रत्नागिरीत ३०, सिंधुदुर्गात ४ नवे करोनाबाधित

खेड तालुक्यात एकाच वाडीत एकाच दिवशी २७ जणांना बाधा

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ फेब्रुवारी) करोनाचे नवे ३० रुग्ण आढळले. त्यात खेड तालु्क्यातील एकाच गावातील एकाच वाडीतील २७ जणांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ नवे रुग्ण आढळले. रत्नागिरीत १९, तर सिंधुदुर्गात ३ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ३० रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १ तर खेड तालुक्यातील एकाच गावात २७ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार गुहागर आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी १, बाधित रुग्ण आढळले.

खेड तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या वरवली गावातील धुपेवाडी येथे एकाच दिवशी २७ करोनाबाधित रुग्ण आढळले. याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धुपेवाडीतील मंदिरात गेल्या ८ फेब्रुवारीच्या रात्री भजन होते. या कार्यक्रमाला सारे ग्रामस्थ एकत्र आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ तारखेला त्यातील एका ग्रामस्थाला ताप येऊ लागला. तो ग्रामस्थ लगेचच या परिसरातील आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी गेला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी रत्नागिरीच्या लॅबमध्ये पाठवण्यात आला. व्यक्ती करोनासंशयित असल्याने त्याला तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची पुन्हा अॅन्टीजेन टेस्ट घेतली असता त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. रत्नागिरीत पाठवलेल्या स्वॅबचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला. गेल्या ८ तारखेच्या कार्यक्रमात त्या व्यक्तीचा गावातील अनेक ग्रामस्थांशी संपर्क आला होता. त्यामुळे तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. धुपेवाडीतील ४७ ग्रामस्थांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी तब्बल २७ जणांची करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच गावात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळणे आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने अतिशय आव्हानाचे असल्याने आरोग्य यंत्रणेने गावात ठाण मांडले असून त्या २७ जणांच्य संपर्कात आलेल्या ग्रामस्थांचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. करोनाबाधित २७ जणांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील विशेष विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र सर्वप्रथम सापडलेल्या रुग्णाची प्रकृती ढासळली असल्याने त्याला रत्नागिरी महिला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७३३ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १२६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७५ हजार १९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८१ आहे. त्यातील सर्वाधिक २८ रुग्ण खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. तेवढेच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२७६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.३० टक्के आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ८० वर्षाच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू गेल्या १३ फेब्रुवारीला झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१५ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ४ करोनाबाधित आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३६२ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९९० झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७२ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply