फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’मुळे १७०० कुटुंबांची दिवाळी होणार आनंदमय

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ या अनोख्या उपक्रमामुळे वंचितांची दिवाळी आनंदमय होणार आहे. स्थानिकांना रोजगार, गावागावांत नळपाणी योजना राबवणाऱ्या फिनोलेक्स कंपनीने, तसेच मुकुल माधव फाउंडेशनने करोना व नैसर्गिक आपत्तीच्या काळातही दिलेला हात फारच कौतुकास्पद आहे. कंपनीला शासनाकडूनही सर्व ते सहकार्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे. बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी रत्नागिरीतील फिनोलेक्स गेस्ट हाउस येथे ‘गिव्ह विथ डिग्निटी’ या मदत वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री अनिल परब आणि मंत्री सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतरच्या समारंभात कंपनीच्या कार्याची दखल घेत संचालिका रितू छाब्रिया यांची कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समितीवर नियुक्ती केल्याचेही सामंत यांनी जाहीर केले.

या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनीही कंपनीबद्दल गौरवोद्गार काढले. करोनाने वाताहात झाली असताना कंपनीने समाजातील छोट्या घटकांना दिवाळीच्या औचित्याने आधार दिला आहे. कंपनीलाही आधार देण्याची भूमिका शासन घेईल, असे त्यांनी सांगितले.

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे. फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे यांनी ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमाची माहिती दिली. कार्यकारी संचालक संजय मठ यांनी कंपनीच्या सेरेब्रल पाल्सी उपचार केंद्राच्या आणि फिनोलेक्स कॉलेज, मुकुल माधव विद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला.

करोना व लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले. नोकरी-व्यवसाय गमवावी लागणारे घरेलू कामगार, रिक्षा व्यावसायिक आदींना या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. रत्नागिरीत अशा गटामध्ये काम करणाऱ्या गरजू व्यक्तींना शोधून या उपक्रमामध्ये लाभार्थी म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम झाला. रत्नागिरी तालुक्याातील गोळप, भाट्ये, फणसोप, कोळंबे, पावस, गावखडी आणि गणेशगुळे या गावांतील गरजूंना मदत देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, श्री. सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जि. प. अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये मुकुल माधव फाउंडेशनने २४ राज्यांमधील ७० हजार कुटुंबांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील धान्य हे शेतकरी, बचत गट आणि लघुउद्योग समूहाकडून घेऊन त्यांच्या उद्योगाला चालना देताना पर्यायाने त्यांच्या कुटुंबांनाही सहकार्य केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply