योग पदविका अभ्यासक्रमाचा रत्नागिरी केंद्राचा निकाल शंभर टक्के

रत्नागिरी : ठाण्याच्या घंटाळी मित्रमंडळातर्फे घेण्यात आलेल्या योग पदविका अभ्यासक्रमाचा रत्नागिरी केंद्राचा शंभर टक्के निकाल लागला.

राष्ट्रीय सेवा समिती संचालित बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात रत्नागिरीत झाडगाव येथील माधवराव मुळे भवनात गेली तीन वर्षे सातत्याने सुरू आहे. या केंद्रामार्फत अनेक प्रकारचे योगाचे वर्ग घेतले जातात. त्यामध्ये योग इन्स्ट्रक्टर कोर्स, योगाचा डिप्लोमा, योगाचे थेरपी वर्ग, योग शुद्धिक्रिया वर्ग, दैनंदिन योगसाधना वर्ग, प्राणायाम वर्ग, उंची संवर्धन वर्ग, सूर्यनमस्कार वर्ग यांचा समावेश आहे. याच केंद्रावर गेल्यावर्षी ठाण्यातील घंटाळी मित्र मंडळाच्या मदतीने आणि राष्ट्रीय सेवा समिती संचालित बाळासाहेब पित्रे योग संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीकरांची गरज म्हणून एक वर्षाचा योगाचा डिप्लोमा वर्ग आयोजित केला होता. या वर्गात ४० योगसाधकांनी नोंदणी केली. गेले वर्षभर ठाण्यातून डॉ. अजित ओक यांच्या नेतृत्वाखाली घंटाळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते दर शनिवार आणि रविवारी येऊन या वर्गाकरिता मार्गदर्शन करत होते. अतिशय नियोजनबद्धपणे वर्षभर हा वर्ग चालला. त्यामध्ये सहभागी झालेल्या योगसाधकांनी योगातील अनेक कौशल्ये संपादन केली. त्यांनी योग समजावून घेतला आणि समाजातील विविध स्तरापर्यंत योगाचे प्रशिक्षण कसे द्यायचे, हे समजावून घेतले. वर्षभरात चार परीक्षा झाल्या. त्या तसेच प्रात्यक्षिकही त्यांनी पूर्ण केले. करोनाच्या काळात हा वर्ग थांबेल का, अशी शंका असतानाच ऑनलाइन पद्धतीने वर्गाचे कामकाज चालले. ऑनलाइन परीक्षाही योगसाधकांनी दिली. रत्नागिरीकरांच्या चांगल्या प्रतिसादामुळे हा वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला.

गेल्या मे महिन्यात परीक्षा झाली. या परीक्षेचा रत्नागिरी केंद्राचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात डॉ. रंजना केतकर, डॉक्टर प्रीती मुळे आणि अॅड. रुची महाजनी यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. यशस्वी योगसाधकांचे अभिनंदन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कर्नाटकातील योगतज्ज्ञ विश्वनाथजी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी, संचालक राजेश आयरे, मोहन भावे, गिरी कुलकर्णी आणि अॅड. रुची महाजनी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वितरण झाले. समाजाचे आरोग्य सुधारावे, समाज सुखी आणि आनंदी राहावा, या उद्देशाने बाळासाहेब पित्रे योग संशोधन व प्रशिक्षण केंद्र सातत्याने प्रयत्नशील असलेल्या या केंद्राला विश्वनाथजी यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी योगसाधकांचे अभिनंदन केले.

काही योगसाधकांनी मनोगत व्यक्त केले. रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात योगाच्या प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल योग केंद्राचे त्यांनी आभार मानले. अशा प्रकारचे वर्ग सातत्याने आयोजित करावेत, असेही मत व्यक्त केले. घंटाळी मित्र मंडळाचे अण्णा व्यवहारे यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, असेही मत राष्ट्रीय सेवा समितीच्या अॅड. रुची महाजनी यांनी व्यक्त केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply