‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! मंडणगड अंनिसच्या उपक्रमाला प्रतिसाद

मंडणगड : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या मंडणगड शाखेने आयोजित केलेल्या ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मंडणगड शाखा आणि कबीर कला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनाला बदनाम करू या या उपक्रमाचे आयोजन मंडणगड येथील बाणकोट रस्त्यावरील पिंपळे स्टेशनरी स्टोअर्समध्ये बाणकोट रोड येथे करण्यात आले होते.

‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! असा संदेश देऊन मंडणगड मधील नागरिकांना दूध पिण्यास देण्यात आले. आम्ही नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करू, असा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष विजय डोईफोडे म्हणाले की, सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत तितक्याच उमेदीने आणि उत्कटतेने केले जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले जाते. कितेक तरुण दारूचा पहिला घोट याच दिवशी घेत असतात आणि हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात. निकोप आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे.

अंनिसचे प्रधान सचिव श्रीकांत जाधव म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात पडत चाललेला दिसतो. तरुणाई मोठ्या प्रमाणावर या चंगळवादी चक्रात ओढली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. व्यसनाधीन होणे म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसणे. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आम्ही करत आहोत. व्यसनमुक्त पद्धतीनेच नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे.

यावेळी मंडणगडचे गटविकास अधिकारी भिंगारदेवे, गटशिक्षणाधिकारी कुचेकर, कृषी अधिकारी विशाल जाधव, विस्तार अधिकारी जगताप, प्रा. डॉ. भारतकुमार सोलापुरे, नगरपंचायत बांधकाम सभापती आदेश मर्चंडे, उद्योजक दीपक घोसाळकर, संजय राणे, प्रवीण जाधव, शिक्षक पतपेढी संचालक शांताराम पवार, लेखक किशोर कासारे, शिक्षक नरेश गोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष भरत सरपरे, विद्यार्थी मदत संघटनेचे अध्यक्ष राजेश इंगळे, दत्ता सापटे, पत्रकार सचिन माळी, श्री.जोशी आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply