कणकवली : पर्यटनाला असलेला वाव आणि कोकणच्या संस्कृतीची थोरवी गाणारे “कोकण” हे गीत लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. गीताचे शब्द आणि संगीत सिंधुदुर्गचे सुपुत्र प्रणय शेट्ये यांचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिडवणे (ता. कणकवली) गावचा सुपुत्र युवा गीतकार, संगीतकार प्रणय शेट्ये याने द्रौपदी क्रिएशन्सच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणच्या कलाकारांना एकत्र करून कोकण या गीताची निर्मिती केली आहे. कोकणचे पर्यटन, परंपरा आणि लोकसंस्कृती या गीतातून उभी राहणार आहे. कोकण, इंदूर, हैदराबाद, जळगाव, मुंबई अशा विविध भागातील कलाकार मित्रमंडळींना एकत्रित करून मालवण येथे एका म्युझिकल ट्रिपचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रणयच्या शब्दसंगीत रचनांना संगीत संयोजन करून स्वरसाज चढवण्याचे काम सर्व टीमच्या साह्याने पूर्ण करण्यात आले. चौदा दिवसांत एकूण ५ संगीतरचनांवर काम करताना या प्रवासात गायक सार्थक कल्याणी, आकाश शर्मा, प्रशांत मेस्त्री, रेखा मुनेश्वर, वादक योगेन्द्र पाटील, कौस्तुभ कसालकर, ओमकार सावंत, शेखर सर्पे यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.
या गीतात कोकणचे वैविध्य मांडताना कोकणची ख्याती, संस्कृती, परंपरा यांचा प्रसार जगभर करण्याची निखळ भावना आणि उद्देश ठेवला आहे. हे गीत लवकरच ‘द्रौपदी क्रिएशन्स’ ह्या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणार आहे. जगविख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या विविध प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेला नामांकित गायक सार्थक कल्याणी यांच्या सुरेल आवाजात कोकणावरचे हे लोकगीत स्वरबद्ध झाले आहे. या आधीही मराठी माध्यम शाळेच्या प्रसारासाठी केलेले शीर्षक गीत, ऑस्ट्रेलिअन गायिकेच्या आवाजात भारतीय व पाश्चात्य संगीत संयोजनाच्या मिलाफातून साकारलेले वंदे मातरम् तसेच लॉकडाउनमध्ये डिजिटल कॉन्फरन्स कॉलवर वेगवेगळ्या शहरातील कलाकारांना जोडून घडवलेले उभारी गीत अशा वेगळ्या धाटणीच्या संकल्पनांमुळे अनेक उदयोन्मुख कलाकार मंडळी प्रणयच्या उपक्रमात सहभागी व्हायला उत्सुक असतात. आताही कोकण या गाण्याव्यतिरिक्त नित्यप्रार्थना, प्रेमगीत, विरहगीत, हलदी गीत ह्या चार थीमवर मित्रमंडळींना घेऊन प्रणय काम करत आहे.
कोकणात ही म्युझिकल ट्रीप घडवून आणायचे कारण तितकच खास होते, असे सांगून प्रणय म्हणाला, माझ्यासाठी संगीत म्हणजे दीर्घकाळ जगता येणारे सुख आहे. जगण्यातील संवेदना, भावना, एकांत आणि त्याहीपलीकडे संगीत हे आठवणी गुंफणारा एक धागाच आहे. या सर्वच बाबतीत, सर्वांगाने माझा कोकणही पुरेपूर भक्कम आणि सक्षम आहे. म्हणूनच कोकणवाली म्युझिकल ट्रीप साकरण्याचे स्वप्नही सत्यात उतरवता आले आणि ते यशस्वीसुद्धा झाले.
पूर्ण गीत असे आहे –
कोकण कोकण कोकण कोकण
जिवाभावाची नाती ही कोकण
आपुलकीचा प्रवाह कोकण
निसर्गराजाचं हे कोकण
परशुरामाची कृपा हे कोकण
कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण
गायी-बैल वासरांची पहाट कोकण
कोकण कोकण कोकण कोकण
गणपतीपुळ्याचं दर्शन कोकण
देवदेवतांचा महाल कोकण
लालपरीचा प्रवास कोकण
चिऱ्या-कौलांच्या घरांचा कोकण
आंबा काजू नारळी पोफळी
कुळथाची पिठी अन् सोलकढी
भाकरी कालवणाची चव लय न्यारी
कोकणाची बायो जेवणात भारी
विहिरीच्या पाण्याची चव निराळी
शांती आनंदाची नदीच ग्वाही
सारवलेले खळे, मातीतले खेळ
अशी गर्द छाया कुठेच नाही
मायेचा सागर, प्रेमाचा डोंगर
भक्तीची ओंजळ आहे कोकण
सणांचा कोकण, प्रथांचा कोकण
मुकुट मालवणीचा आहे कोकण
पावसातल्या लावणीची मौजही कोकण
गौरीगणपतीतला गाजावाजा कोकण
कलारत्नांची खाणही कोकण
दशावताराची झिंग हे कोकण
गड-किल्ले क्रांतीची निशाणी
भिनविती रगे थोर छत्रपती
होते इथे पावन जमिनीतून गंगामाई
जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई
कोकण कोकण कोकण कोकण..

(संपर्क : प्रणय मंगेश शेट्ये, ९९३०३९७४३२)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
