करोनाने दीप्ती शेडेकरांना दाखवली स्वतःच्या पायावर उभे राहायची दिशा

राजापूर : करोनातील लॉकडाउनने अनेकांना रोजगार वा उद्योग व्यवसाय गमावावा लागला. त्यातून काहींना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागले. त्यातून कोणी करोनाकडे संकट म्हणून, तर कोणी संधी म्हणून पाहिले. कळसवली (ता. राजापूर) येथील सौ. दीप्ती दिनेश शेडेकर या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने करोनाकडे संधी समजून ओणी बाजारपेठेत एस. के. सुपर मार्केट या किराणा मालाच्या दुकानाच्या नव्या व्यवसायाचा आरंभ केला आहे. करोनाच्या महामारीमध्ये कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणाच्याही पाठबळाअभावी सौ. शेडेकर यांनी जिद्दीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी टाकलेले धाडसी पाऊल अनेकांना कौतुकास्पद वाटले.

खरवते (ता. राजापूर) येथील पूर्वाश्रमीच्या रोहिणी माटल विवाहानंतर सौ. दीप्ती शेडेकर झाल्या. खरवते गाव आणि पंचक्रोशीमध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणार्याा वडिलांना सौ. दीप्ती मदत करायच्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासून व्यवसायाचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यातच व्यवसायातील खाचखळग्यांची अनुभूतीही मिळाली. लग्नानंतर त्यांनी पतीसोबत मुंबईची वाट धरली. तेथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर त्या पुन्हा गावी परतल्या. गावालाही फारसा जम बसत नसल्याने दोन मुले आणि पतीसह त्यांनी काही वर्षांमध्ये पुन्हा मुंबईची वाट चोखाळली. घरकाम करून पतीला संसार चालविण्यासाठी मदत करणार्याह सौ. दीप्ती यांना भाड्याच्या खोलीत राहून मर्यादित उत्पन्नात संसार चालविणे अवघड जात होते.

अशातच त्यांना करोनातील लॉकडाउनमध्ये काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा गावी यावे लागले. आधी करोनाची भीती, त्यात मर्यादित उत्पन्न अशा स्थितीत गावालाही दीप्ती यांना संसार चालविणे जिकरीचे जात होते. मात्र परिस्थितीला घाबरून राहण्याऐवजी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संधी शोधली. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनी बाळगली आणि ओणी बाजारपेठेमध्ये किराणा मालाचे दुकान सुरू करून नव्या व्यवसायासाला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांना पतीसह दीर योगेश शेडकरही मदत करतात.

करोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याची कारणे सांगणारे अनेकजण असतात. मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून करोनाने स्वतःला अजमावण्याची संधी मिळाल्याचे सांगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. त्यापैकी एक असलेल्या सौ. दीप्ती यांनी मोठ्या जिद्दीने सुरू केलेल्या व्यवसायाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुटुंबियांव्यतिरिक्त अन्य कोणाच्याही मदतीविना सौ. दीप्ती शेडेकर यांनी दुकान सुरू करण्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

संपर्क : सौ. दीप्ती शेडेकर – 9156902432

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply