रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.
श्री. तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. त्या निमित्ताने दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपतर्फे त्यांचा येथील रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘राम मंदिर, जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे इत्यादी गोष्टी स्वप्नवत वाटत होत्या. पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राइक होऊ शकतो, हे पाकिस्तानला मोदीजींनी दाखवून दिले. देशाला अशाच नेतृत्वाची गरज होती. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्वप्नातील भारत म्हणजे अंत्योदय होणे. समाजातील तळागाळातल्या शेवटच्या माणासेच हित होत आहे का, हे सरकारने पाहावे, अशी त्यांची कल्पना होती. अशाच तळातल्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या केंद्रात करत आहे.’
‘७० कोटी लोकांचे बँकेत खाते सुरू करणारी जनधन योजना, आठ कोटी महिलांच्या घरात प्रदूषणविरहित घरांसाठी गॅस पोहोचविणारी उज्ज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांसाठी निवृत्तिवेतन, वीस कोटी घरांपर्यत वीज पोहोचविण्याची योजना, आयुष्मान विमा योजना अशा कित्येक योजनांचे उदाहरण त्यासाठी देता येईल. या योजना समाजाच्या सर्वांत तळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असे तावडे म्हणाले.
‘ज्येष्ठ नेते विलास पाटणे यांनी सुचविल्यानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तसेच इतरही अनेक कामांसाठी मी कोकणवासी म्हणून आवर्जून प्रयत्न करणार आहे. पक्षाचा राष्ट्रीय चिटणीस या नात्याने माझी दिल्लीतील प्रमुख नेत्यांसोबत ऊठबस होणार आहे. त्याचा उपयोग कोकणाच्या विकासासाठी मी निश्चितपणे करणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
पक्षाचे चिटणीस सचिन वहाळकर आणि ज्येष्ठ नेते विलास पाटणे यांनी विनोद तावडे यांच्या भाजपमधील वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला.
श्री. पाटणे म्हणाले, ‘विद्यार्थी चळवळीपासूनचा अनुभव श्री. तावडे यांच्या गाठीशी असल्यामुळे निवडणुकीतील विजय-पराजय, उमेदवारी न मिळणे अशा अनेक प्रसंगांमधून ते गेले आहेत. आता राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर ते कोकणातील विविध समस्यांकडे लक्ष देतील. मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील ९० किलोमीटरचे काम रखडले आहे. औषधी वनस्पती लागवडीचा केंद्राच्या अखत्यारीतील प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लातूरसारख्या पाण्याची सतत टंचाई असलेल्या जिल्ह्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा बाबतीत श्री. तावडे यांनी लक्ष द्यावे.’
पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे सहसंघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनीही श्री. तावडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांची कल्पकता, त्यातून सुचलेली पुस्तकांच्या गावाची संकल्पना, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेले प्रयत्न, मराठी भाषा विकास विभागाचे काम करत असताना श्री. तावडे यांचे झालेले मार्गदर्शन याविषयी श्री. दळवी यांनी सांगितले.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले, ‘कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात श्री. तावडे यांचा मोठा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हे जाळे विणले आहे. कार्यकर्त्यांना आधार देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक निवडणुकांत त्यांनी प्रचारप्रमुख म्हणून, प्रदेशचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. ते मूळचे कोकणवासीच असल्याने हा भाग त्यांच्या परिचयाचा आहे.’
‘रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला गेली वीस वर्षे राजकीय आधार नाही. त्यामुळे कार्यकर्ता पिचला गेला. या पार्श्वभूमीवर श्री. तावडे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. श्री. तावडे यांनीही अनेक योजनांमध्ये रत्नागिरीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे लक्षात घेऊन आगामी निवडणुकीत जिल्ह्याला राजकीय परिवर्तन पाहायला हवे आहे. त्यासाठी श्री. तावडे यांनी लक्ष द्यावे,’ असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले.
कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख ऐश्वर्या जठार, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष श्री. करमरकर, कार्यवाह उमेश कुळकर्णी तसेच तालुका आणि जिल्हास्तरीय कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
