विद्याभारतीकडून माणूस घडविण्यासाठी प्रयत्न : श्रीरामजी आरावकर

ठाणे : माणूस घडविण्यासाठी माणूस जोडणे आवश्यक आहे, हा विचार पुढे नेणे असून विद्याभारतीच्या शैक्षणिक चळवळीतून ते नक्कीच साध्य होईल, असा विश्वास विद्याभारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्रीरामजी आरावकर यांनी कनेक्ट विथ विद्याभारती उपक्रमाच्या प्रारंभाच्या वेळी व्यक्त केला.

विद्याभारतीच्या कोकण प्रांतातर्फे काल (दि. २७ नोव्हेंबर) आयोजित केलेल्या कनेक्ट विथ विद्याभारती अर्थात ‘दिशा भविष्याची, कौशल्यपूर्ण शिक्षणाची’ या अभियानाला प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वतःपुरतेच पाहण्याची दृष्टी देणाऱ्या ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणून भारतीय पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी विद्याभारती प्रयत्नशील आहे. भारताला नवीन शैक्षणिक दिशा देणाऱ्या केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून संपूर्ण देशभर शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा विद्याभारतीचा प्रयत्न स्तुत्य आहे, असेही श्री. आरावकर म्हणाले. आधुनिक काळानुसार कनेक्ट विथ विद्याभारतीही संकल्पना उत्तम असल्याचे गौरवोद्गार उद्योजक आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी यावेळी काढले. श्री. आरावकर आणि डॉ. हावरे यांच्या हस्ते कनेक्ट विथ विद्याभारतीअंतर्गत नावनोंदणीला प्रारंभ झाला. आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात १२५ हून अधिक जणांचा सहभाग होता. समाजातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांत अध्यक्ष प्रदीप पराडकर होते. विद्याभारतीने अखिल भारतीय स्तरावर १३ भाषांमधून आयोजित केलेल्या MyNEP या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अंदाजे बारा लाखाच्यावर नोंदणी झाली, असे यावेळी सांगण्यात आले.

अभियान येत्या २५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानातून जोडल्या जाणाऱ्यांना प्रत्यक्ष समाजजीवनाची अनुभूती घेण्याची आणि शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या अभियानाद्वारे केवळ १०० रुपये भरून विद्याभारतीचे वार्षिक सन्माननीय सदस्यदेखील होता येऊ शकेल. याद्वारे क्रियाशोध आणि प्रकल्प, विद्वत परिषद, विविध संशोधनात्मक उपक्रमात कार्य करण्याची संधी मिळणार आहे.

विद्याभारतीच्या या ज्ञानकार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांतमंत्री संतोष भणगे यांनी केले. अधिक माहितीसाठी अभियान प्रमुख विवेक धारप (9920724704), प्रांत सहमंत्री रवींद्र मोहिते (9757394694) आणि प्रसाद सनगरे (9422054962) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply