भात, नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

पालघर : मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारचे नाव ऐकले की समोर येत ते तेथील आदिवासीबहुल भागातील कुपोषण, बेरोजगारी आणि निरक्षरता. मात्र आता मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार-मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भातशेती आणि नाचणी शेतीला बगल देत किंवा भात आणि नाचणीच्या कापणीनंतर तेथील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळत आहे.

मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हार मध्ये कृषी विभागाच्या साह्याने सध्या शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळलेले दिसून येत आहेत. जव्हार आणि मोखाडा या आदिवासीबहुल भागात पावसाळ्यात भातशेती आणि नाचणीची शेती केली जाते. मात्र या शेतीनंतर इथले अनेक शेतकरी रोजगारासाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होतात. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. असल्यानं त्यामुळे या भागात वर्षानुवर्षे कुपोषण, बेरोजगारी असे प्रश्न भेडसावत आहेत. मात्र त्यालाच बगल देऊन आता तेथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यांमधील सुमारे ८६ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्यातून त्यांना बऱ्यापैकी नफा मिळत आहे.

जव्हार आणि मोखाडा येथील स्थलांतर, बेरोजगारी, कुपोषण रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या गेल्या. मात्र स्थानिक पातळीवर रोजगार देण्यास शासन अपयशी ठरत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले. त्यामुळे त्यात बदल करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी धरला. वेगळी वाट धरली. आता आपल्याच शेतात या शेतकऱ्यांना रोजगार मिळणार असून त्यातून त्यांना माफक असला, तरी नफाही मिळेल. जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील ८६ शेतकऱ्यांनी सुमारे ११ एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. शिवाय या स्ट्रॉबेरीवर कुठलाही रोग अजूनपर्यंत निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या लागवडीचे रूपांतर व्यवसायिक शेतीमध्ये करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.

कृषी विभागाकडून यावर्षी प्रत्येकी शेतकऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीच्या ६०० रोपांचे वाटप करण्यात आले होते. या लागवडीआधी या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले होते. प्रायोगिक तत्त्वावर केली गेलेली स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी ठरली आहे. त्याचा आदर्श घेऊन काही शेतकऱ्यांनी यापुढे पावसाळ्यातील भातशेती आणि नाचणीची शेती करण्याऐवजी स्ट्रॉबेरीची शेती करायचा विचार चालविला आहे. पावसाळ्यात या शेतीची स्ट्रॉबेरीची लागवड होते का आणि ती यशस्वी होते का, याचा प्रयोगही काही शेतकरी करणार आहेत.

तूर्त तरी भात आणि नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या आंबाबागांच्या मधल्या मोकळ्या जागेतही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. हे सारेच प्रयोग यशस्वी झाले, तर आजवरच्या आतबट्ट्याच्या भातशेतीला उत्पन्न देणाऱ्या वेगळ्या शेतीची जोड नक्कीच मिळेल, असा विश्वास काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply