रत्नागिरी : रत्नागिरीत लर्निंग पॉइंट, लायन्स क्लब आणि रोटरी क्लबतर्फे वैवाहिक जोडीदारांसाठी जोडी तुझी माझी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अशाच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यावर्षीही हा कार्यक्रम होणार असून तो येत्या शनिवारी (दि. १३ फेब्रुवारी) होणार आहे.
शुभमंगल सावधान!
असे अनेक वेळा ऐकूनसुद्धा आनंदाने एकमेकांच्या गळ्यात लग्नाच्या वेळी हार घातले जातात आणि खऱ्या अर्थाने ती दोघे एकमेकांचे होतात. सहजीवनाला सुरुवात होते. मात्र भूतकाळात थोडेसे डोकावून पाहिले, तर जुन्या म्हणीप्रमाणे “नव्याचे नऊ दिवस” संपले, असे जाणवते. एकत्र कुटुंबात नवऱ्याने सगळ्यांच्या नकळत हळूच गजऱ्याची पुडी हातात सरकवली आहे का कधी? मोठा ग्रुप बसलेला असताना “आखों आखों मे इशारा हो गया” असे किती वेळा झालेले आठवते? पहिले भांडणही कधी आणि का झाले होते, हे आठवते का बघा! पहिला विरह कसा होतो? तोही बर्या च जणांनी मोबाइल नसताना कसा व्यतीत केला असेल? आज बऱ्याच जणांचे विवाह छान मुरलेल्या लोणच्याप्रमाणे झाले आहेत. नव्या लोणच्याला असलेला थोडा आंबटपणा, खुसखुशीतपणा संपला आणि त्याजागी आली ती मुरलेल्या लोणच्याची चव! त्या चवीत नवीन काही नाही. पण तरीही ओळखीचा, आपुलकीचा, प्रेमाचा आणि आठवणींचा ठेवा जरूर आहे.
तोच जागविण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी “जोडी तुझी माझी” या कार्यक्रमाने केला होता. तो सारा प्रपंच फक्त मुरलेल्या लोणच्याला नवीन तडका देण्यासाठी होता. बऱ्याच वेळा गृहीत धरलेला नात्याला, आपल्या हक्काच्या माणसांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी होता. सहजीवनात अनेक भूमिका आणि जबाबदारी पार पाडत असताना सहजीवनातील साथीदाराबरोबरचा एकत्र प्रवास काही वेळेला राहून जातो किंवा या प्रवासात जोडीदारातील एक असतो, एक नसतो. हे सर्व व्यक्त होणे, मोकळे होणे, सहजतेने मान्य करणे आणि पुन्हा सहजीवनाच्या प्रवासाला लागणे, कटुता दूर करून नात्याला नवसंजीवनी देणे हाच धागा पकडून लर्निंग पॉइंट, रोटरी क्लब आणि लायन्स क्लबतर्फे “जोडी तुझी माझी” हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
रत्नागिरीत टीआरपीजवळ अंबर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम १३ फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे. त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी सचिन सारोळकर (मानसशास्त्रज्ञ, ९४२२४२९८९९), सुखदा सारोळकर (व्यवस्थापक, लर्निंग पॉइंट, ९९७५४२५६१०) मनोज पाटणकर (अध्यक्ष, रोटरी क्लब, ९०२८८९९४१०) किंवा श्रेया केळकर (अध्यक्ष, लायन्स क्लब, ९४२२४३२३८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
