अभाविपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रत्नागिरीतील २०० जण सहभाग घेणार

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहासष्टावे राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी नागपूर येथे येत्या २५ आणि २६ डिसेंबर रोजी होणार असून त्यामध्ये रत्नागिरी विभागातील २०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यापैकी ७ प्रतिनिधी दोन्ही दिवसांच्या अधिवेशनात आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभाविपतर्फे रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नागपूर येथील रेशीम बागेतील स्मृती मंदिर परिसरात होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत असल्यामुळे केंद्रीय कार्यसमिती तसेच विविध प्रदेशाचे मंत्री आणि सहमंत्री असे सुमारे २०० प्रतिनिधी प्रत्यक्ष स्वरूपात सहभागी होतील. देशभरातील चार हजार ठिकाणाहून वीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात सहभागी करून घेण्यात येईल. रत्नागिरी विभागातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत हे अधिवेशन ऑनलाइन स्वरुपात दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातील सुमारे २०० विद्यार्थी या ऑनलाइन अधिवेशनामध्ये सहभागी असतील.

अधिवेशनात शैक्षणिक धोरण, सामाजिक स्थिती, शेतकरी कायदा अशा विषयावर प्रस्ताव मंजूर होतील. वैशाली (बिहार) येथील मनीष कुमार यांना यावर्षीचा प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार अधिवेशनात दिला जाईल. दहा वर्षांपूर्वी आयआयटी खडगपूर येथून इंटिग्रेटेडची मास्टर डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांना अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीमधून नोकरीसाठी प्रस्ताव आला होता. परंतु त्यांनी आपली संपूर्ण कार्यशक्ती ग्रामविकासासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तरुणांना स्थायी जैविक आणि बहुप्रचलित शेती मॉडेलकडे आकर्षित केल्याबद्दल तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारासाठी काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. छगनभाई पटेल आणि पुनर्निर्वाचित राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी अधिवेशनात कार्यभार स्वीकारतील. प्रा. डॉ. छगनभाई पटेल गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील असून फार्मसी विषयात आचार्य पदवी त्यांनी मिळविली आहे. आतापर्यंत त्यांचे १७० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. बारा वर्षांपूर्वी प्रसिद्ध फार्माविजनच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणले. १९९६ पासून ते परिषदेच्या संपर्कात आहेत. निधी त्रिपाठी मूळ उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आहेत. अलाहाबाद विद्यापीठातून बीए तर जेएनयूमधून एमृए, एमफिल आणि आता त्यांचे पीएचडीचे शिक्षण सुरू आहे. जेएनयू विद्यार्थी संघाच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी अभाविपचे प्रतिनिधित्व केले. अभाविपच्या मिशन साहसी अभियानाला अखिल भारतीय स्वरूप देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयांतर्गत आयोजित श्रीलंका यात्रेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

पत्रकार परिषदेला अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक राहुल राजोरीआ, प्रा. श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply