योग्य खबरदारीअभावी अपघातांच्या संख्येत वाढ – जयश्री देसाई

रत्नागिरी : वाहतूक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र योग्य खबरदारी आणि काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. त्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून नियमावलीची अंमलबजावणी करून केली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.

रत्नागिरी लायनेस क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हेल्मेटसक्ती योग्य-अयोग्य, माझे अपघातविषयक अनुभव, वाहतुकीचे नियम आणि त्यांचे पालन, कोविड परिस्थितीमुळे कायदे आणि एकूणच सरकारी नियमांचे पालन करायला शिकलेला “माझ्या मनातला २०२० नंतरचा भारत” असे स्पर्धेचे विषय होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज रत्नागिरीच्या पोलीस मुख्यालय सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई बोलत होत्या. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, लायनेस प्रेसिडेंट अॅड. कार्तिकी शिंदे, सेक्रेटरी शामल शेठ, लायनेस सायुजा प्रभावळकर आदी उपस्थित होते.

रस्ता अपघातात मृत्यू पावणाऱ्या एकूण संख्येत १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ७० टक्के असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी दिली. हेल्मेट नको म्हणत असताना ज्या वाहनचालकाचा जीव हेल्मेट नसल्याने गेला आहे, त्या कुटुंबातील व्यक्तींचे दुःख पाहावे, अपघातात घरातील एक व्यक्ती मृत्युमुखी पडली, तरी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचले असल्याचे तसेच वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठीच असल्याचेही सासने यांनी सांगितले.

वाहतूक नियमावलीसाठी समाजातील विविध घटकातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया कळाव्यात म्हणून वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने निबंध स्पर्धा घेण्यात आल्याचे लायनेस प्रेसिडेंट कार्तिकी शिंदे यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा – मुकुंद दत्तात्रय शेवडे, प्रतीक्षा हरिश्चंद्र आगरे तृतीय क्रमांक विभागून – ममता आत्माराम जाधव, मनोहर विष्णू सामंत. उत्तेजनार्थ : कल्पेश आत्माराम पारधी.

विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांक विजेते मुकुंद शेवडे यांनी वाहतूक नियमावलीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply