‘दर्पण’च्या पहिल्या अंकात बाळशास्त्री जांभेकरांनी व्यक्त केलेले मनोगत

मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावचे. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच गावात झाला. सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दी बॉम्बे दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून बाळशास्त्रींना मराठीतील आद्य पत्रकार मानले जाते आणि सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (सहा जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती नसते.) ‘दर्पण’ सुरू करताना त्यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबद्दल त्यांनी पहिल्या अंकात लिहिले होते. ते त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

जो उद्योग आम्ही योजिला आहे त्याचा प्रारंभ करते वेळेस नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात त्याविषयीचा काही गोष्टी या स्थळी लिहीणें हें अयोग्य नव्हे. या नियतकालिक लेखांची पद्धती, आणि उपयोग, हे वर्तमानपत्र वाचणाऱ्या एतद्देशीय लोकांतून बहुतांचे समजण्यात बहुधा आले नसतील, आणि मुंबई बाहेरची मुलुखांत जर ही गोष्ट विचारात आलीच नसेल. हिंदूस्थानचे विद्यांत या लेखात दृष्टांत द्यायाजोगे सांप्रत काही नाही, आणि सांप्रतचे राजांचा अमल व्हायाचे पूर्वी या देशांत या जातीचे लेख होते असे कोठे प्राचिन बखरातही आढळत नाही. जा देशातून आपले सांप्रतचे शतकर्ते एथे आले, त्या देशात ते एथे आल्याचे पूर्वी फार दिवसांपासून या आश्चर्यकारक छापयंत्राची कृत्ये चालू होती, त्यापासून मनुष्याचे मनातील अज्ञानरूप अंधकार जावून त्यावर ज्ञानरूप प्रकाश पडला. या सज्ञान दशेस येण्याचे साधनांमध्ये इतर सर्व देशांपेक्षा युरोप देश वरचढ आहे. नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात, ते आम्हास सांप्रतचे राजांचे द्वारे माहित झाले. जा जा देशामध्ये अशे लेखांचा प्रचार झाला आहे, तेथे तेथे लोकांचे आंतर व्यवहारामध्ये तसेच बाह्य व्यवहारामध्ये शाश्वत हित झाले आहे. यापासून बहुतवेळ विद्यांची वृद्धी झाली आहे, लोकांमध्ये निती रूपास आली आहे, केव्हा केव्हा प्रजेने राजांचे आज्ञेत वर्तावे आणि राजांनीही त्यावर जुलूम करू नये अशा गोष्टी यापासून घडल्या आहेत. अलिकडे कित्येक देशात धर्मरिती यात जे चांगले आणि उपयोगी फेरफार झाले आहेत त्यासही थोडे बहुत हे लेख उपयोगी पडले आहेत.

यद्यपी या लेखांची फळे संसारातील सामान्य व्यवहारात उपयोगी नव्हत आणि लाभ नसताही केवळ सुरूपतेस येण्याचे
साधनाचा विचार करणारे जे विद्वान त्यास मात्र संतोषकारक होत, म्हणोन अशा फळांपासूनच या लेखाचा थोरपणा वर्णावा असे नाही, तथापि लोकास लाभ देणाऱ्या गोष्टीही यापासून घडतात. ते असे. त्यापासून अतिशय दूरच्या देशातील वर्तमाने कळतात. बुद्धीमानांची बुद्धिमत्ता त्यांचे द्वारे सर्व लोकात प्रसिद्ध होते, उपयोगी बातमी समजण्यात येत्ये आणि श्रमसाध्य विद्यादिकांचे विचारांकडे जे चित्त देत नाही, त्यांचे मनोरंजनही होते. अशा लेखांचा प्रचार जा देशात निर्विघ्नपणे होऊन लोकांचे मनात त्यांतील गोष्टी ठसतात ते देश धन्य होत! अशा चांगले कामाविषयी लोकांस स्वतंत्रता पृथ्वीचे इतर भागांपेक्षा युरोप खंडात फार आहे, आणि तेथे असे आहे म्हणोनच सज्ञानता, सर्व लोकांमध्ये विद्यांची प्रवृत्ती, आणि अनेक विद्यांचा शोध, या गोष्टी इथे झाल्या.

या विस्तृत देशात इंग्रजांचे राज्य झाल्यापासून, लोकांची निती आणि ज्ञान वाढायाविषयी प्रयत्न होत गेले आणि या सुज्ञ राजांचे लोकोपकारक उद्योग इतक्या थोड्या काळात असे सफल होतील असे वाटत नव्हते. बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती येऊन साठ सत्तर वर्षे झाली, परंतु इतक्यातच त्या देशाचे स्थितीत जे अंतर पडले ते पाहिले असतां विस्मय होतो. जो देश सुमारे शंभर वर्षापूर्वी बलात्कार, जुलुम आणि कुनीति यांचे केवळ घर होता, तो आता निर्भयपणे आणि स्वतंत्रता भोगतो आणि तेथील लोकास युरोप खंडातील विद्या आणि कलांचे विषेश ज्ञान आहे, हे पाहून चांगला राजा आज्ञेत वागणाऱ्या प्रजांचे कल्याण करावयास इच्छितो तर त्याचे हातून काय काय घडले यास योग्य दृष्टांत सापडतो.

हा हिंदुस्थानचा प्रदेश इंग्रजी अंमलाखाली येवून जरी थोडकीच वर्षे झाली आहेत, तरी जो अज्ञानांधकार फार दिवस पर्यंत या देशास व्यापून होता तो जाण्यास प्रारंभ झाला आहे, आणि बंगाल देशचे लोक सांप्रत आमचे पेक्षें जा गुणांमध्ये विशेष आहेत त्यामध्ये आम्ही त्यांचे सारिखे होऊ असा दिवस लवकरच येईल, असी आम्ही आशा करित आहो. विद्येपासून आणि सरळबुद्धी पासून जी फळे होतात त्यांचे यथार्थ ज्ञान युरोपियन लोकांशी बहुत दिवस सलगीचे संघटन पडल्यामुळे बंगालचे लोकांस झालेले आहे. या गोष्टी त्यांचे मनांत पक्केपणी ठसून त्याणीं स्वदेशीय लोकांचे विद्याभ्यास करिता प्रयत्न केले, आणि ते त्यांचे यत्न सफल झाले. तेथे विद्या वाढण्यास आणि सरळ बुद्धी होण्यास कारणे मुख्यत्वे करून दोन, एक सर्व विद्यालय म्हणजे सर्व विद्यांची शाळा, आणि दुसरे तेथे जी बहुतद्देशीय वर्तमान पत्रे छापून प्रसिद्ध होतात ती. बरे असेच उपाय एथे केले तर अशी फळे न होतील की काय? आमचे लोकांचे मुलास विद्या शिकवायास एक फार चांगली मंडली मुंबईत झाली आहे, आणि अल्पिष्टन शाळा गुरू जेव्हा येतील तेव्हा तर तिचा विशेषच उपयोग होईल. आतां विद्या व्यवहाराचे द्वार असे एक वर्तमान पत्र पाहिजे की जांत मुख्यत्वे करून एतद्देशीय लोकांचा स्वार्थ होईल. जापासून त्यांचा इच्छा आणि मनोगते कळतील, जवळचे प्रदेशातील आणि परकीय मुलुखात जी वर्तमाने होतात ती समजतील, आणि जे विचार विद्यापासून उत्पन्न होतात आणि जे लोकांची नीति, बुद्धी आणि राज्यरीती यांचे सुरूपतेस कारण होत, ते विचार करण्यास उद्योगी, आणि जिज्ञासू मनांस जापासून मदत होईल.

आम्ही आशा करीत आहो की, या गोष्टी काही थोड्याबहुत दर्पनापासून घडतील. हे सर्व वर सांगितलेले आमचाच उद्योगापासून घडेल असा आम्हास अभिमान नाही, परंतु भरवसा आहे की, आमचे इष्ट इंग्रेज लोक व सुज्ञ स्वदेशीय लोक या उद्योगास सहाय होऊन तो सफल होई असे करितील, म्हणोन आम्ही प्रार्थना करतो की, सर्व लोकांनी कृपा करून आम्हास मदत करावी.

  • बाळशास्त्री जांभेकर
    (दी बॉम्बे दर्पण – ६ जानेवारी १८३२)

(सौजन्य : महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर; लेखक : यशवंत पाध्ये; प्रकाशक : राजे पब्लिकेशन्स) (हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply