कुसुमताई पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात मूलभूत कार्य करावे : बाळ माने

रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्थेने १७ वर्षांत २५ कोटींच्या ठेवीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने पंचविसाव्या वर्षापर्यंत २५० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे. पण त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात वेगळे आणि मूलभूत सामाजिक कार्य पतसंस्थेने उभे करावे, असे आवाहन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी येथे व्यक्त केले.

पतसंस्थेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. येथील देवर्षीनगरात हा कार्यक्रम झाला. श्री. माने म्हणाले की, ठेवी वाढविणे, त्यातून संकलित झालेल्या निधीमधून कर्जाचे वितरण करणे, कर्जाची वसुली करणे एवढेच पतसंस्थांचे काम नाही. त्यापलीकडे जाऊन पत नसलेल्यांना पत देण्याचे काम पतसंस्था करत असतात. त्यामुळेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन नवे उद्योजक निर्माण करणे, त्यांना आर्थिक पुरवठा करून उद्योजकतेला चालना देणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेनुसार स्टार्ट अपला प्रोत्साहन देणे अशा स्वरूपाचे कार्य पतसंस्थेने केले पाहिजे. तसा आदर्श निर्माण करायला हवा. रत्नागिरीच्या माजी आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आठवण जपण्यासाठी ही पतसंस्था सुरू झाली आहे. ज्येष्ठ कर सल्लागार अरुअप्पा जोशी यांनी या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या आठवणी जपतानाच नवे कार्य पतसंस्थेने उभे केले पाहिजे.

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष अशोक मयेकर यांनी पतसंस्थेच्या निर्मितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात सहकार क्षेत्रांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कोणताही सहभाग नव्हता. कर्ज घेणे आणि फेडणे ही कल्पनाच लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे ते सहकार क्षेत्रापासून दूर राहिले. भाजपच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पतसंस्था सुरू झाली आहे. असेच काम पतसंस्थेने यापुढेही सुरू ठेवावे.

पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. करोनाच्या बिकट काळातही पतसंस्था ठेवीदारांच्या विश्वासातून चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे. हा पाठिंबा आणि विश्वास टिकविण्याचा अधिकाधिक प्रयत्न पतसंस्थेच्या माध्यमातून केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

संचालिका सौ. अभिलाषा मुळ्ये, अॅड. भाऊ शेट्ये इत्यादी मान्यवरांसह संचालक, भागधारक आणि ठेवीदार या समारंभाला उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply