रत्नागिरी जिल्ह्यात करोनाप्रतिबंधासाठी रात्रीची संचारबंदी लागू

रत्नागिरी : करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच (२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून) ती लागू झाली असून संचारबंदी किती तारखेपर्यंत लागू राहणार आहे, याचा उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही. साथरोग प्रतिबंधक कायद्याचा अवलंब करण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने संचारबंदी जारी करण्यात आल्याचे श्री. मिश्रा यांनी आदेशात नमून केले आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय भरविता येणार नाहीत. स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय आठवडा बाजार, जनावरांचे बाजार भरवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ, साखरपुडा, मुंज, पूजा, आरती, नमाज इत्यादीसाठी ५० व्यक्तींपर्यंत एकत्रित येणारा समारंभ साजरा करण्यासाठीही उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्रकिनारे अशा ठिकाणी एकाच वेळी ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरूस इत्यादी कार्यक्रमांना केवळ ५० माणसांनाच उपस्थित राहता येईल. त्यासाठीही उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरूस भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक सेवेकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांच्याव्यतिरिक्त इतरांना बाहेर फिरता येणार नाही. विनाकारण फिरताना आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक असून मास्कचा वापर केला नाही, तर पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्य रीतीने मास्कचा वापर केला नाही, तरीही मास्कचा वापर केला नाही, असे समजून कारवाई करण्यात येईल. स्थानिक प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला त्याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनांनी केलेली दंडाची रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करावयाची असून निधीचा वापर करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करावयाचा आहे. पोलिसांनी वसूल केलेली रक्कम वाहतूक शाखेच्या खात्यात जमा करावयाची आहे. त्यापैकी ५० टक्के निधी जिल्हा आपत्ती निवारण निधीमध्ये जमा करावयाचा आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply