अशांततेचे हिडीस दर्शन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण गेल्या आठवड्यात चांगलेच तापले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे त्याची ठिणगी पडली. सध्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना पक्षाकडून योग्य तो सन्मान दिला जाईल, असे श्री. शहा यांनी सांगितले. तेवढ्या एका सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झाला. राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्याला तसा फारसा आधार नसला तरी राणे यांच्यासारख्या नॉनमॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद मिळाले, तर ते कोकणाचे आणि देशाचे दुर्दैव ठरेल, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्यातून राऊत विरुद्ध राणे कुटुंबीय यांच्यात शाब्दिक सुंदोपसुंदी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी ती उचलून धरली. पुतळे जाळले गेले. आव्हाने-प्रतिआव्हाने दिली गेली. विशिष्ट ‘स्टाइल’ वापरणार असल्याचे बजावले जाऊ लागले. मैदानात समोरासमोर येण्याची आव्हाने देण्यात आली.

या साऱ्या प्रकाराला दोन पक्षांमधील संघर्ष म्हणता येणार नाही. राणे विरुद्ध राऊत या व्यक्तिगत वैराचा तो आविष्कार होता. एकमेकांची उणीदुणी काढणे एवढाच त्याचा अर्थ होता. आपल्याकडे व्यक्तिपूजेला अधिक महत्त्व दिले जाते. राजकीय क्षेत्रात तर व्यक्तिस्तोम भरपूरच असते. कार्यकर्ते नेत्यांचे भक्त असतात. आपलाच देव श्रेष्ठ, अशी त्यांची भावना असते. तशी ती असायलाही काही हरकत नाही. पण इतर कोणी देवच नाही, असले तरी आपल्या देवासमोर ते कःपदार्थ असतात, अशी त्यांची टोकाची भावना असते. इतर कोणत्याच बाबींशी त्यांना काहीही घेणेदेणे नसते. त्यातूनच ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. असे भक्त कार्यकर्ते आपल्यासाठी रस्त्यावर येतात, काहीही करू शकतात, पोलिसांच्या लाठ्या खाऊ शकतात, तुरुंगात जातात, हे सारे नेत्यांना सुखावून जाणारे असते. या सुखाचीच एकमेकांशी तुलना होत असते. कार्यकर्त्यांना मूळ पक्षाच्या ध्येयधोरणांशी काहीही देणेघेणे नसते. आपला नेता म्हणजे आपला देव, तो म्हणेल तेच खरे एवढेच, त्यांना माहीत असते. त्यात त्यांची कोणतीही चूक नसते. कारण त्यांना तसेच घडवले गेले असते. सारासार विवेकबुद्धी असावी, ती वापरावी, असे कार्यकर्त्यांना वाटतच नाही. हेच कार्यकर्ते एकमेकांना भिडतात, तेव्हा अशांतता निर्माण होत असते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नुकत्याच उडालेला राजकीय धुरळा याच पद्धतीचा होता. सहा वर्षांपूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नारायण राणे यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे काँग्रेसचे उमेदवार होते. त्या वेळेच्या प्रचारात श्री. राणे यांनी विनायक राऊत यांच्या पदव्या खोट्या असल्याचे म्हटले होते. त्यांच्यापेक्षा नीलेश राणे उच्चविद्याविभूषित आणि परदेशातून डॉक्टरेट मिळविलेला आहे. म्हणजेच राऊत यांच्यापेक्षा आपला मुलगा अधिक सुशिक्षित आहे, असा मुद्दा श्री. राणे यांनी मांडला होता. त्यावर श्री. राऊत यांनी आपल्या पदव्यांची कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याचाच वचपा आता श्री. राऊत यांनी नारायण राणे यांच्या शिक्षणाविषयी मतप्रदर्शन करून काढला. पण त्यामुळे राजकीय क्षेत्रातील दोन व्यक्ती आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक कोकणाला पाहावी लागली.

व्यक्तिपूजेतून निर्माण झालेल्या आविष्काराचे ते हिडीस दर्शन होते. नेत्यांच्या या भांडणात विकास वगैरे गोष्टींना वावच नसतो. त्यामुळेच नेत्यांना, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जसे प्रशिक्षण हवे असे वाटते, तसेच राजकीय कार्यकर्त्यांसाठीसुद्धा आता प्रशिक्षण असायला हवे, असे वाटून जाते. अर्थात ही केवळ कविकल्पना आहे. पण तसे काही घडले तर कोकणातील वातावरणात आज जसे गढूळ झाले आहे, तशी स्थिती येणार नाही. पण तूर्त तरी ते एक स्वप्नरंजनच आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १९ फेब्रुवारी २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १९ फेब्रुवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply