् उपैति’ हे प्रतिभेचे लेणे जरी भार्गवमामांच्या गायकीत आढळलं, तरी अभिनय, गायन आणि रूपलावण्य या त्रिवेणी संगमानेच मराठी रसिक आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ज्या ज्यावेळी त्यांच्या नाटकाला जात, त्या त्या वेळी आपल्या त्रिवेणी संगमाने भार्गवमामांनी त्यांना त्या क्षणाचे सोने करूनच दिले. बिजलीच्या स्पर्शाने एरव्ही कळस कोसळतात; पण मामाच्या बिजलीच्या स्पर्शाने ‘सोन्याचा कळस’च उभा राहिला.’

‘ललितकलादर्श’शी अखेरपर्यंत प्रामाणिक
बापूसाहेब पेंढारकरांच्या निधनानंतर भार्गवराम आचरेकर, अनंत दामले यांनी ‘ललितकला’चा नाट्यध्वज पुनश्च उंच उभारण्याचा प्रयत्न केला. नवीन मालक म्हणजे बापूसाहेबांचे चिरंजीव भालचंद्र पेंढारकर यांना बळ दिले. दत्तोपंत भोसले, माशेलकर यांच्या सहकार्याने ‘ललितकला’च्या उभारणीत बळ दिले.

याबाबत सुप्रसिद्ध नाट्यसमीक्षक यशवंत रांजणकर यांनी मामांची एक आठवण सांगितली आहे. ती अशी –
मुंबईत, साहित्य संघाच्या डॉ. भालेराव नाट्यगृहात ‘मृच्छकटिक’ नाटकाचा प्रयोग चालू होता. त्याचवेळी नाट्यगृहाच्या महाद्वाराच्या कट्ट्यावर नाटक मंडळींच्या गप्पा-गोष्टी चालू होत्या. त्यात एकाने प्रश्न विचारला, ‘मराठी नाट्य व्यावसायिकांत, विशेषतः नाटककारांत शर्विलक बरेच आहेत; पण नाट्यसंस्थेच्या बिकट परिस्थितीतही आपला धीरोदात्तपणा अखेरपर्यंत न सोडणारे ‘चारुदत्त’ किती आहेत. समोर साहित्यसंघाचे तात्यासाहेब आमोणकरही होते. त्या सर्वांच्या समोरच साहित्यसंघाचे नाट्यनिर्माते भार्गवराम पांगे ऊर्फ दादा पांगे म्हणाले, ‘अगदी थोडे आहेत, पण आहेत. त्यातील एक ‘चारुदत’ भार्गवराम आचरेकर.’ 
एका भार्गवरामाने दुसऱ्या भार्गवरामाचा केलेला हा गौरवच होता.

‘भार्गवमामांच्या ऋणातच राहायचं अखेरपर्यंत’
ज्या ‘ललितकला’चे बिरुद भार्गवराम आचरेकर यांनी अखेरपर्यंत मिरवले, त्या कंपनीचे बापूसाहेब पेंढारकरांनंतरचे नवीन मालक झालेले सुप्रसिद्ध गायक नट भालचंद्र पेंढारकर यांनी ‘तू जपून टाक पाऊल’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात ते आपल्या मुलाला उद्देशून सांगतात, ‘इतरांची ऋणे फिटतील; पण भार्गवराम आचरेकर यांचे कंपनीवर अनंत उपकार झालेले आहेत. ते कदापिही न फिटणारे. त्यांच्या आपण ऋणातच राहू या! कंपनीचा तानपुरा आणि आवाज त्यांनी बिकट परिस्थितीतही अबाधित ठेवला आहे. त्याबाबत आपण त्यांना काहीही देऊ शकलो नाही. भार्गवराम आचरेकर हे या नाट्य व्यवसायातले ‘चारुदत्त’ आहेत. तसेच धीरोदात्त, निगर्वी, सरळ आणि प्रेमळ अंतःकरणाचा माणूस! त्यांच्या कायमच ऋणातच राहू!’

मित्रमंडळाने साजरी केली साठी!
१० जुलै १९७० रोजी साहित्यसंघ मंदिरात भार्गवराम आचरेकरांचा षष्ट्यब्दिपूर्ती सोहळा त्यांच्या मित्रांनी आणि रसिकांनी आयोजित केला. भार्गवमामांना शासनाचे फार मोठे पुरस्कार लाभले नसतील; पण रसिकांचे प्रेम लाभले. त्या सोहळ्याचे आयोजन भार्गवराम पांगे ऊर्फ दादा पांगे यांनी केले होते. त्या सोहळ्याला त्यांचे मित्र आणि नाट्यधर्मी द. ग. गोडसे, शंकर घाणेकर, नानासाहेब फाटक, भालचंद्र पेंढारकर, मा. दामले, मा. दत्ताराम, राजाराम शिंदे आदी अनेक नाट्यक्षेत्रातील बुजुर्ग माणसे उपस्थित होती. सत्काराच्या वेळी मराठी रंगभूमीवरील नटसम्राट नानासाहेब फाटक म्हणाले होते, ‘भार्गवराम आचरेकरांना एकसष्टावं वर्ष लागलं म्हणून त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत; पण त्यांच्या जन्मतारखेत काही तरी घोटाळा झाला असावा, असं मला वाटतं. त्यांना एकसष्टावं लागलं याचं चिन्ह आम्हाला कोणालाच दिसत नाही. अभिनयात नाही, रूपलावण्यात नाही आणि गाण्यातही अजिबात नाही.’
एका नटसम्राटाने दुसऱ्या नटश्रेष्ठाला दिलेली अभिनय आणि सूर लावण्यासाठीची पावतीच होती ती…

भार्गवराम आचरेकरांकडे निर्देश करीत ‘या भवनातील गीत पुराणे’ असे गौरवाने सांगणारे पं. वसंतराव देशपांडे (‘कट्यार’मधले खाँसाहेब आफताब हुसेन)


‘दिन गेले भजनाविण सारे’
मध्यंतरीचा काळ नाट्यसृष्टीच्या दृष्टीने अतिशय कठीण आला. अनेक वेळा त्यांची उपेक्षा झाली; पण मामांनी तिकडे लक्ष दिले नाही. १९४०नंतर लोंढे यांच्या राजाराम संगीत नाट्यमंडळीत, त्यानंतर दामूअण्णा मालवणकरांच्या प्रभात संगीत नाट्यमंडळीत मामांनी मुशाफिरी केली; पण आपले स्वत्व सोडले नाही. पुणे येथे आलेल्या पानशेतच्या पुराने भार्गवमामांचा पुरा संसारच वाहून गेला. त्यात त्यांच्या अनवट रागांच्या चिजाही वाहून गेल्या. संसार वाहून गेला त्यापेक्षा रागांच्या चिजांच्या सर्व वह्या वाहून घेऊन जाणाऱ्या त्या पानशेतच्या पुराबाबत मामाचे मन अस्वस्थ झाले होते. तशाही परिस्थितीत ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असू द्यावे समाधान’ ही उक्ती प्रमाण मानून मामा शांत राहिले अनेक दिवस गाण्याशिवायच गेले.

नाट्य परिषदेकडून गौरव
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पाच नोव्हेंबर १९७० रोजी भार्गवराम आचरेकर यांना ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरवले. अशा या प्रसन्न वृत्तीचा, निकोप प्रकृतीचा आणि नम्र स्वभावाचा त्या दिवशी सत्कार झाला. मामा आयुष्यभर पाच आदरस्थानांशी नतमस्तकच राहिले. मराठी संगीत रंगभूमी, रसिक प्रेक्षक, ललितकलादर्श नाट्यमंडळी, त्यांचे मालक बापूसाहेब पेंढारकर आणि त्यांचे आध्यात्मिक गुरू शंकर महाराज या पंचतत्त्वांशी तो नाट्यसंगीत भास्कर सदैव नम्रच राहिला.

कट्यार काळजात घुसली!
भार्गवमामांचा रंगमंचावरील अभिनय बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले नव्हते, अगदी त्यांच्या गावचे असूनही. मामांच्या मैफली आचरे येथील रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवात भरपूर ऐकल्या; पण रंगभूमीवरील ‘सोन्याचा कळस’मधील त्यांची बिजली बघता आली नाही आणि ‘शिक्काकट्यार’मधील शाहू. कारण त्या वेळी आम्ही जन्मालाच आलो नव्हतो. आमच्या मामांना आम्ही मनसोक्त ऐकून आणि पाहून घेतले असेल तर ते ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात. त्याचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर, संगीत जितेंद्र अभिषेकींचे आणि मामांची त्या नाटकातील भूमिका होती पंडित भानुशंकर शास्त्रींची.
त्याचे असे झाले, २४ डिसेंबर १९६७ ला मामाचा जीव की प्राण असलेल्या ललितकलादर्श नाट्यमंडळींचा हीरक महोत्सव होता. या नाटकानेच तो साहित्य संघ मंदिरात साजरा झाला. पुढे या नाटकाचे अनेक प्रयोग होत गेले. ते प्रयोग आम्ही पाहिले आणि त्या प्रयोगातील पंडित भानुशंकर शास्त्री!

या नाटकात प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या संस्थेमार्फत काम करण्याची मामांना विनंती केली. भार्गवराम पांगे, पुरुषोत्तम दारव्हेकर, स्वतः अभिषेकीबुवांनी मामांना विनंती केली. त्या काळी मामांची आर्थिक स्थितीही थोडी नाजूक होती. तरीही त्यांनी आपल्या काही तत्त्वांशी फारकत न घेता ती भूमिका स्वीकारली. त्या भूमिकेचे सोने केले. पुन्हा मराठी रंगभूमीला भार्गवराम आचरेकरांच्या कसदार आवाजाने, गोंडस घरंदाज अभिनयाने वेड लावले. रसिक मराठी मन पंडित वसंतराव देशपांडे यांचा खाँसाहेब आफताब हुसेन ऐकायला जेवढ्या रसिकतेने येत, तेवढ्याच रसिकतेने भार्गवमामांच्या पंडित भानुशंकरशास्त्रींच्या अभिनयाला आणि ‘दिन गेले भजनाविण सारे’ला दाद देत!

भार्गवमामांच्या एका नाट्यगीतासाठी तबल्यावर बसलेले पं. वसंतराव देशपांडे

आचऱ्यात अनुभवलेली आगळी ‘कट्यार ’
आमच्या आचऱ्यातील रामनवमीला पूर्वी अनेक दिग्गज गायक येत. आचरे गावचे सुपुत्र वसंतराव आचरेकर आणि भार्गवराम पांगे यांची ती कृपा असायची. भार्गवराम आचरेकर तर न चुकता रामनवमीला यायचे. त्या रामनवमीला पंडित वसंतराव देशपांडे आले होते आणि पं. जितेंद्र अभिषेकीही उपस्थित होते. कट्यार काळजात घुसली या नाटकात दोन घराण्यांचा पराकोटीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे; पण त्या रामनवमीला भार्गवराम आचरेकर ‘दिन गेले भजनाविण सारे’ गात आहेत आणि तबल्यावर खाँसाहेब पंडित वसंतराव देशपांडे तबलासाथ करत आहेत हे दृश्य आम्हाला बघता आले. भार्गवराम आचरेकर यांच्यानंतर पं. वसंतराव देशपांडे गायला बसले, त्या वेळी त्यांनी मामांकडे अंगुलिनिर्देश करून ‘या भवनातील गीत पुराणे’ या नाट्यगीताला प्रारंभ केला. त्याला पं. जितेंद्र अभिषेकींपासून सर्वांनीच दाद दिली.

मामांचा आवाज ‘कॅसेट’बद्ध
भार्गवराम आचरेकरांच्या स्वरबद्ध केलेल्या रेकॉर्ड  आज तशा आपणास कमीच मिळतात. त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीला, १९७० साली हिज मास्टर व्हॉइस (एचएमव्ही) या कंपनीने काही गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यात ‘दिन गेले भजनाविण सारे’ आणि ‘आवडीने भावे’ ही गाणी लोकप्रिय झाली.

आचरे गावची रामनवमी आणि भार्गवमामांच्या मैफली
भार्गवराम आचरेकर प्रति वर्षी रामनवमीला यायचे. मामा आल्यावर आचरा गावच्या रामनवमीची हंडी-झुंबरे दिवसाच प्रकाशित व्हायची. वाळ्याचे पडदे आणि कनाती डुलायला लागायच्या. दोन तानपुऱ्यांमध्ये मामा मांडी घालून गायला बसले, की समोरचा नटेश्वर कान देऊन मामांना ऐकून समाधी लावायचा. त्यानंतर आचरे गावच्या लोकांची खास फर्माईश ‘चंद्रिका ही जणू’, ‘शिरोळग्रामी सद्गुरू स्वामी’, ‘सह्याद्री गिरिजा’, ‘उभा का श्रीरामा’… एका मागून एक…! खरोखर भार्गवराम आचरेकर आचऱ्यात आल्यावर रामनवमी सूरलयींनी बहरून यायची. आज त्या क्षणांची आठवण झाली, की तन-मन संगीत होऊन जातं. ते सारेच दिवस मंतरलेले होते.

नाट्यसंगीतभास्कराला अभिवादन!
२७ मार्च १९९७ रोजी भार्गवराम आचरेकर यांचे पुण्यनगरीत निधन झाले. मराठी संगीत रंगभूमीचा एक अध्याय निमाला. मामांना संगीतातील अनेक अनवट राग माहीत असायचे. मामांसोबत ते सारेच गेले. आमच्या मामांच्या निधनानंतर अनेक रामनवमी आल्या आणि गेल्या. त्या रामनवमी म्हणजे आमच्या साऱ्यांचेच ‘दिन गेले भजनाविण सारे’ अशा स्वरूपाच्याच गेल्या. अगदी सुन्या सुन्या! भार्गवराम आचरेकर यांचा मृत्यू जागतिक रंगभूमी दिनी व्हावा, हाही एक योगायोगच.

पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे स्मरण करण्याचा दिवस. याच दिवशी विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग केला. त्याच रंगभूमीसाठी स्वतः मात्र वनवासी राम होऊन ज्यांनी मराठी संगीत रंगभूमीचे रामराज्य उभे केले अशा भार्गवराम आचरेकरांना अभिवादन!

तुम्हा तो शंकर सुखकर हो।

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

2 comments

  1. अप्रतिम लेख।कोकणच्या हिऱ्यांच्या कर्तृत्ववान इतिहास लेख वाचून कळला

  2. पंडित भार्गवराम आचरेकर यांना कट्यार काळजात घुसली या नाटकात प्रत्यक्ष गातांना पाहिलेला मी एक नाट्य रसिक.पंडितजी बरोबर फिरत्या रंगमंचावर छोट्या आणि मोठ्या सदाशिव ला गातांना चा प्रसंग अजून डोळ्यासमोर येतो.
    मी हा प्रयोग आधी भोपाळ येथे आणि नंतर बालगंधर्व ला पहिला आहे.
    विजयकुमार आपटे भोपाळ.वय वर्षे ८२.

Leave a Reply