उमटलेली पाऊले पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

रत्नागिरी : श्रीवल्लभ माधव साठे यांच्या सह्याद्रीतील पदभ्रमणावर आधारित उमटलेली पाऊले या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (दि. २० डिसेंबर) रत्नागिरीत होणार आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक उषःप्रभा पागे, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, गिर्यारोहक संजय लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी उद्योजक दीपक गद्रे, जिल्हा हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, प्रकाशक डॉ. ऊर्जिता कुलकर्णी, सोहम सबनीस उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरीत टीआरपीजवळ अंबर हॉलमध्ये सकाळी १० वाजता प्रकाशन समारंभाला सुरुवात होईल. करोनाप्रतिबंधक आवश्यक ते सर्व नियम पाळून होणार असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लेख श्री. साठे यांनी केले आहे.

पुस्तकातील हा एक उतारा वाचाच ….
…… तिघेही अंधारात हळूहळू अदृश्य होत होते. गाडी इगतपुरी पार करून घोटी टोल नाक्यावरून सिन्नर रस्त्याला लागली. हा रस्ता खड्डेसमृद्ध आणि विवरभरला आहे! इथल्या खड्ड्यांना एक विलक्षण खोली आहे. जमिनीच्या पोटात डोकावण्याची अशी संधी मिळणं, हे भाग्याचं लक्षण नाही काय? पण, पामर भरकटलेला माणूस उगाचच हाडं खिळखिळी झाली म्हणून फक्त टाहो फोडण्याचं काम करतो! कर्मदरिद्री!!
तर, अशा या लोकोत्तर रस्त्याला अजमावत आम्ही पुढे जात होतो. अंधारात काहीही समजत नव्हतं आणि अचानक, आमच्या गाडीच्या चालकाने, अंधारातच उजवा हात आकाशाच्या दिशेने उंचावत सांगितलं, “ही वरती कळसूबाई!”
आम्हांला कशी दिसणार होती ती? तरीही माना डोलावल्याच आम्ही!
पुढे टाकेद फाटा डावलून इंदोरेतून आम्ही घाट चढून नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील खिंडीत आलो. लगेचच घाट उतरून बारीमधे उतरलो. आम्ही ‘ट्रेकर्स कट्टा’ गाठला आणि ‘तो लांबलचक प्रवास (एकदाचा) संपला!! परतीच्या प्रवासाचीही निश्चिती करून घेतली आणि ‘विसावलो’.

………….
अशा वैविध्यपूर्ण वर्णनाने व्यापून गेलेल्या या पुस्तकाबद्दल लेखक श्रीवल्लभ साठे यांनी अखेरच्या पानावर लिहिले आहे,
निसर्गाचे अवलोकन, निसर्गाविषयी आदर आणि निसर्गात वावरताना निर्माण होणाऱ्या आठवणी मला महत्त्वाच्या वाटतात. माझ्यासोबत जे फिरले, त्यांनी अशा आठवणींचा खजिना पुरेपूर वसूल केला आहे. या खजिन्याचे नेमके वर्णन करताना सोबतच त्या निसर्गाचेही वर्णन केलेले आहे. पदभ्रमण मोहिमांना काहीसा इतिहास आणि भूगोल वर्णनातून जोडलेला आहे. शिवाय नकाशेही दिलेले आहेत. हे प्रवासवर्णन आणि त्यातून जुळलेली नाती निश्चितच भावतील. अशाच आठवणी निसर्गाच्या गोळा होवोत, या सदिच्छेने घेतलेला उमटलेल्या पावलांचा हा मागोवा!

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply