रत्नागिरी-सिंधुदुर्गात जिओचे ४० इंटरनेट टॉवर

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वेगवान व्हावी, यासाठी माजी खासदार नीलेश राणे प्रयत्नशील आहेत. दोन्ही जिल्ह्यांत ४० ठिकाणी रिलायन्स म्हणजेच जिओचे टॉवर उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

अलीकडे सर्वच कामकाज ऑनलाइनने झाले असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक ठरली आहे. कोकणातही वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांचे काम इंटरनेटविना अडू नये, तसेच रात्री-अपरात्री फोनअभावी आरोग्य सेवेपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जिओचे टॉवर उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ४० ठिकाणी टॉवर उभारण्यासाठी त्यांनी जिओ कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे.

दोन्ही जिल्हयांतील भौगोलिक परिस्थिती पाहता आणि सध्याच्या अत्याधुनिक युगात मोबाइल आणि इंटरनेटचा दैनंदिन कामकाजात अत्यावश्यक झालेला वापर लक्षात घेता त्यांचा अभाव जाणवतो. बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार यंत्रणा पुरेशी ठरत नाही. त्या कंपनीतर्फे सुरू असलेली एफटीटीएच सेवाही गावोगावी पोहोचायला विलंब होणार आहे. तसेच त्या कंपनीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडाही जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंटरनेटसाठी खासगी कंपनीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

दोन्ही जिल्ह्यांत असंख्य ठिकाणी अद्याप टॉवर नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य सेवेत फोनअभावी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळे येत आहेत. शासकीय मदत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा इंटरनेट महत्त्वाचे आहे. त्यासाठीच श्री. राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांमध्ये नव्या जिओ टॉवर उभारणीची मागणी जिओ कंपनीकडे केली आहे.

जिओ टॉवर उभारले जाणार असलेली गावे अशी – लांजा – वनगुळे, पालू, कान्टे, संगमेश्वर – देवरूख परशरामवाडी, ताम्हाणे, माखजन, कोंडिवरे. राजापूर – ओणी, शेंबववणे, गोठणे-दोनिवडे, भंडारसाखरी, वाडवली, तळवडे. रत्नागिरी – कुर्धे, चिपळूण – वालोटी, पेढांबे, कुशिवडे, मार्गताम्हाणे, डोणवली, चिपळूण शहर, कुशिवडे, सावर्डे. सिंधुदुर्ग जिल्हा – दोडामार्ग – आंबडगाव, देवगड – देवगड शहर, मोंड. कुडाळ – पिंगुळी, माणगाव, कट्टागाव. वैभववाडी – कुर्ली, वाभवे. मालवण – आचरा, वेर्ली, बांदिवडे, सर्जेकोट, रामगड. तर सावंतवाडी ओटवणे, चराटे, सावंतवाडी, शेर्ले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply