शिमगोत्सवासाठी सिंधुदुर्गात पोहोचलेल्यांना करोना चाचणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : शिमगोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचणाऱ्या चाकरमान्यांनी गावात पोहोचताच करोनाविषयक चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे, तसेच या उत्सवाविषयीच्या सविस्तर सूचना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. त्याअनुषंगाने परजिल्ह्यातून येताना आरटीपीसीआर चाचणी करणे शक्य झाले नसल्यास नागरिकांनी जिल्ह्यात दाखल होताच त्याच दिवशी आपापल्या गावातील जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात स्वॅब टेस्ट करून घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात स्वॅब टेस्टची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब टेस्टचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित व्यक्तींनी गृह अलगीकरणात राहावे. स्वॅब टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्याने पुढील उपचाराची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

विनामास्क फिरणाऱ्या ८४ जणांना दंड

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात करोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात ८४ व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महसूल विभागाने काल एका दिवसात ४४ व्यक्तींवर कारवाई करत एकूण ८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला असून पोलिसांनी ४० व्यक्तींवर कारवाई करत एकूण १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम २१ हजार ३०० रुपये इतकी आहे.

त्याशिवाय जिल्ह्यातील नगरपालिका प्रशासनाकडून एकूण ३८ ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, कुठल्याही ठिकाणी करोनाच्या नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे दिसून आले.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅण्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply